‘नागूबाई’च्या कुटुंबीयांना ‘बीएसयूपी’ची घरे, पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला लाभले यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 05:27 AM2017-11-02T05:27:52+5:302017-11-02T05:28:03+5:30

नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला.

Successful followers of 'BSUP' homes, Guardian Minister Shinde's success for 'Nagubai' families | ‘नागूबाई’च्या कुटुंबीयांना ‘बीएसयूपी’ची घरे, पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला लाभले यश

‘नागूबाई’च्या कुटुंबीयांना ‘बीएसयूपी’ची घरे, पालकमंत्री शिंदे यांच्या पाठपुराव्याला लाभले यश

googlenewsNext

डोंबिवली : नागूबाई निवास या इमारतीमधील बेघर मध्यमवर्गीय कुटुंबांना बीएसयूपी प्रकल्पात बांधलेली व रिकामी असलेली घरे तात्पुरत्या स्वरूपात वापरण्यास देण्याकरिता राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने विशेष बाब म्हणून मंजुरी दिल्याने येथील ७२ कुटुंबांपैकी ४६ कुटुंबांना अखेर पाच दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निवारा लाभला. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलेली विनंती मान्य झाल्याने या कुटुंबांना घराच्या चाव्यांचे वाटप करताना शिंदे यांनी फडणवीस यांचे विशेष आभार व्यक्त केले.
देवीचा चौक येथील इमारत शुक्रवारी रात्री खचली. तेव्हापासून ही कुटुंबे रस्त्यावर आली होती. त्यापैकी काही घरांत विवाहाची तयारी सुरू होती, तर कुणाच्या घरात परीक्षार्थी विद्यार्थी होते. त्यामुळे या कुटुंबीयांनी घराकरिता आर्जवं केली होती. बीएसयूपी योजनेतील घरे या कुटुंबांना देण्याकरिता महापौर राजेंद्र देवळेकर व शिवसेनेचे नेते आग्रही होते. मात्र, केडीएमसीचे आयुक्त वेलरासू व अन्य अधिकारी यांनी नियमानुसार ही घरे मोडकळीस आलेल्या इमारतींमधील रहिवाशांना देता येत नाहीत, या नियमावर बोट ठेवले होते. यामुळे सत्ताधारी व प्रशासन यांच्यात तणाव निर्माण झाला होता. ‘लोकमत’ने या रहिवाशांची व्यथा व तणाव याबाबत सातत्याने वार्तांकन केले होते.
अखेर, पालकमंत्री शिंदे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन विशेष बाब म्हणून ही घरे नागूबाईच्या रहिवाशांना देण्याची परवानगी मिळवली. घरांकरिता अर्ज केलेल्या ४६ कुटुंबांना कचोरे येथील निवासनगरमध्ये तात्पुरता निवारा मिळाला. शिंदे यांनी घरांच्या चाव्या रहिवाशांना सुपूर्द केल्या. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे बेघर झालेल्या नागरिकांना निवारा देणे शक्य झाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांचे आभार मानतो, असे ते म्हणाले. रहिवाशांनी फडणवीस आणि शिंदे आगे बढो... असा नारा दिला.
घरांचा ताबा देताना घर, परिसर स्वच्छ ठेवा. घाण करू नका, असे आवाहन शिंदे यांनी केले. हा निवारा तात्पुरता असून नागूबाई निवासचे मालक भरत जोशी यांनी तातडीने इमारत उभी करावी. मूळ भाडेकरूंना घरे द्यावी, असे शिंदे यांनी बजावले. महापौर देवळेकर, सभागृह नेते मोरे याकरिता पाठपुरावा करतील, असेही ते म्हणाले. बीएसयूपीची घरे ही तात्पुरती मलमपट्टी असून क्लस्टर डेव्हलपमेंट हाच मोडकळीस आलेल्या इमारतींच्या पुनर्विकासाचा दूरगामी मार्ग असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

असा सुटला तिढा
दोन दिवसांपासून शिंदे यांनी मुख्यमंत्र्यांकडे त्या रहिवाशांना आधार मिळावा, यासाठी पाठपुरावा सुरू ठेवला होता.
बुधवारी सकाळी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव संजीवकुमार यांनी बीएसयूपीतील घरे तात्पुरत्या स्वरूपात विशेष बाब म्हणून देण्यास मुख्यमंत्र्यांनी होकार दिल्याचे शिंदे यांना कळवल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
घरांकरिता मंगळवारी रात्रीपर्यंत ४६ कुटुंबांनी अर्ज केले होते. घरे मिळत असल्याचे दिसल्यावर आणखी १५ कुटुबांनी बुधवारी अर्ज केले. त्यांनाही घरे दिली जाणार आहेत.

इमारत खचल्यापासून रहिवाशांना घरे मिळेपर्यंत ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केल्याबद्दल नागूबाईच्या रहिवाशांनी आभार व्यक्त केले. ‘लोकमत’ची भूमिका महत्त्वाची होती. अन्यथा, पर्यायी निवारा मिळण्यासाठी अडथळे आले असते, असे मत संजय पवार, प्रसाद भानुशाली, चिंतामणी शिदोरे, राशन सावला, संतोष गिट्टे आदींनी व्यक्त केले. महापौर देवळेकर यांनीही लोकमत’चा पाठपुरावा महत्त्वाचा असल्याचे नमूद केले.

दरम्यान, कचोºयात चावीवाटपाचा कार्यक्रम सुरू असतानाच धोकादायक नागूबाई निवासचा बहुतांश भाग पाडण्यात आला. गुरुवारी सकाळपर्यंत इमारत पूर्ण पाडण्यात येणार असल्याचे ‘ह’ प्रभाग अधिकारी अरुण वानखेडे यांनी सांगितले.

Web Title: Successful followers of 'BSUP' homes, Guardian Minister Shinde's success for 'Nagubai' families

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.