धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 03:02 AM2018-04-26T03:02:57+5:302018-04-26T03:02:57+5:30

डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले.

Smoke, four times the dust criteria | धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

धूर, धुलीकण निकषांपेक्षा चौपट

Next

कल्याण : आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला मार्चमध्ये लागलेल्या आगीच्या काळात हवेतील धूर व धुलीकणांचे प्रमाण हे जागतिक आरोग्य संघटनेने आखून दिलेल्या निकषांच्या तुलनेत चौपट होते. हवेची गुणवत्ता शून्य ते ५० दरम्यान अपेक्षित असताना ती २०० च्या घरात होती. याशिवाय, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निकषांनुसार हवेतील गुणवत्ता ३७ ते ७१ आवश्यक आहे. परंतु, ती देखील १३२ इतकी होती, असा तपशील माहिती अधिकारात उघड झाला आहे.
डम्पिंगला ६ मार्चला लागलेल्या आगीमुळे भडका उडाला. ती आटोक्यात आणण्यासाठी रात्रंदिवस कचऱ्यावर पाणी मारावे लागले. ७ मार्चला ती आणखी वाढल्याने शहरात धूरच धूर पसरला होता. तो नाकतोंडात गेल्याने नागरिक हैराण झाले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाला पाच दिवस लागले होते. आगीच्या काळात हवेतील प्रदूषण किती होते, याचा तपशील माहिती अधिकार चळवळीतील कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे मागितला होता. मंडळाच्या नऊ पानी अहवालानुसार हवेतील धूलिकण व धुराचे प्रमाण निषकांपेक्षा जास्त होते.
७ मार्चला मंडळाने डम्पिंगवर जाऊन तेथील हवेची गुणवत्ता मोजली होती. आगीमुळे हवेचे प्रदूषण किती होते, असा मुद्दा घाणेकर यांनी उपस्थित केला असला, तरी कल्याण-डोंबिवली शहरांतील प्रदूषणास कचरा, वाहनातून बाहेर पडणारा धूर, औद्योगिक कारखाने, भिवंडी-कल्याण-शीळ रस्त्यावरील वाहनांची रहदारी या गोष्टीही जबाबदार आहेत. त्यावर प्रकाश टाकणारा एक व्हिडीओ कुणाल यादव, संतोष शिंदे आणि निखिल करंबेळकर यांनी तयार करून नागरिकांच्या माहितीसाठी सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.
वायुप्रदूषण रोखण्यासाठी घाणेकर यांनी काही उपाययोजना केडीएमसीला सुचवल्या आहेत. त्याला महिना उलटला असून महापालिकेने कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. डोंबिवलीतील कारखान्यांतील रासायनिक सांडपाण्यामुळे होणाºया प्रदूषणावर मात करण्यासाठी एमआयडीसीने परदेशी कंपनीकडून सविस्तर अहवाल तयार केला आहे. १०० कोटींचा हा प्रकल्प असून त्याची निविदा लवकरच काढली जाणार आहे.
कल्याणमधील डम्पिंगचा मुद्दाही गंभीर आहे. कचरासमस्या ही पर्यावरणाशी संबंधित असल्याने त्याची याचिका राष्ट्रीय हरित लवादाकडे न्यायप्रविष्ट आहे. डम्पिंगची आग विझवण्यासाठी महापालिकेने पाइपद्वारे खाडीतून पाणी उचलले होते. कचºयाची दुर्गंधी रोखण्यासाठी उपाययोजना केली जाईल, असे आश्वासन आयुक्तांनी दिले होते. मात्र, त्यावर अद्याप उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे आजही सायंकाळी कल्याण रेल्वेस्थानकापर्यंत कचºयाचा उग्र दर्प जाणवतो.
मार्चमधील आगीनंतरही प्रशासनाने ठोस उपाययोजना केलेली नाही. १२ एप्रिलला डम्पिंगला पुन्हा आग लागली. तेव्हाही नागरिक धुरामुळे हैराण झाले होते. प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पाच कोटींची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात केली आहे. मात्र, त्याचा आराखडा तयार केलेला नाही. तसेच नेमका हा खर्च कशावर करणार, हे देखील स्पष्ट केलेले नाही. प्रदूषणाचे मोजमाप करणारे यंत्र डोंबिवलीतील पिंपळेश्वर येथे बसवले आहे. कल्याणमध्येही ते बसवण्याची मागणी होत आहे.

प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस
डम्पिंगच्या आगीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने पुन्हा महापालिकेस नोटीस बजावली आहे. त्यात कचºयावर शास्त्रोक्त प्रक्रिया, कचºयाचे वर्गीकरण केले जात नाही. कचºयाची दुर्गंधी तसेच आग लागू नये, यासाठी कोणत्याच उपाययोजना केलेल्या नसल्याकडे लक्ष वेधले आहे. उपाययोजना करून त्याची अंमलबजावणी न केल्यास प्रदूषण नियंत्रण कायद्यान्वये कारवाई केली जाईल, असे त्यात म्हटले आहे.

Web Title: Smoke, four times the dust criteria

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fireआग