धक्कादायक! मुंब्य्रातून १० महिन्यांच्या मुलाचे अपहरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 10:24 PM2019-02-04T22:24:09+5:302019-02-04T22:30:22+5:30

मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ भिक्षुकी मागणाऱ्या नऊ वर्षीय सोनिया या मुलीच्या ताब्यात असलेल्या दहा महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना रविवारी रात्री घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक मुंब्रा पोलिसांसह ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या मुलाचा शोध घेण्यात येत आहे.

 Shocking 10-month-old son kidnapped from Mumbra | धक्कादायक! मुंब्य्रातून १० महिन्यांच्या मुलाचे अपहरण

बुरखा पेहरावातील महिलेचे कृत्य

Next
ठळक मुद्दे रविवारी रात्रीची घटनाबुरखा पेहरावातील महिलेचे कृत्य गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही तपास सुरु

ठाणे : मुंब्रा रेल्वेस्थानकाजवळील शौचालयाजवळून सलमान अब्दुल खान या १० महिन्यांच्या मुलाचे अपहरण झाल्याची घटना ३ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी मुंब्रा पोलीस ठाण्यात ४ फेब्रुवारी रोजी अपहरणाची तक्रार मुलाचे वडील अब्दुल खान यांनी दाखल केली आहे. मुंब्रा पोलिसांसह गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ मार्फतही या प्रकरणाचा समांतर तपास करण्यात येत आहे.
अब्दुल खान यांच्या मेहुण्याच्या सोनिया या नऊवर्षीय मुलीसोबत सलमान मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरात गेला होता. ती त्याला या परिसरात फिरवून आणण्यासाठी रविवारी घेऊन गेली होती. एका बुरखाधारी महिलेने १० रुपये देऊन तिला दूध आणायला सांगितले. तिने त्यास नकार दिल्यानंतर तिला तिने कबाबपाव आणण्यास सांगितले. ती मुलगी ते आणण्यासाठी गेली, त्याचवेळी मुंब्रा रेल्वेस्थानकासमोरील रिक्षास्टॅण्डसमोरून १० महिन्यांच्या मुलाचे या महिलेने अपहरण केल्याची माहिती सोनियाने अब्दुल खान यांना दिली. तो बेपत्ता झाल्यानंतर खान कुटुंबीयांनी सर्वत्र शोघ घेतला. मात्र, तो आढळून आला नाही. याप्रकरणी खान यांनी मुंब्रा पोलीस ठाण्यात सोमवारी पहाटे ४ वा.च्या सुमारास अपहरणाची तक्रार दाखल केली आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुंब्रा पोलिसांबरोबर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकालाही तपास करण्याचे आदेश पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पासलकर आणि नितीन ठाकरे यांची पथके या मुलाचा आणि अपहरणकर्त्यांचा शोध घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title:  Shocking 10-month-old son kidnapped from Mumbra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.