"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 01:33 PM2024-05-14T13:33:13+5:302024-05-14T13:34:00+5:30

Loksabha Election - उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्याचा विचार करत होते, असा दावा सुनील तटकरेंनी केला. त्यावर उद्धव ठाकरे शब्दाला पक्के, त्यांनी मविआ सरकार प्रदीर्घ काळ चालवण्याचं ठरवलं होते असं संजय राऊतांनी सांगितले. 

Narendra Modi wanted Uddhav Thackeray to come back with BJP - Sanjay Raut | "दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"

"दिल्लीच्या 'त्या' बैठकीत मोदींनी ठाकरेंना पुन्हा एकत्र येण्याची ऑफर दिली होती"

मुंबई - Sanjay Raut on BJP ( Marathi News ) दिल्लीत तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी अशोक चव्हाण, अजित पवारही सोबत होते. या बैठकीनंतर मोदी-ठाकरेंची चर्चा झाली. त्या चर्चेत मोदींनी पुन्हा एकत्र येण्याची ऑफर उद्धव ठाकरेंना दिली होती असा दावा संजय राऊतांनी केला आहे.

संजय राऊतांनी म्हटलं की, सुनील तटकरेंनी केलेला दावा चुकीचा आहे. मविआत समन्वय असावा यासाठी आम्ही वारंवार भेटत होतो. प्रत्यक्ष कॅबिनेटमधले काम वेगळे असते, बाहेर कार्यकर्ते काम करतात, नेतृत्व करत असतात, त्यामुळे एकमेकांसोबत अदान प्रदान केले पाहिजे. पण पंतप्रधानाच्या भेटीवेळी उद्धव ठाकरेंसोबत अशोक चव्हाण, अजित पवारही होते. काही काळ ते दोघे बाहेर थांबले, त्यानंतर मोदी-ठाकरे चर्चेबाबत अनेक गोष्टी बाहेर आल्या. भाजपासोबत नक्की का युती तुटली यावर दोन नेत्यांमध्ये चर्चा झाली. हे स्वत: उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. मोदींच्या मनात असं आहे आपण पुन्हा एकत्र यायला हवे असं उद्धव ठाकरेंनी आम्हाला सांगितले. त्यात चुकीचे काही नाही असं राऊतांनी म्हटलं. 

त्याशिवाय पंतप्रधानांसोबतच्या चर्चेची बातमीही प्रसिद्ध माध्यमात आली होती. अजित पवार, सुनील तटकरे, मी आम्ही जेव्हा बसलो, तेव्हा राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली. सहकारी म्हणून आम्ही बैठकीला बसलो होतो. मी अजित पवारांनाही विचारले, तुम्ही पंतप्रधानांना भेटला तुमचं काय बोलणं झाले? पंतप्रधान आणि उद्धव ठाकरेंमध्ये काही ठरलं नव्हते. भाजपासोडून हा नवीन मार्ग का स्वीकारावा लागला, आमची फसगत कशारितीने झाली, हे उद्धव ठाकरेंनी मोदींना सांगितले. ही माहिती माझ्याकडे आहे असं संजय राऊतांनी सांगितले. 

दरम्यान, आज जे सर्व सांगितलं जातं, त्या चर्चा जाहीरपणे झाल्या नाहीत. पडद्यामागे कोण काय करतंय, भेटत होते, याविषयी पुरावे नसतात. सत्य-असत्य सांगू शकत नाही. अजित पवार नेहमी सांगतात, त्यांना शरद पवारांनी भाजपासोबत जायचं आहे, तुम्ही चर्चा करा, असं म्हणतात. परंतु शरद पवार हे नाकारतात. ज्या लोकांनी पक्षांतरे केली, पक्ष सोडले, ते जर अशी विधाने करत असतील तर त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा? शिवसेनेने कुणाशी चर्चा केली नाही. २०१९ निकालानंतर शिवसेनेने जाहीरपणे काँग्रेस-राष्ट्रवादीशी चर्चा केली. पडद्यामागून केली नाही. इतक्या वर्षानंतर त्या काळात आम्ही कुणाशी काय चर्चा केली, यावर मी विश्वास ठेवत नाही असं संजय राऊतांनी स्पष्ट केले. ABP माझाच्या मुलाखतीत त्यांनी हे भाष्य केले. 

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के...

उद्धव ठाकरे शब्दाला पक्के असलेले गृहस्थ आहेत. उद्धव ठाकरेंनी कधीही आपला शब्द फिरवला आहे हे ते राजकारणात आल्यापासून दाखवा. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती तीच उद्धव ठाकरेंची आहे. एक सरकार बनवलं असताना त्या सरकारशी काडीमोड घेऊन असा कुठलाही निर्णय उद्धव ठाकरे घेतील असं मला वाटत नाही. त्यांनी एकदा ठरवलं होते, या मार्गाने पुढे जायचे आहे. भाजपाने दिलेला शब्द पाळला नाही, आपला विश्वासघात केला. हे आपल्याला पटलं नाही. ३ पक्षाने मिळून स्थापन केलेले सरकार आपल्याला प्रदीर्घ चालवायचे आहे हे त्यांनी ठरवलं होते असं सांगत संजय राऊतांनी सुनील तटकरेंचा दावा फेटाळून लावला. 

Web Title: Narendra Modi wanted Uddhav Thackeray to come back with BJP - Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.