ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली- एकनाथ शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 10:50 PM2018-10-31T22:50:35+5:302018-10-31T22:51:06+5:30

ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा शहापूर येथे नुकताच आयोजित केला होता.

Shiv Sena reached the grass root level due to the renunciation of senior Shiv Sainiks - Eknath Shinde | ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली- एकनाथ शिंदे

ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचली- एकनाथ शिंदे

Next

कसारा : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाचे पालन करत धर्मवीर आनंद दिघेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावत ठाणे जिल्ह्यासह नाशिक ग्रामीण भागात शिवसेना पोहोचवण्याचे काम ज्येष्ठ शिवसैनिकांच्या त्यागामुळेच शक्य झाल्याचे प्रतिपादन ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी शहापूर येथे आयोजित ज्येष्ठ शिवसैनिक सन्मान सोहळ्यात केले.

ठाणे जिल्हा उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे यांनी शहापूर तालुक्यातील ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान सोहळा शहापूर येथे नुकताच आयोजित केला होता. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ना. शिंदे उपस्थित होते. उपस्थितांना मार्गदर्शन करताना शिंदे यांनी अनेक उदाहरणे दिली. शिवसेनाप्रमुखांच्या कृपाशीर्वादाने आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रेरणेने माझ्यासारखा शाखाप्रमुख असलेला शिवसैनिक नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, कॅबिनेट मंत्री आणि एका जिल्ह्याचा पालकमंत्री होऊ शकतो अन् हे फक्त शिवसेनाच करू शकते.
आज संपूर्ण महाराष्ट्रात शिवसेनेचा झंझावात आहेच. भारतभर शिवसेनेने आपल्या शाखा स्थापल्या आहेत. तरीही, शिवसेना आणि ठाणे हे वेगळे समीकरण आहे. ठाणे जिल्ह्यातील शिवसैनिक धर्मवीर आनंद दिघेंच्या तालमीत तयार झालेला आहे. रात्रंदिवस एक करून दिघेसाहेबांच्या खांद्याला खांदा लावत समाजकारण करणाऱ्या शिवसैनिकांनी प्रसंगी अनेक यातना भोगल्या. पोलिसांचा मार खाल्ला.
कुटुंबापासून दुरावले, असे अनेक प्रसंग आहेत. या ज्वलंत इतिहासाचे साक्षीदार असलेल्या ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान करण्यात येतोय, ही भाग्याची गोष्ट आहे. परंतु, हा सन्मान म्हणजे पक्षातून निवृत्ती मुळीच नसून ज्येष्ठ शिवसैनिकांच्या अनुभवाची आणि मार्गदर्शनाची साथ युवा पिढीला मिळावी. तसेच ज्येष्ठ सैनिकांच्या कार्यपद्धतीची माहिती शिवसैनिकांना मिळावी, यासाठी हा सन्मान असल्याचे स्पष्ट केले.

अन् ज्येष्ठ शिवसैनिकांना अश्रू अनावर झाले
पालकमंत्री शिंदे यांच्या हस्ते सन्मान घेण्याअगोदर प्रास्ताविक करणाºया काशिनाथ तिवरे यांनी शहापूर तालुक्यातील कसारा, वासिंद, किन्हवली, डोळखांब, वाशाळा, ठाकणे यासह अन्य विभागांत कार्य केलेल्या प्रत्येक ज्येष्ठ शिवसैनिकांची ओळख करून देत त्या शिवसैनिकांनी पक्षासाठी केलेला त्याग, भोगलेल्या यातनांचा पाढा शिंदेंसमोर मांडला. जुन्या आठवणींना उजाळा मिळत असताना केलेल्या त्यागामुळे एका मंत्र्याच्या हस्ते आपला सन्मान होतो, हे पाहून उपस्थित ज्येष्ठ शिवसैनिकांचे अश्रू अनावर होत होते.
या सोहळ्यासाठी उपसंपर्कप्रमुख संतोष शिंदे, जिल्हाप्रमुख प्रकाश पाटील, तालुकाप्रमुख मारुती धिर्डे, उपजिल्हाप्रमुख शंकर खाडे, काशिनाथ तिवरे व महिला आघाडीच्या रश्मीताई निमसे, गुलाब भेरे, रजनी शिंदे, शहापूर नगराध्यक्षा अश्विनी अधिकारी, पं.स. सभापती शोभाताई मेंगाळ, जि.प. अध्यक्षा मंजूषा जाधव, मा.आ. दौलत दरोडा, भिवंडी आ. शांताराम मोरे उपस्थित होते.

Web Title: Shiv Sena reached the grass root level due to the renunciation of senior Shiv Sainiks - Eknath Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.