विकास प्रकल्पांच्या दिरंगाईवर सी-टाइप निविदेचा तोडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2019 12:35 AM2019-01-29T00:35:42+5:302019-01-29T00:35:50+5:30

केडीएमसीचे एकमत; स्थायी समितीत झाली चर्चा

Setting up C-Type Troubles for the Duration of Development Projects | विकास प्रकल्पांच्या दिरंगाईवर सी-टाइप निविदेचा तोडगा

विकास प्रकल्पांच्या दिरंगाईवर सी-टाइप निविदेचा तोडगा

Next

कल्याण : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग आदी सरकारी विभागांमध्ये सी-टाइप निविदा मागवल्या जातात. मात्र, कल्याण-डोंबिवली या एकमेव महापालिकेत या प्रकारच्या निविदा मागवल्या जात नाहीत. त्यामुळे प्रकल्प वेळेत पूर्ण होत नसल्याने त्यांचा खर्च वाढतो. तसेच प्रकल्पाची डिझाइनही चुकीची होते. या सगळ्यावर तोडगा काढण्यासाठी या पुढील विकासकामांच्या निविदा सी-टाइप पद्धतीने काढण्यावर प्रशासनाचे एकमत झाले आहे.

शहाड-टिटवाळा रस्त्यावरील उल्हास नदीवरील जुन्या पुलाला समांतर असा नवा पूल बांधण्याचा विषय शुक्रवारी स्थायी समितीच्या सभेत चर्चेला आला होता. या कामासाठी सी-टाइप निविदा मागवण्याचा विषय पुढे आला. महापालिकेने यापूर्वी कल्याण-विठ्ठलवाडी रेल्वे स्थानकादरम्यान ‘एफ’ केबिन येथे रेल्वे उड्डाणपूल तयार केला आहे. तसेच उल्हासनगर-कल्याणला जोडणारा वालधुनी रेल्वे उड्डाणपूल पूल आणि ठाकुर्ली रेल्वे उड्डाणपूल बांधले आहेत. या पुलांचे डिझाइन ‘एस’ आकाराचे आहेत. या प्रकल्पांसाठी डिझाइन समंत्रकांकडून करून घेतले होते. तर त्याचे विकासकाम अन्य कंत्राटदार कंपनीकडून केले होते. कंत्राटदार व डिझाइन तयार करणाऱ्यांमध्ये समन्वय नसल्याने कामाला सुरुवात होण्यास विलंब होतो. तसेच काम चुकीच्या पद्धतीने केले जाते.

परिणामी प्रकल्पाचा खर्च वाढत असल्याचा त्याचा भुर्दंड महापालिकेस सोसावा लागतो. त्यावर तोडगा काढण्यासाठी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी सी-टाइप पद्धतीची निविदा काढावी, अशी सूचना प्रशासनाला केली आहे. शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली यांनीही त्यांची सूचना मान्य केली आहे. सी-टाइप निविदा पद्धतीत कंत्राटदारानेच प्रकल्पाची डिझाइन करणे अपेक्षित आहे. ‘व्हीजेटीआय’सारख्या नामांकित संस्थेकडून त्याची मान्यता घेऊन मगच कामाला सुरुवात केली गेली पाहिजे, असे सी-टाइप निविदेत अपेक्षित आहे.

दरम्यान, महापालिकेने आंबिवली-शहाड रेल्वे स्थानकादरम्यान वडवली रेल्वे उड्डाणपूल उभारण्याचे कंत्राट दिले आहे. मात्र, १० वर्षे होऊनही त्याचे काम सुरूच आहे. या कामाची सी-टाइप निविदा न निघाल्याने पुलाचे काम रखडले आहे, याकडे म्हात्रे यांनी लक्ष वेधले आहे.

समंत्रक - कंत्राटदारांत समन्वयाचा अभाव
केडीएमसीत स्वतंत्र प्रकल्प डिझाइन तयार करणारा विभाग नाही. त्यामुळे प्रकल्पाच्या डिझाइनसाठी समंत्रक नेमावे लागतात. मात्र काही वेळेस ते काम अर्धवट सोडून देतात. त्यामुळे समंत्रक व कंत्राटदार यांच्यात समन्वय राहत नाही.
सी-टाइप निविदा पद्धतीत कंत्राटदारच डिझाइन बनवत असल्याने वेळ कमी लागतो. तसेच काम लवकर सुरू होऊन ते लवकर मार्गी लागण्यास मदत होते. त्यामुळे कंत्राटदार कंपनीला कामावर लक्ष केंद्रित करता येते. सी-टाइप निविदेच्या या जमेच्या बाजू असल्याचे सांगितले जाते.

Web Title: Setting up C-Type Troubles for the Duration of Development Projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.