बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटची पुनरावृत्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2019 12:39 AM2019-03-24T00:39:54+5:302019-03-24T00:40:05+5:30

दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा बदलापूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे.

 Repeat of Sagar Investment in Badlapur | बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटची पुनरावृत्ती

बदलापूरमध्ये सागर इन्व्हेस्टमेंटची पुनरावृत्ती

Next

अंबरनाथ : दोन वर्षांपूर्वी बदलापुरातील बहुचर्चित सागर इन्व्हेस्टमेंटमध्ये शेकडो गुंतवणूकदारांची लाखोंची फसवणूक झाली होती. हे प्रकरण ताजे असतानाच पुन्हा बदलापूरमध्ये नवा घोटाळा समोर आला आहे. मुंबादेवी फंडाच्या माध्यमातून नागरिकांना जास्त व्याज देण्याच्या आमिषावर ही फसवणूक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार ५८ नागरिकांची मिळून एकूण एक कोटी ६५ लाखांची फसवणूक झाली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
बदलापूरमधील सागर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या माध्यमातून सुहास समुद्र आणि त्यांचा मुलगा श्रीराम यांनी बदलापुरातच नव्हे, तर ठाणे आणि पुणे जिल्ह्यांतील गुंतवणूकदारांचे कोट्यवधी लंपास केले. जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी पडून शेकडो गुंतवणूकदारांनी या योजनेत गुंतवणूक केली होती. अखेर, हा घोटाळा उघड झाल्यावर अनेकांची फसवणूक झाल्याचे उघड झाले. अखेर, याप्रकरणी आरोपींविरोधात गुन्हाही दाखल झाला. अटकसत्र झाल्यावर आजही गुंतवणूकदार न्यायालयात न्याय मिळण्याची प्रतीक्षा करत आहे.
बदलापूरमध्ये या प्रकरणाची सर्वत्र चर्चा झालेली असतानाही पुन्हा सागर इन्व्हेस्टमेंटसारखाच प्रकार घडला आहे. बदलापूरच्या संभाजीनगर भागात राहणारे प्रदीप दिनकर कंदलकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी सविता देशमुख आणि दत्तात्रेय देशमुख यांनी जास्त व्याजाचे आमिष दाखवत कंदलकर यांच्याकडून विशिष्ट रक्कम ठेव म्हणून घेतली. त्याचे व्याजही वेळेवर दिले. वेळेत व्याज मिळत असल्याने कंदलकर यांनी आणखी जास्त रक्कम या मुंबादेवी फंडात गुंतवली. १२ लाख ६८ हजार रुपये त्यांनी बँकेतून आरोपीच्या खात्यात टाकले. तर, उर्वरित २३ लाख ३२ हजार रुपये रोख स्वरूपात गुंतवणूक करण्यास भाग पाडले. व्याज मिळणार या आशेवर त्यांनी ही रक्कम दिली. मात्र, महिनाभरानंतर त्यांना व्याजाची रक्कम मिळत नसल्याने त्यांनी आरोपींकडे आपले पैसे परत देण्याची मागणी केली. पैशांच्या मोबदल्यात आरोपी देशमुख यांनी त्यांची चारचाकी गाडी त्यांच्या नावावर करून देण्याचे मान्य केले. मात्र, ती गाडीही दिली नाही. अखेर, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच कंदलकर यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात कंदलकर हे एकमेव गुंतवणूकदार नसून देशमुख यांच्याविरोधात बदलापुरातील ५८ गुंतवणूकदारांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी फसवणुकीचा आकडा हा एक कोटी ६५ लाखांच्या घरात असल्याचे स्पष्ट केले आहे.

प्राथमिक तपासात ५८ जणांचे तक्रार अर्ज आले आहेत. त्यावरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आणखी कुणाची या प्रकरणात तक्रार असेल, तर त्यांनी बदलापूर पोलीस ठाण्यात तक्रार द्यावी. याप्रकरणी किती जणांची फसवणूक झाली आहे, याचा तपास सुरू आहे.
- लक्ष्मण सारिपुत्र, वरिष्ठ पोलीस निरीक्षक

Web Title:  Repeat of Sagar Investment in Badlapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.