देश सशक्त करण्यासाठी त्यांनी केली ५,३०० किमीची पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:02 AM2019-04-22T02:02:11+5:302019-04-22T07:11:48+5:30

साबरमती व्हाया कन्याकुमारी ते कोलकाता, पाच महिने १० दिवसांत पालथे

Promotion of Panchasutra to empower the country; 5,300 km footpath of Bhuskutte | देश सशक्त करण्यासाठी त्यांनी केली ५,३०० किमीची पायपीट

देश सशक्त करण्यासाठी त्यांनी केली ५,३०० किमीची पायपीट

Next

- जान्हवी मोर्ये

डोंबिवली : शांतता, पर्यावरण, मूल्याधिष्ठित शिक्षण, मानवतावादी दृष्टिकोन, स्त्रियांना समानतेची वागणूक, ही पाच तत्त्वे प्रत्येकाने अंगीकारल्यास देश सशक्त होईल, हा संदेश देण्यासाठी डोंबिवलीतील विद्याधर भुस्कु टे यांनी वयाच्या ६७ व्या वर्षी अहमदाबाद (साबरमती आश्रम) ते कन्याकुमारी आणि कन्याकुमारी ते कोलकाता, असा पायी प्रवास त्यांनी १२ एप्रिलला पूर्ण केला. पाच हजार ३०० किमीचे हे अंतर पूर्ण करण्यासाठी त्यांना पाच महिने १० दिवस लागले.

भुस्कुटे या पदयात्रेसाठी २८ आॅक्टोबरला डोंबिवलीहून निघाले होते. ३१ ऑक्टोबरला त्यांनी साबरमती आश्रम येथून चालण्यास प्रारंभ केला. या पदयात्रेचा मार्ग किनारपट्टीलगतचा होता. त्यासाठी सहा ते सात महिने लागतील, असा त्यांचा अंदाज होता. मात्र, त्यांनी ही पदयात्रा पाच महिने १० दिवसांत पूर्ण केली. साबरमती आश्रम येथून ते कन्याकुमारीला गेले. तेथे त्यांनी स्वामी विवेकानंद यांचे आशीर्वाद घेतले. तेथून ते चालत पश्चिम बंगालजवळ रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतिनिकेतन येथे गेले. हे पाच हजार ३०० किमीचे अंतर कापण्यासाठी ते दररोज ३५ किमी अंतर चालत असत. या प्रवासात सर्वात जास्त ४८ किमीचे अंतर त्यांनी एक दिवस कापले होते. महात्मा गांधीजींचे विचार, भारत जोडो, स्वामी विवेकानंदांचे विचार आणि टागोरांचे विचार आजच्या पिढीत रुजावे, या हेतूमुळे त्यांची ही पदयात्रा महत्त्वाची ठरली.

पदयात्रेत भुस्कुटे पहाटे ३.३० वाजता चालण्यास सुरुवात करत. ८ वाजता ते चहा व नाश्ता घेत. त्यानंतर, पुन्हा ११.३० वाजेपर्यंत चालत. त्यानंतर, जेवणानंतर ते थोडी विश्रांती घेत असत. दुपारी ४.३० वाजता पुन्हा चालायला ते सुरुवात करत ते थेट रात्री ९ वाजता ते थांबत असत. या काळात ते दुपारी जेवणात पोळीभाजी तर, रात्रीच्या जेवणात खिचडी, वरणभात असा हलका आहार ते घेत होते. धणे-जिरे-पाणी, ड्रायफु्र ट्स व गूळ त्यांनी सेवन केले. मधुमेहामुळे त्यांच्या खाण्यावर मर्यादा होत्या. आधीच्या पदयात्रेपेक्षा समुद्रकिनाऱ्याच्या भागातील मार्ग कठीण होता. कारण, तेथील वातावरण दमट होते. या प्रवासात शाळा-महाविद्यालये, नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. आतापर्यंत त्यांनी १३ हजार ५०० किलोमीटर पायी प्रवास केला आहे. त्यासाठी त्यांना २९ लाखांचा खर्च आला आहे. आयुष्याची मिळकत त्यांनी या कार्यासाठी वापरली आहे.

पुडुचेरी येथे अपघात
भुस्कुटे यांना या यात्रेदरम्यान पुडुचेरी (पॉँडिचेरी) येथे एका दुचाकीने धडक दिली. त्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला. खांदा फ्रॅक्चरही झाला. ते आठ दिवस रुग्णालयात होते. परंतु, आपले मिशन पूर्ण झाल्याशिवाय घरी न परतण्याचा निर्धार त्यांनी कुटुंबीयांकडे व्यक्त केला.
रुग्णालयातून डिस्चार्ज मिळताच त्यांनी पुन्हा जेथे अपघात झाला, तेथूनच पुन्हा चालणे सुरू केले. रुग्णालयातील आराम पुढच्या प्रवासाला बळ देणारा ठरला. ध्येयाने पछाडलेले असल्यामुळे आपण थकलो आहे, असे कधी वाटलेच नाही, असे भुस्कुटे यांनी सांगितले.

चालण्याचा वसा
भुस्कुटे हे बँक आॅफ इंडियामधून निवृत्त झाल्यावर त्यांच्या सुनेची पोस्टिंग काश्मीरला झाली होती. त्यामुळे ते तेथे गेले होते. एके दिवशी गार्डनमध्ये फिरताना आपणही देशासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार मनात आला. त्यांच्या घरातच सर्वजण स्वातंत्र्यसैनिक होते. त्यामुळे निवृत्तीनंतर त्यांनी चालण्याचा वसा घेतला.

यापूर्वी केल्या दोन पदयात्रा, अनेक विक्रमांची नोंद
भुस्कुटे यांनी आतापर्यंत दोन पदयात्रा पूर्ण केल्या आहेत. त्यात एका पदयात्रेत श्रीनगर ते कन्याकुमारीदरम्यानचा तीन हजार ८८९ किमीचा प्रवास, तर दुसºया यात्रेत किबिथू (अरुणाचल प्रदेश) ते पोरबंदर हा चार हजार ८९ किमीचा असा एकूण आठ हजार किमीचा प्रवास केला होता.
या प्रवासांतील अनुभवांवर आधारित अनुक्रमे ‘एका विद्याधराची भ्रमणगाथा’ आणि ‘एक झपाटलेला’ ही पुस्तके लिहिली. त्यांच्या पहिल्या पदयात्रेची नोंद ‘लिम्का बुक आॅफ रेकार्ड’मध्ये झाली. या पदयात्रेत ते दररोज ३० ते ३२ किमी अंतर चालत असत. तर, एके दिवशी ४७ किमी अंतर पार केले.
पहिली पदयात्रा त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी १२५ दिवसांत पूर्ण केली. तर, दुसरी पदयात्रा त्यांनी १२२ दिवसांत पूर्ण केली. या पदयात्रेची नोंद लिम्का बुक आॅफ रेकार्ड, एशिया बुक आॅफ रेकार्ड, इंडिया बुक आॅफ रेकार्डमध्ये झाली आहे.

Web Title: Promotion of Panchasutra to empower the country; 5,300 km footpath of Bhuskutte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.