पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2018 09:31 PM2018-03-20T21:31:17+5:302018-03-20T21:31:17+5:30

ठाण्यात लुटीसाठी आलेल्या टोळीला पकडल्यानंतर पंढरपूरातील नगरसेवचाच्या खूनाचा छडा लावण्यात ठाणे खंडणी विरोधी पथकाला यश आले आहे. विनायक कांबळे याच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुली या टोळीने दिली आहे.

 Pandharpur murder case: they took revenge of Vinayak's murder by Sandeep's murder | पंढरपूर खून प्रकरण: संदीपच्या हत्येतून त्यांनी काढला विनायकच्या खुनाचा वचपा

दोघेजण झाले पसार

Next
ठळक मुद्देपैसे संपल्यानेच केली दरोड्याची तयारीदोघेजण झाले पसारचौघांना सात दिवसांची पोलीस कोठडी

ठाणे : पंढरपूरचे अपक्ष नगरसेवक संदीप पवार यांच्या खूनातून विनायक कांबळे या आपल्या साथीदाराच्या खुनाचा वचपा काढल्याची कबुलीच अक्षय उर्फ बबलू सुरवसे आणि त्याच्या साथीदारांनी ठाणे पोलिसांना दिली आहे. या चौघांनाही सात दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.
ऐन पाडव्याच्या दिवशीच पंढरपूरमध्ये दिवसाढवळया नगरसेवक पवार यांच्यावर गोळी झाडून सहा जणांचे हे टोळके पसार झाले होते. त्यांच्याकडील पैसे संपल्यामुळे ठाण्यातील माजीवडा येथील पेट्रोलपंप लुटून जे पैसे मिळतील ते घेऊन घोडबंदरमार्गे पसार होण्याची त्यांची योजना होती. एक टोळके पेट्रोल पंप लुटीसाठी ठाण्यात येणार असल्याची टीप खंडणी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांना मिळाली होती. त्याच आधारे दोन पिस्टलसह १९ मार्च रोजी ज्युपिटर रुग्णालयाच्या परिसरातून अक्षय सुरवसे (२२), पुंडलिक वनारे (३३), मनोज शिरसीकर (३२) आणि भक्तराज धुमाळ (२६, सर्व रा. पंढरपूर) या चौघांना अतिरिक्त पोलीस आयुक्त मकरंद रानडे, उपायुक्त अभिषेक त्रिमुखे, निरीक्षक शर्मा, निरीक्षक राजकुमार कोथमिरे यांच्या मार्गदर्शनाखाली विकास घोडके, उपनिरीक्षक विकास बाबर, अविनाश महाजन, विकास कुटे, एच. ए. ढोले आदींच्या पथकाने अटक केली. अधिक चौकशीमध्ये त्यांच्याविरुद्ध खुनाचा प्रयत्न, हाणामारी असे गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद आहेत. त्यांच्याकडून दोन पिस्तुलसह मिरचीची पूड, नॉयलॉनची दोरी अशी दरोडयाची सामुग्री जप्त केली आहे. टोळीयुद्धातून नगरसेवक पवार यांच्यावर पाच गोळया झाडून खून केल्याची त्यांनी कबुली दिली. खूनानंतरही या टोळीने त्यांच्यावर चॉपरने हल्ला केला होता. त्यांचे अन्य दोन साथीदार संदीप आधटराव आणि विकास उर्फ विकी मोरे हे मात्र पसार झाले आहेत. ठाण्यातून ही टोळी गुजरातला पसार होण्याच्या मार्गावर होती, तत्पूर्वीच ठाणे पोलिसांनी त्यांच्यावर झडप घालून अटक केली.
खुनाचा वचपा काढला...
नगरसेवक संदीप पवार आणि अक्षय उर्फ बबलू सुरवसे यांच्यात गेल्या काही वर्षांपासून वैमनस्य आहे. अक्षयवर पवार यांच्या टोळीकडून काही दिवसांपूर्वी हल्ला झाला होता. याशिवाय, अक्षयच्या टोळीतील विनायक कांबळे याचा पाच वर्षांपूर्वी खून झाला होता. हा खून संदीपच्या टोळीनेच केल्याचा अक्षयच्या टोळीचा आरोप होता. याच संशयातून आता त्याचाही खून करून या टोळीने वचपा काढल्याची माहिती तपासामध्ये समोर येत असल्याचे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

Web Title:  Pandharpur murder case: they took revenge of Vinayak's murder by Sandeep's murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.