आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2018 05:47 AM2018-11-16T05:47:54+5:302018-11-16T05:48:19+5:30

गलिच्छ आणि मोडकी शौचालये : स्वच्छता अभियानाला केडीएमसीने फासला हरताळ

Narayakanya of the 'Aero' area is enjoying | आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

आयरे प्रभागातील ‘ते’ भोगताहेत नरकयातना

Next

डोंबिवली : स्वच्छता अभियानांतर्गत कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून पूर्वेकडील आयरेगाव प्रभागातील सहकार आणि समतानगरमध्ये काही महिन्यांपूर्वीच बांधण्यात आलेल्या शौचालयांची पुरती दयनीय अवस्था झाली आहे. मोडके दरवाजे, स्वच्छतेअभावी दुर्गंधी, किडेअळ्यांचे साम्राज्य याठिकाणी पाहावयास मिळत आहे. पायवाटांचीही दुरवस्था झाली असून पिण्याच्या पाण्याची बोंब असताना शौचालय स्वच्छतेकरिता कुठून पाणी मिळणार, अशी परिस्थिती असल्याने रहिवासी अक्षरश: नरकयातना भोगत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान, हगणदारीमुक्त शहरांचा नारा दिला. प्रत्यक्षात कल्याण-डोंबिवली शहरे हगणदारीमुक्त झाली का, असा सवाल रिपाइंचे शहराध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी उपस्थित केला होता. शहरांमध्ये स्वच्छता अभियानाचा देखावा केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला होता. हे वास्तव आयरेगाव प्रभागातील सहकारनगर आणि समतानगरमध्ये पाहावयास मिळत आहे. येथील लोकवस्ती हजारोंच्या आसपास असून २०००-२००५ मध्ये तत्कालीन नगरसेवक काळू भगत यांच्या पुढाकाराने सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली होती. दोन वर्षांपूर्वीच त्यांची दुरुस्ती करण्यात आली होती. परंतु, दुरुस्ती करण्यात आलेल्या शौचालयांचे ‘स्वच्छ भारत अभियानां’तर्गत सहा महिन्यांपूर्वी पुन्हा नूतनीकरण करण्यात आले. मात्र, सद्य:स्थितीत त्यांची पुरती दुरवस्था झाली असून यानिमित्ताने निकृष्ट बांधकामांचा नमुना पाहावयास मिळत आहे. शौचालयांची दैनंदिन स्वच्छता होत नसल्याने लोकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. त्याचबरोबर साठणाऱ्या मैल्यामुळे किडे आणि अळ्यांचे साम्राज्य पसरले आहे. सफाई कामगार कित्येक दिवसांपासून फिरकले नसल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. शौचालयांना आलेली अवकळा पाहता नैसर्गिक विधिकरिता बाजूकडील रेल्वे ट्रॅकचाच आधार घ्यावा लागत असल्याचे लोकांनी सांगितले. अशावेळी अपघात झाला तर त्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल स्थानिकांनी उपस्थित केला. यासंदर्भात मलनि:सारण विभागाचे कार्यकारी अभियंता बबन बरफ तसेच स्थानिक नगरसेवक मंदार टावरे यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

कमी दाबामुळे पाणीही मिळेना
च्केडीएमसीच्या क्षेत्रात पाणीकपात लागू झाल्याने मंगळवारी पाणीपुरवठा बंद असतो. परंतु, अन्य दिवशीही कमी दाबाने पाणी सोडले जात असल्याने तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असल्याचे स्थानिक महिला रहिवासी शाहीन पटेल यांनी सांगितले.

च्स्वतंत्र जलवाहिनी असूनही पिण्याच्या पाण्याची बोंबाबोंब कायम असल्याचे त्या म्हणाल्या. दरम्यान, पायवाटा नादुरुस्त झाल्याने चालणेही जिकिरीचे बनल्याचे अन्य रहिवाशांकडून सांगण्यात आले. परिसरातील पथदिवेही बंद असल्याकडे लक्ष वेधण्यात आले.

...तर आंदोलनाशिवाय पर्याय नाही
स्वच्छता अभियानाच्या नावाखाली जी शौचालयांची कामे केली आहेत, ती एक प्रकारे धूळफेक असून राजा सुस्त आणि प्रजा त्रस्त, असे काहीसे चित्र या दोन्ही वस्त्यांची पाहता येते, असे मत आरपीआय आठवले गटाचे लालसाहब जमादार यांनी व्यक्त केले. वारंवार यासंदर्भात पत्रव्यवहार केला आहे. यापुढे परिस्थिती सुधारली नाही, तर आंदोलन छेडण्याशिवाय पर्याय नाही, असा इशारा जमादार यांनी दिला.
 

Web Title: Narayakanya of the 'Aero' area is enjoying

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.