विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 11:53 PM2019-01-18T23:53:45+5:302019-01-18T23:53:59+5:30

टोरंट कंपनीला विरोध : ठाण्यात काढणार सर्वपक्षीय मोर्चा

Mumbra today closed its notice against the privatization of electricity | विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

विजेच्या खाजगीकरणाविरोधात आज मुंब्रा, कळव्यात बंद

Next

ठाणे : टोरंट कंपनीविरोधात शनिवारी कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, देसाईगाव येथे बंदची हाक देऊन पारसिकनगर ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात येणार आहे. शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस हे पक्ष या मोर्चासाठी आग्रही असले तरी येथील बऱ्याच नागरिकांना सुरळीत वीज मिळणार असेल, तर हे खाजगीकरण आवश्यक वाटत आहे. कळवा-मुंब्य्रात राष्ट्रवादीचे नगरसेवक जास्त असून आगामी निवडणुकीत फटका बसण्याची शक्यता असल्याने राष्ट्रवादीमध्ये या मोर्चाबाबत शंका उपस्थित होत आहे.


वीजवितरण व वीजबिलवसुलीसाठी टोरंट या खाजगी कंपनीला राज्य शासनाने कंत्राट दिले आहे. २६ जानेवारीपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. या कंपनीमुळे सर्वसामान्य ग्राहकाला वीजबिलाचा मोठा भुर्दंड बसणार असून शासनाच्या महसुलातही मोठ्या प्रमाणात तूट येणार आहे. भिवंडी शहरातील टोरंट या कंपनीच्या कारभाराचा वाईट अनुभव असल्याने कळवा, खारीगाव, पारसिकनगर, मुंब्रा, दिवा, शीळ, दिवागाव, देसाई आणि परिसरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी समन्वय समिती स्थापन केली आहे. तिच्या नेतृत्वाखाली शनिवारी सकाळपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या परिसरात बंद पाळण्यात येणार आहे. सकाळी १०.३० वाजता याविरोधात पारसिक बँकेच्या मुख्य कार्यालय येथील ९० फूट रोड ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढण्यात येणार आहे. तो शांततेत काढावा व कायदा सुव्यवस्था राखावी, असे आवाहन दशरथ पाटील यांनी केले आहे.


दरम्यान, वाहतूक पोलिसांनी हा मोर्चा लक्षात घेऊन त्याच्या मार्गातील वाहतुकीत बदल केला आहे. मुंब्रा बायपास तसेच मुंब्रा परिसरातून खारेगाव-कळवा रोडमार्गे शिवाजी चौकाकडे येणाºया सर्व वाहनांना पारसिक रेतीबंदर रोड येथे प्रवेशबंदी करून ती सरळ खारेगाव टोलनाकामार्गे पुढे नेण्याबाबत पर्यायी मार्ग सुचवला आहे. याव्यतिरिक्त आणखी आवश्यक बदल केल्याचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त
मोर्चात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून ठिकठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार असून साध्या वेशातील पोलीसही तैनात राहणार आहेत. हा मोर्चा सर्वपक्षीय असल्याने त्यास मोठा प्रतिसाद मिळण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी ही खबरदारी घेतली आहे.
ठाणे ग्रामीण पोलीस अंतर्गत सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी राजेश नार्वेकर यांनी ३० जानेवारी रोजी रात्री १२ पर्यंत कुठल्याही प्रकारची शस्त्रे बाळगण्यास तसेच पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी घातली आहे. २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिन, तसेच विविध आंदोलने लक्षात घेऊन हा आदेश जारी केला आहे.

रिक्षा बंदबाबत निर्णय नाही
रात्री उशिरापर्यंत बंदला पाठिंबा देण्याबाबतचा निर्णय येथील प्रमुख रिक्षा संघटनेने घेतला नव्हता. रिक्षा चालू ठेवायची की बंद, याचा वैयक्तिक निर्णय घेण्याची मुभा रिक्षाचालकांना देण्यात आली आहे, अशी माहिती न्यू मुंब्रा आॅटो रिक्षा युनियनचे सचिव बाळासाहेब मुळीक यांनी दिली.

Web Title: Mumbra today closed its notice against the privatization of electricity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज