मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 25, 2019 01:15 AM2019-04-25T01:15:41+5:302019-04-25T01:16:01+5:30

पालिकेकडून कारवाईबाबत टाळाटाळ

Meet the hawkers at the Mira Road railway station | मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा

मीरा रोड रेल्वेस्थानकास फेरीवाल्यांचा विळखा

Next

भाईंदर : मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटरपर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली असताना मीरा रोड रेल्वेस्थानक व परिसरास फेरीवाल्यांचा विळखा कायम असल्याने प्रवासी त्रासले आहेत. तर, महापालिकेकडून या बेकायदा फेरीवाल्यांना पाठीशी घातले जात आहे. दरम्यान, फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी कंत्राटदाराची नियुक्ती केली आहे, मात्र तोही करत नसल्याचे दिसून येत आहे.

एल्फिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर उच्च न्यायालयाने रेल्वेस्थानकापासून दीडशे मीटरपर्यंतच्या अंतरावर फेरीवाल्यांना बसण्यास मनाई केली आहे. तसे असताना महापालिकेकडून सर्रास न्यायालयाच्या आदेशाचे धिंडवडे काढले जात आहेत. गर्दीचे स्थानक असलेल्या मीरा रोडबाहेर व परिसरात सर्रास फेरीवाल्यांच्या हातगाड्या, बाकडे, टपऱ्या लागत असताना पालिका कारवाईच करत नाही. यामुळे मीरा रोड रेल्वेस्थानक परिसर व मुख्य रस्त्यावर सर्रास फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाले आहे. फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे रेल्वेस्थानकात जाताना तसेच बाहेर आल्यावर खूपच त्रास सहन करावा लागतो. प्रवाशांना त्यातही महिला, वृद्ध, तरुणींना मार्ग काढताना वाईट अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. फेरीवाल्यांची दादागिरी चालत असल्याने नागरिकही बोलायला घाबरतात. फेरीवाल्यांवर ठोस कारवाई करून प्रवाशांना येण्याजाण्याचे मार्ग मोकळे ठेवण्याची मागणी शिवसेना, मनसेने केली होती. काही दिवस पालिकेने कारवाई केली. पण, पुन्हा फेरीवाल्यांनी बस्तान मांडले आहे. काही लोकप्रतिनिधी आणि पालिका अधिकाऱ्यांचे अर्थपूर्ण संबंध असल्याने नियमित ठोस कारवाई केली जात नसल्याचा आरोप येथील नागरिकांनी केला आहे.

याप्रकरणी महापालिकेचे प्रभाग अधिकारी सुदाम गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर, फेरीवाले हटवण्यासाठी नियुक्त कंत्राटदाराच्या कारवाईची पाहणी करण्यासाठी नियुक्त कर्मचारी महादेव बंदीछोडे यांच्याशी संपर्क साधला असता फेरीवाल्यांवर कारवाईची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Meet the hawkers at the Mira Road railway station

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.