प्लास्टिकबंदीकडे नगरसेवकांची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2018 03:58 AM2018-05-19T03:58:15+5:302018-05-19T03:58:15+5:30

अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनस्थळी मौजमजेसाठी जाण्यास उतावीळ असलेले सत्ताधारी भाजपासह सेनेचे नगरसेवक राज्य शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेकडे फिरकलेदेखील नाहीत.

Lessons of corporators, near the plank | प्लास्टिकबंदीकडे नगरसेवकांची पाठ

प्लास्टिकबंदीकडे नगरसेवकांची पाठ

Next

मीरा रोड : अभ्यास दौऱ्याच्या नावाखाली पर्यटनस्थळी मौजमजेसाठी जाण्यास उतावीळ असलेले सत्ताधारी भाजपासह सेनेचे नगरसेवक राज्य शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने आयोजित केलेल्या कार्यशाळेकडे फिरकलेदेखील नाहीत. मात्र, काँग्रेसचे ५ नगरसेवक उपस्थित होते.
राज्य शासनाने मार्चमध्ये अधिसूचना काढून प्लास्टिक आणि थर्माकोलवर बंदी आणली आहे. त्या अनुषंगाने प्लास्टिक आणि थर्माकोलचे उत्पादन, विक्री, साठवणूक, आयात, वितरण आणि वाहतुकीस बंदी केली आहे. यात प्लास्टिकच्या सर्व प्रकारच्या पिशव्या, थर्माकोल आणि प्लास्टिकपासून बनवले जाणारे ताट, कप, चमचे, ग्लास, काटे, वाटी,भांडे, अन्नपदार्थ पॅकिंगसाठीची प्लास्टिक भांडी, स्ट्रॉ, प्लास्टिक पाउचपासून सजावटीसाठी वापरल्या जाणाºया थर्माकोल आणि प्लास्टिक साहित्याचा समावेश आहे.
उत्पादन, विक्री, साठा यावर बंदी असून नागरिकांसाठी तीन महिन्यांची म्हणजेच २३ जूनपर्यंत मुदत दिली आहे. या बंदीच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने बुधवारी नगरभवन येथे कार्यशाळेचे आयोजन केले होते. या वेळी महापौर डिम्पल मेहता, उपायुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या किल्लेदारासह महापालिकेचे अधिकारी-कर्मचारी, पोलीस यांच्यासह संस्थांचे प्रतिनिधी, व्यापारी आदी उपस्थित होते.
नगरसेवकांमध्ये काँग्रेसचे अनिल सावंत, मर्लिन डिसा, उमा सपार, सारा अक्रम, राजीव मेहरा उपस्थित होते. परंतु, भाजपा आणि शिवसेनेचा एकही नगरसेवक या महत्त्वाच्या आणि जनजागृतीपर कार्यशाळेकडे फिरकलाच नाही. एरव्ही परदेश दौरे करणारे नगरसेवक गैरहजर राहिल्याने नाराजी पसरली आहे.
कार्यशाळेच्या सुरुवातीला पर्यावरण विभागाने ग्लोबल वॉर्मिंगवर तयार केलेली चित्रफीत दाखवण्यात आली. त्यानंतर, शासनाने अमलात आणलेल्या प्लास्टिक आणि थर्माकोलबंदीची माहिती चित्रफितीद्वारे दिली.
डॉ. पानपट्टे यांनी प्लास्टिक-थर्माकोलमुळे लोकांच्या आरोग्याला होणारा धोका, पर्यावरणाचे होणारे नुकसान, प्लास्टिक खाऊन गायी आदी जनावरांचा होणारा मृत्यू आणि नाले तुंबून शहरात होणारी पूरस्थिती आदी माहिती उपस्थितांना दिली. प्लास्टिक-थर्माकोलबंदीमध्ये पहिल्यांदा ५ हजार, दुसºयांदा १० हजार, तर तिसºया वेळी २५ हजार दंड आणि तीन महिने कारावास अशी शिक्षा असल्याचे सांगत पालिका, पोलीस, महसूल विभागाचे कोणीही ही कारवाई करू शकतील, असे ते म्हणाले.
>जागृतीसोबतच कारवाईदेखील होणार
नागरिक, व्यापारी, हॉटेलचालक अशा कोणाकडेही प्लास्टिक असेल, तर ते महापालिकेच्या प्रभाग कार्यालयात जमा करण्याचे आवाहन केले आहे. त्यासाठी अधिकाºयांचे संपर्क क्रमांक दिले आहेत. सर्वांनी प्लास्टिक-थर्माकोलचा वापर तातडीने बंद करावा, असे आवाहनदेखील त्यांनी केले आहे. लोकांमध्ये जागृती करण्यासह कारवाईदेखील सुरू करणार असल्याचे डॉ. पानपट्टे म्हणाले.

Web Title: Lessons of corporators, near the plank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.