Kalyan-Dombivli New Year's Celebrations, Thirty First Dakaya | कल्याण-डोंबिवलीत नववर्ष जल्लोष, थर्टी फर्स्ट दणक्यात
कल्याण-डोंबिवलीत नववर्ष जल्लोष, थर्टी फर्स्ट दणक्यात

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरांबरोबरच त्यालगतचा कल्याण-शीळ मार्ग, कल्याण-भिवंडी मार्गावरील विविध हॉटेल, रेस्टॉरंट्स, ढाब्यांवर रविवारी थर्टी फर्स्टचे धडाक्यात सेलिब्रेशन झाले. काहींनी तेथील गर्दी टाळून सोसायट्या अथवा घरच्या घरी सेलिब्रेशन करण्यावर भर दिला. चायनीज, पंजाबी डिश, बिर्याणी, मिष्ठान्न, ज्यूस, आइस्क्रीमसारखी डेझर्ट यावर भरपेट ताव मारल्यानंतर मध्यरात्री १२ च्या ठोक्याला एकमेकांना नववर्षाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
मुंबईतील कमला मिल कम्पाउंड येथील अग्नितांडवाची घटना ताजी असतानाही कल्याण-डोंबिवलीतील हॉटेल, ढाब्यांमध्ये थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. कल्याण-डोंबिवली परिसरांत साधारणपणे दोनशे ते अडीचशेच्या आसपास छोटीमोठी हॉटेल, रेस्टॉरंट आहेत. मोठे हॉटेल, ढाब्यांमध्ये लाइव्ह आॅर्केस्ट्रा यासह बुफे भोजन असे बेत आखण्यात आले होते.
थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनला पहाटे ५ वाजेपर्यंत परवानगी देण्यात आल्याने हॉटेल आणि ढाबाचालकांमध्ये समाधानाचे वातावरण होते. सेलिब्रेशनच्या वेळेस कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी हॉटेल व्यावसायिकांकडून खाजगी सुरक्षारक्षक तैनात केले होते.
बार, रेस्टॉरंट, ढाब्यांप्रमाणेच शाकाहारी हॉटेल, चायनीज कॉर्नर येथेही विद्युत रोषणाई, काही ठिकाणी हॅप्पी न्यू ईअर संदेश देणारे फलक, फुग्यांची सजावट करण्यात आली होती. घरे आणि सोसायट्यांमध्येही नववर्षाचे सेलिब्रेशन जल्लोषात झाल्याचे पाहायला मिळाले. सोसायट्यांची प्रवेशद्वारे फुलांच्या तोरणांनी सजली होती. सोसायट्यांमध्ये फॅन्सी ड्रेस स्पर्धा, संगीत खुर्ची, गाण्यांच्या भेंड्या आदी कार्यक्रमांची रेलचेल होती. नववर्षाचे स्वागत केक कापून केले जात असल्याने केक खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी झाली होती.

भाविकांनी केली गर्दी

टिटवाळा : वर्षातील अखेरचा दिवस आणि त्यातही रविवार, यामुळे येथील महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांनी सकाळपासून गर्दी केली होती. टिटवाळा हे महागणपतीच्या देवस्थानासाठी प्रसिद्ध आहे. रविवारी मेगाब्लॉक असूनही टिटवाळा पंचक्रोशी, कल्याण-डोंबिवली, ठाणे आणि मुंबई परिसरांतून मोठ्या प्रमाणावर भाविक आले होते. त्यामुळे स्थानक परिसरात झालेल्या कोंडीत रिक्षा आणि टांगे अडकून पडले. रेल्वेस्थानकाबरोबर मंदिर परिसरातील गर्दीमुळे आज अंगारकी चतुर्थी आहे की काय, असा प्रश्न अनेकांना पडला. हजारो भाविकांनी सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी गणपती बाप्पाच्या चरणी नतमस्तक होऊन नवीन वर्ष, सुख-समाधान आणि आनंदाचे जावे, यासाठी साकडे घातले.

हॉटेल व्यावसायिकांच्या संमिश्र प्रतिक्रिया

डोंबिवली हॉटेल ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शेट्टी यांनी मात्र सध्या सेलिब्रेशनचा हवा तसा उत्साह राहिलेला नसल्याचे सांगितले. नोटाबंदी, जीएसटीचा बसलेला फटका पाहता या नववर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी ग्राहक हॉटेलमध्ये येण्यापेक्षा खाद्यपदार्थांचे पार्सल घरी घेऊन जाणे अधिक पसंत केल्याचे ते म्हणाले.

रेस्टॉरंटचालक जॉली पवार म्हणाले की, जीएसटी कमी करून सर्व्हिस टॅक्स रद्द केला. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे रेस्टॉरंट आणि हॉटेलकडे येण्याचा ग्राहकांचा कल वाढल्याचे त्यांनी सांगितले.

घरच्या घरी सेलिब्रेशन करणाºयांचीदेखील संख्या वाढत असून यात बिर्याणी पार्सल मोठ्या प्रमाणात पसंती लाभल्याचे हॉटेल व्यावसायिक अमोल कदम आणि मनोज साळवे यांनी सांगितले.


हॉटेलचे आजपासून सर्वेक्षण
मुंबईतील पब, हॉटेल अग्नितांडवानंतर कल्याण-डोंबिवली महापालिकेनेही हॉटेलचे सर्वेक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांनी शनिवारी बैठक घेत अग्निशमन दल, अनधिकृत बांधकाम विभाग, आरोग्य विभाग यांना सोमवार, १ जानेवारीपासून हॉटेलचे सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यात बेकायदा बांधकाम, सुरक्षा नियमात अनियमितता आढळल्यास कारवाई केली जाणार आहे.


Web Title:  Kalyan-Dombivli New Year's Celebrations, Thirty First Dakaya
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.