केडीएमसीमध्ये ‘कळवा मॉडेल’ - श्रीकांत शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 05:25 AM2019-02-19T05:25:30+5:302019-02-19T05:25:46+5:30

श्रीकांत शिंदे : शास्त्रीनगर रुग्णालयात मिळणार अल्प दरात अत्याधुनिक आरोग्यसेवा

'Kalwa model' in KDMC - Shrikant Shinde | केडीएमसीमध्ये ‘कळवा मॉडेल’ - श्रीकांत शिंदे

केडीएमसीमध्ये ‘कळवा मॉडेल’ - श्रीकांत शिंदे

Next

डोंबिवली : कळवा येथील सरकारी रुग्णालयात वर्षभरापूर्वी पीपीपी तत्त्वावर आरोग्यसेवा सुरू केली. आरोग्याचे ‘कळवा मॉडेल’ कल्याण लोकसभा मतदारसंघात लागू करून अद्ययावत व अत्याधुनिक आरोग्यसेवा देणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी सोमवारी येथे दिली.

डोंबिवली येथील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात क्रेस्ना संस्थेतर्फे पीपीपी तत्त्वावर सिटीस्कॅन, सोनोग्राफी, एमआरआय आणि पॅथॉलॉजी सेवा दिली जाणार आहे. या कामाचे भूमिपूजन शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी शिंदे बोलत होते. या कार्यक्रमप्रसंगी आमदार डॉ. बालाजी किणीकर, महापौर विनीता राणे, आयुक्त गोविंद बोडके, स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे, शिवसेना गटनेते दशरथ घाडीगावकर, मनसे गटनेते मंदार हळबे, सभागृह नेते श्रेयस समेळ, स्थानिक नगरसेविका गुलाब म्हात्रे, रमेश म्हात्रे, वामन म्हात्रे, वृषाली जोशी, शिवसेनेचे शहरप्रमुख राजेश मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.

शिंदे म्हणाले, क्रेस्ना संस्थेकडून पीपीपी तत्त्वावर आरोग्यसेवा पुरवली जाणार आहे. त्यामुळे आजाराचे निदान करण्यासाठी रुग्णांना बाहेर जाण्याची गरज भासणार नाही. सरकारी दराप्रमाणे माफक दरात सेवा उपलब्ध होणार आहे. सिटीस्कॅनसाठी खाजगी रुग्णालयात अडीच ते तीन हजार रुपये मोजावे लागतात. ते केवळ एक हजार रुपयांत होणार आहे. एमआरआय खाजगी रुग्णालयात साडेपाच हजार रुपये मोजावे लागतात. ते येथे अडीच हजारांमध्ये होणार आहे. रक्त, थुंकी तपासण्यासाठी खाजगी लॅब ५०० रुपये घेतात. त्याला केवळ १०० रुपये मोजावे लागणार आहेत. एखाद्या रुग्णाकडे हे पैसे भरण्याची ऐपत नाही, अशी लेखी शिफारस नगरसेवकाने केल्यास त्याला क्रेस्ना मोफत सेवा देणार आहे. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर पॅथॉलॉजी सेंटर हे महापालिकेच्या प्रत्येक नागरिक आरोग्य केंद्राशी आॅनलाइनद्वारे जोडले जाणार आहे. ज्या सेवा महापालिका देऊ शकत नव्हती. त्याच सेवा पीपीपी तत्त्वावर देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. आरोग्यसेवांसाठी विरोधी पक्षासह महापालिका आयुक्त, स्थायी समिती सभापती आणि शिवसेना नगरसेवक विश्वनाथ राणे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. तेव्हा हे काम सुरू होत आहे.
शिंदे म्हणाले, ‘महापालिकेच्या कल्याणमधील रुक्मिणीबाई रुग्णालयातही याच सेवा पीपीपी तत्त्वावर पुरवल्या जाणार आहेत. याशिवाय, डायलेसिस सेंटरची जागा निश्चित केली आहे. कल्याण पूर्वेतील लोकधारा व डोंबिवली पश्चिमेतील हरिओम पूजा इमारतीत दोन महिन्यांत ही सेवा सुरू केली जाणार आहे. ‘शास्त्रीनगर’मध्येही शवविच्छेदन सुरू करण्यात येणार आहे. सूतिकागृहाचे कामही ‘पीपीपी’वर देण्यासाठी निविदा मागवली आहे. उल्हासनगरातील मोडकळीस आलेल्या कामगार रुग्णालय इमारतीच्या पुनर्बांधणीच्या कामाचा शुभारंभ पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते २६ फेब्रुवारीला होणार आहे.’

१६ राज्यांत सेवा
च्क्रेस्ना डायग्नोस्टिक ही कंपनी केवळ सरकारी रुग्णालयात आरोग्यसेवा देते. देशभरातील १६ राज्यांतील १८०० ठिकाणी सरकारी दरात कंपनीतर्फे सेवा दिली जाते. खाजगी दरापेक्षा ६० टक्के कमी किमतीत आरोग्यसेवा पुरवली जाते.
च्कळवा सरकार रुग्णालयात वर्षभरापासून ही सेवा दिली जात आहे. सिटीस्कॅन, एमआरआय, सोनोग्राफी यांच्यासह एक हजार प्रकारच्या वैद्यकीय चाचण्या पॅथॉलॉजी लॅबमधून केल्या जाणार आहेत, अशी माहिती मुंबई विभागाचे संचालक गोरक्ष नायकोडी यांनी
दिली आहे.

Web Title: 'Kalwa model' in KDMC - Shrikant Shinde

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.