फेरीवाल्यांकडून ३० लाखांचा हप्ता

By Admin | Published: August 8, 2016 02:23 AM2016-08-08T02:23:02+5:302016-08-08T02:23:02+5:30

आयुक्तपदी आयएएस अधिकारी ई. रवींद्रन यांची नियुक्ती झाल्यावर बजबजपुरीतून आपली सुटका होईल, असे कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना वाटत होते

Installment of 30 lakhs from hawkers | फेरीवाल्यांकडून ३० लाखांचा हप्ता

फेरीवाल्यांकडून ३० लाखांचा हप्ता

googlenewsNext

आयुक्तपदी आयएएस अधिकारी ई. रवींद्रन यांची नियुक्ती झाल्यावर बजबजपुरीतून आपली सुटका होईल, असे कल्याण-डोंबिवलीच्या नागरिकांना वाटत होते. रेल्वे स्थानक परिसर मोकळा करण्यासाठी त्यांनी अतिक्रमणे हटवण्याचा धडाका लावला. पण, फेरीवाले घसघशीत हप्ता देत असल्याने ही कारवाई नावापुरतीच राहिली. सोन्याची अंडी देणारी कोंबडी कोणालाच मारायची नसल्याने या नरकयातनेतून सामान्यांची सुटका होणे सध्या तरी अशक्य आहे.

कल्याण रेल्वे स्थानक परिसर म्हणजे बजबजपुरी, असे जणू समीकरणच झाले आहे. रस्त्यावर कशाही उभ्या राहणाऱ्या रिक्षा, फेरीवाल्यांचे अतिक्रमण, यामुळे होणारी वाहतूककोंडी, या सर्वांचा नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. यातून नागरिकांची काही प्रमाणात सुटका होण्यासाठी २००७ मध्ये केडीएमसी आणि एमएमआरडीएने कल्याण पश्चिमेला स्कायवॉक बांधला. पण, आज या स्कायवॉकचा वापर नागरिकांपेक्षा फेरीवालेच सर्वाधिक करत असल्याचे दिसून येत आहे. नागरिकांना येथून जाताना विशेषत: महिलांना अंग चोरून जावे लागते. कारण, फेरीवाल्यांनी स्कायवॉकवर कब्जा केला आहे. याचे कारण म्हणजे या फेरीवाल्यांकडून महिन्याला ३० लाखांचा हप्ता मिळतो. त्यामुळे स्मार्ट सिटीची स्वप्ने पाहणाऱ्या नागरिकांनो, स्कायवॉकवरील फेरीवाले कधीही हटणार नाही. कारण, हा स्कायवॉक सरकारी यंत्रणांसाठी सोन्याची अंडी देणारी कोंबडी आहे.
पालिका प्रशासन आणि पोलिसांच्या दुर्लक्षतेमुळे स्कायवॉक हा फेरीवाल्यांचा अड्डा बनला आहे. पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी कल्याण रेल्वे स्थानक परिसर मोकळा केला. तेथील फेरीवाल्यांवर कारवाई केली. मात्र, स्कायवॉकवरील फेरीवाल्यांना हटवणे प्रशासनाला जमत नाही. पालिका अधूनमधून थातूरमातूर कारवाई करते. पण, फेरीवाले पुन्हा आपले बस्तान मांडतात. कल्याणमधून दरमहिन्याला २२, तर डोंबिवलीतून चार लाख असा सुमारे ३० लाखांचा हप्ता वसूल केला जातो. कल्याणमध्ये तर मुंबईतील एका ‘भाई’ने हप्तावसुलीसाठी चक्क माणसे नेमली आहेत. डोंबिवलीत महापालिका अधिकारी, कर्मचारीच ‘वसुली’ करतात आणि सर्वांना त्याचे योग्य प्रकारे वाटपही करतात.
स्कायवॉकवर बसणारे फेरीवाले आणि विक्रेते येथे बसण्यासाठी रोज हप्तावजा खंडणी देतात. छोटे व्यावसायिक ३०० ते ५००, मध्यम व्यावसायिक ८०० ते १००० आणि मोठे व्यावसायिक १२०० ते १५०० रु पये देऊन बिनधास्त व्यवसाय करतात. कल्याणमधील स्कायवॉकवरील फेरीवाले बहुतांश मुंबईतील आहेत, तर डोंबिवलीत परप्रांतीय व्यवसाय करतात. स्थानिक भाजी व फळविक्रेत्या महिला सोडल्यास अन्य व्यावसायिक हे बाहेरचे आहेत. रोज सकाळी ९ वाजता हे फेरीवाले बस्तान स्कायवॉकवर मांडण्यास सुरुवात करतात. ते रात्री १० पर्यंत.
हेच फेरीवाले पूर्वी मुंबईच्या अनेक स्थानकांतील स्कायवॉकवर व्यवसाय करायचे. मात्र, तेथेही ते दादागिरी आणि हाणामारी करत असल्याने तेथील पोलिसांनी त्यांना मुंबईतून तडीपार केले. ते व्यवसायासाठी कल्याणमध्ये आल्याची माहिती समोर आली आहे.
‘भाई’चे ‘कलेक्टर’ : या फेरीवाल्यांकडून मुंबईमधील एक ‘भाई’ याची वसुली करतो. त्यासाठी त्याने ‘कलेक्टर’ म्हणून काही जणांना कल्याणमध्ये ठेवले आहे. ते दिवसभर स्कायवॉकवर फिरतात. फेरीवाल्यांवर लक्ष ठेवायचे. कुठे कुणाला व्यवसाय करायचा, त्यानुसार जागा देणे. पोलीस, महापालिका अधिकारी व स्थानिक गुंड आले की, त्यांना ‘सांभाळण्या’चे कामही कलेक्टर मंडळी करतात. तसेच ही सर्व माहिती भाईला देणे, रात्री सर्व फेरीवाल्यांचा हप्ता भाईला पोहोचवण्याची जबाबदारी याच मंडळींवर आहे.

Web Title: Installment of 30 lakhs from hawkers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.