माणुसकीचं जळणं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 11:59 PM2018-06-24T23:59:15+5:302018-06-24T23:59:27+5:30

इन्टर्नशीप सुरू होऊन दोन महिने झाले होते. ठाण्याला सिव्हिल रुग्णालयातील कार्यपद्धती आता नीट कळली होती.

Humanity burns | माणुसकीचं जळणं

माणुसकीचं जळणं

Next

डॉ. स्वाती गाडगीळ
इन्टर्नशीप सुरू होऊन दोन महिने झाले होते. ठाण्याला सिव्हिल रुग्णालयातील कार्यपद्धती आता नीट कळली होती. दुपारी दोन वाजेपर्यंत ओपीडीमध्ये पेशंटसची इतकी गडबड असे की, पाणी प्यायलासुद्धा वेळ नसे. त्यातून रेबीजची लस देण्याची ड्युटी लागली की विचारायलाच नको! जवळजवळ शंभर पेशंट दर ओपीडीला असायचे. मला तर ती गर्दी पाहून भीतीच वाटायची. इतकी कुत्री चावत असतील तर रस्त्याने चालावे कसे, हा प्रश्न पडायचा. कुठेही कुत्रा दिसला की भीती वाटायची. एवढं पुरे नव्हतं की काय, म्हणून माकड, डुक्कर चावलेले पेशंटदेखील येऊ लागले.
१९८८-८९ सालातील गोष्ट ही. तेव्हा दहा इंजेक्शनं घ्यावी लागायची आणि तीही पोटावर. एक एक इंजेक्शन जसजसं जायचं तसतसं पोटावरची चामडी अजून लाल व्हायची आणि सूज वाढायची. माझा जीव कळवळायचा इंजेक्शन देताना, पण करणार काय? बरं, हे सगळं होताहोता दुपारचे दोन वाजायचे.
असंच एक दिवस दुपारी जेवायला जाणार, तेवढ्यात हॉस्पिटलच्या मागच्या गेटमध्ये एक रिक्षा थांबली आणि त्यातून एक भाजलेली व्यक्ती धावत माझ्या दिशेने येऊ लागली. आधी माझ्यापर्यंत पोहोचला तो केरोसीनचा वास. नंतर त्या काळ्या आकृतीकडे बघितल्यावर कळलं की जवळजवळ शंभर टक्के भाजलेली एक स्त्री होती ती. जळलेले कपडे अंगावर चिकटले होते. कातडी पण गोळा झाली होती. डोक्यावरचे केस जळून गेले होते. मागून तिच्याबरोबर आलेल्या लोकांचा आरडाओरडा सुरू होता. डॉक्टर कुठे आहे, डॉक्टर कुठे आहे? ड्युटीवर मीच होते आणि एक मेडीकल आॅफिसर. मी अवघी एकवीस वर्षांची. आपण आता डॉक्टर झालो आहोत, याचा आनंद मनात ताजा होता. शिकत असताना सगळ्या प्रकारचे पेशंट बघितले होते, प्रॅक्टिकल ट्रेनिंग झालं होतं, बर्नस् वॉर्डमध्ये कामदेखील केलं होतं; पण आजचं दृश्य पाहून मी खूपच घाबरले. स्ट्रेचरवर आणलेले पेशंट बघणं आणि अशा रितीने धावत येणारा भाजलेला पेशंट बघणं यात खूपच फरक होता. मला चक्क लपून बसावसं वाटलं. माझ्या पोटात गोळा उठला. तेवढ्यात दुसऱ्या व्हरांड्यातून अजून एक तसाच पेशंट येताना बघून मला मळमळू लागलं. उलटी होईल असं वाटलं. काय करू काही सुचेना. स्वत:ला सावरून मी इमर्जन्सी वॉर्डमध्ये शिरले. सिनियर नर्सेसच्या मदतीने त्या पहिल्या आलेल्या पेशंटची ट्रिटमेंट सुरू केली. पोलीस पण आले होते. मला विचारू लागले की, पेशंट स्टेटमेंट देऊ शकते का. मी फक्त महत्त्वाचे जुजबी प्रश्न विचारण्याची परवानगी दिली. कारण शंभर टक्के भाजलेली व्यक्ती किती काळ जिवंत राहू शकेल सांगू शकत नाही; पण तिचा जबाब महत्त्वाचा होता. आत्महत्येचा प्रयत्न होता की, कुणी तिला मारायचा प्रयत्न केला होता तेवढं कळलं तरी पुढील तपासाची दिशा बदलते. तिला तिच्या सासरच्यांनी हुंड्यासाठी, केरोसीन ओतून पेटवून दिली होती.
धुरामुळे फुफ्फुसांमध्येसुद्धा भयंकर नुकसान झाले असते. या सगळ्या अडचणींवर मात करून, व्हेंटिलेटरच्या मदतीने आयुष्य खेचून खेचून फार तर अठ्ठेचाळीस तास किंवा जास्तीत जास्त पाच दिवस जगवू शकणार आहोत, हे माहीत असूनसुद्धा डोळ्यांत तेल घालून पेशंटवर नजर ठेवली जाते. असे रुग्ण हाताळताना, वैद्यक शास्त्र इतकं प्रगत असूनदेखील आपण एवढे असहाय होऊ शकतो, याची खंत वाटते. तिच्या वडिलांचे अश्रूंनी भरलेले डोळे, सतत माझा पाठलाग करत होते. भाजलेल्या पेशंटसाठी असलेला वॉर्ड, हॉस्पिटलच्या आवारात मागच्या बाजूला होता. त्या वॉर्डमधून येणाºया रडण्याच्या आणि कण्हण्याच्या आवाजांनी हृदय पिळवटून निघत. पेशंटचे शारीरिक घाव तर ड्रेसिंग केल्याने व औषधांनी भरून निघत, पण मानसिक आघात कशानेही भरून निघणार नाही, असं वाटावं, इतकं दु:ख आणि निराशेचं साम्राज्य त्या वॉर्डमध्ये असायचं. कधी कौटुंबिक कलहातून आत्महत्येचा प्रयत्न, तर कधी निराशेच्या गर्तेत घडणाºया चुका, तर कधी निव्वळ अपघात; पण येणारा प्रत्येक पेशंट हा एकतर अनेक दिवसांचा सोबती असे, कधी अनेक महिन्यांचा पाहुणा असे किंवा आजच्या मुलीसारखा, काही तासांचा सोबती!
जाताना आईबापाचं काळीज सोबत घेऊन जात आणि हॉस्पिटल स्टाफ व डॉक्टरांच्या जीवाला पण चटका लावून जात. मी आणि माझ्यासारखे अन्य इन्ट्रन्स, सगळेच एकवीस वर्षांचे. जीवनाचे सुंदर पैलू समोर उलगडावे असं वय, स्वप्नात रमण्याचं वय, आयुष्य सुंदर आहे हे समजण्याचं वय, पण आम्ही हा तपश्चर्येचा मार्ग निवडल्याने, दु:ख आणि वेदनेवर आस्थेने शुश्रूषेचे पांघरूण घालून, या क्षणभंगूर जीवनाचे मोल समजण्याचे व समजवण्याचे व्रत नकळतच स्वीकारले असते.
एकीकडे, मॅटरर्निटी वॉर्डमध्ये रडत रडत जन्माला येणारा प्रत्येक जीव सगळ्यांवर आनंद व सुखाची उधळण करतो तर, हॉस्पिटलच्या दुसºया कोपºयात वेदनेने विव्हळणारे पेशंट, जीवन कसं क्षणार्धात कोलमडून पडतं, किती अशाश्वत असतं, किती अनिश्चित असू शकतं हे शिकवून जातात. या सुख दु:खाच्या आकाशपाळण्यात, खालीवर झोके घेताना प्रत्येक पेशंट काहीतरी शिकवून जातो.
दुसºया दिवशी माझी नाइट ड्युटी होती. मी जनरल सर्जरीच्या वॉर्डमध्ये आलेला रेल्वे अपघाताचा रुग्ण बघत होते. त्याचे दोन्ही पाय गाडीच्या चाकाखाली चिरडले होते. रक्ताच्या खूप बाटल्या मागवल्या होत्या, सलाइन व आॅक्सिजन सुरू होतं. बाजूच्या बेडवर एक दारूच्या नशेत रस्त्यावर पडून चेहरा फुटलेला एक मजूर आला होता. उजवा गाल खोल
कापला होता. पहिल्या पेशंटला आॅपरेशन थिएटरमध्ये पाठवून मी त्या दारूड्याच्या गालावरची जखम स्वच्छ करून टाके घालायला सुरुवात करणार, तेवढ्यात लाईट गेले. वॉर्डबॉयने टॉर्च पकडला व मी एकटीने त्याचे टाके घातले. ड्रेस्ािंग केलं व आता जरा टेबलापाशी बसून नोट्स लिहिणार तेवढयात बर्नस् वॉर्डमधून कॉल आला. काल आलेली पार्वती सिरीयस झाली होती. मी धावतच हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला गेले. आज मला त्या कोपºयाची, त्या अंधाराची भीती नाही वाटली. मला दिसत होती, आम्हाला हरवून निघून जात असलेली पार्वती. मी तिच्या बेडजवळ गेले. व्हेंटिलेटर सुरू होता. प्राण निघून गेलेल्या शरीरात आॅक्सिजन सोडत होता. तिच्या डोळ्यातील बाहुल्या मोठ्या झाल्या होत्या, मॉनिटरवर सरळ रेष आली होती. सीपीआर देण्यात आला; पण सगळ्यांना ठाऊक होतं की पार्वती परत येणार नव्हती. खिन्न मनाने बर्नस् वॉर्डमधून बाहेर पडले. पूर्व दिशेला फटफटायला लागलं होतं. नवी पहाट, नवा सूर्य, सुख-दु:खाच्या नव्या वाटा दिसत होत्या.
(लेखिका प्रसिद्ध भूलतज्ज्ञ आहेत.)
 

Web Title: Humanity burns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.