खेळणी तुटल्याने आम्ही खेळायचे कसे ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 02:19 AM2019-04-22T02:19:34+5:302019-04-22T02:20:05+5:30

मग मुले मोबाइलमध्येच खेळणार

How To Play The Toys Breakthrough? | खेळणी तुटल्याने आम्ही खेळायचे कसे ?

खेळणी तुटल्याने आम्ही खेळायचे कसे ?

googlenewsNext

आताची पिढी मैदानी खेळ खेळत नाही. सतत मोबाइलमध्ये असते. त्यावरच खेळत असतात, असे म्हटले जाते. पण, त्यात त्यांची काय चूक. जर शहरातील मैदाने, उद्यानांची दुरवस्था झाली असेल तर मुले तरी काय करणार. तुटलेल्या खेळण्यांवर जाऊन खेळून इजा करून घेणार का? शहरातील उद्याने सुधारावीत, असे नगरसेवकांनाही वाटते, ही अत्यंत खेदाची बाब आहे. मतांचा जोगवा मागताना स्वप्ने दाखवतात, नंतर सर्व विसरून जातात, हेच वास्तव आहे.

उन्हाळ्याची सुटी लागल्याने बच्चेकंपनी उद्यानांमध्ये खेळायला जाण्यासाठी एका पायावर तयार असतात. बागेत जायचे आणि मनसोक्त हुंदडायचे असाच त्यांचा प्लान असतो. पण शहरातील उद्याने खरोखरीच मुलांना खेळण्यायोग्य आहे का, याच्याकडे कुणाचेच लक्ष नाही. आज मुलांना खेळण्यासाठी जागा शिल्लक राहिलेली नाही, अशी ओरड होत असताना दुसरीकडे उद्यानांच्या दुरवस्थेमुळे तेथे मुलांना घेऊन जाणेही पालकांना नको वाटते. प्रत्येक सोसायटीत मुलांना खेळायला जागा असेलच असे नाही. ज्यांच्याकडे जागा नसते ते रस्त्यावरच खेळत असतात.
डोंबिवलीसारख्या सुशिक्षित शहरात की ज्याची वाटचाल स्मार्ट सिटीच्या दिशेने होत आहे, त्या शहरातील उद्याने सुस्थितीत असली तरी या उद्यानातील खेळणी मात्र तुटलेली आहेत. खेळणी तुटलेली असल्याने ‘आम्ही खेळायचे कसे’, असा सवाल बच्चेकंपनीकडून उपस्थित केला जात आहे.
महापालिकेकडून कोट्यवधींची विकासकामे केली जातात. मात्र उद्यानांवर दरवर्षी अर्थसंकल्पात केली जाणारी आर्थिक तरतूद ही वेळच्यावेळी खर्च केली जात असली तरी प्रत्यक्षात उद्यानांमधील खेळणी तुटलेली आहेत. तुटलेल्या खेळण्यांकडे पालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. पर्यायच नसल्याने तुटलेल्या खेळण्यावरही काही मुले खेळत बसतात. तुटलेल्या खेळण्याचा वापर मुले करत असल्याने अपघात होऊ शकतो. मुलाना इजा होऊ शकते. याचा विचार महापालिकेच्या लेखी नाही.
विजय वामन पुसाळकर उद्यानात जहाज, मिनी आकाशपाळणा, मोटारगाडी अशी खेळणी बसवली आहे. या ठिकाणी पूर्वी घसरगुंडी, झोका अशी खेळणी होती. उद्यानाच्या डागडुजीत घसरगुंडीला दुसरीकडे जागा दिली आहे. या उद्यानातील चौथरा थोडासा तुटलेला आहे आणि ज्येष्ठांना बसण्यासाठी ठेवलेल्या बाकांपैकी एखादा बाक हा वाकलेला आहे. प्रगती महाविद्यालयासमोर असलेल्या सावरकर उद्यानात खेळण्यांची दुरवस्था झाली आहे. पाण्याच्या बॉलच्या काचा तुटलेल्या आहेत. बॉल त्यात दिसतच नाही. तसेच या खेळणीच्या खालच्या भागात माती आणि कचरा टाकलेला आहे. या उद्यानाच्या आतमध्ये एक कॅन्टीन असल्याने सर्व गेट बंद करता येत नाही. त्यासाठी काही संरक्षक तारा या उद्यानाला लावल्या आहेत. मात्र त्या तुटल्यामुळे आतमध्ये उद्यान बंद असतानाही सहज जाता येते. गोल फिरणाऱ्या गाड्या तुटलेल्या आहेत. त्यावर मुलांना आकर्षित करण्यासाठी एक कासव ठेवण्यात आले होते. तोही उद्यानात बाजूला पडून आहे. विमानात बसण्याचा आनंद पूर्वी मुले या उद्यानात घेत असत. ती विमानेही वेगवेगळी होऊन उद्यानात एका बाजूला पडलेली दिसतात. एका प्लेटवर हत्तीची गाडी ठेवण्यात आली होती. त्यातील काही हत्ती वाकलेले आहेत. ट्रेनचा एक डबा निखळलेला आहे. त्यामुळे या खेळण्यांचा वापर करणे हे मुलांच्या जीवावर बेतू शकते. याच उद्यानात घसरगुंडी आहे. त्या घसरगुंडीचे स्क्रूनिघालेले आहेत. त्यामुळे तो भाग कधी निखळून पडेल, हे सांगता येणार नाही.
एकतानगर येथील अष्टगणेश उद्यान येथे मोठ्यांसाठी जिम आहे. लहानांसाठी खेळणी आहेत. परंतु, खेळण्यांची संख्या वाढण्याची गरज येथील रहिवासी संजय भट यांनी बोलून दाखवली. ‘पूल आॅफ रॉड’ मुलांच्या संपूर्ण शरीराला व्यायामासाठी चांगला असतो. त्यामुळे तो गार्डनमध्ये असावा. या उद्यानात ज्येष्ठ नागरिक येत असल्याने क्रिकेट, फुटबॉल, सायकल व अन्य मैदानी खेळ खेळण्यास बंदी करण्यात आली आहे. कोपर रोडवरील मीनाताई ठाकरे उद्यानात झोका तुटलेला आहे. बॅलन्स गेमही सुस्थितीत नाही. घसरगुंडीला छिद्र पडलेली आहेत. कारंजे बंद आहे. आनंदनगर येथील उद्यानात बॅलन्स गेम ही खेळणी तुटलेल्या अवस्थेत आहे. याठिकाणचे कारंजेही बंद पडलेले आहे.

उद्यानांची संख्या अत्यल्प
कल्याण-डोंबिवली परिसरात नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी ६२ उद्याने आणि १५ मैदाने आहेत. केडीएमसी क्षेत्रातील क्रीडागुणांना वाव देण्यासाठी अस्तित्वातील मैदाने आणि क्रीडांगणे सुस्थितीत ठेवणे, अत्याधुनिक सोयी आणि सुविधा उपलब्ध करून देण्याबरोबरच इतर कामांसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात १० कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. शहराची लोकसंख्या पाहता उद्याने आणि मैदानांची संख्या
अत्यल्प आहे. मैदानांची संख्या वाढविणे गरजेचे आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे.

सुभाष मैदानात अस्वच्छतेचे साम्राज्य
कल्याणमधील सर्वात मोठा मॉर्निंग स्पॉट म्हणून सुभाष मैदानाकडे पाहिले जाते. विस्तृत जॉगिंग ट्रॅक, झाडांची सावली आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करण्यासाठी धडपडणारी मंडळी या सगळ्यांनी गजबजणारे मैदान. शालेय मुलांपासून ते आंतरराष्ट्रीय दर्जाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेणारे खेळाडू याच मैदानावर घडले आहेत. येथे येणाºयाला व्यायाम आणि क्रीडा क्षेत्राची ओढ लागल्याशिवाय राहत नाही. मात्र, महापालिकेची अनास्था, मद्यपी, गर्दुल्ल्यांचा विळखा, अस्वच्छता पाहायला मिळते.

नक्षत्र उद्यानातील
झाडे तुटलेली
सुभाष मैदानाच्या शेजारीच असलेल्या नक्षत्र उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी नेहमी लोकप्रतिनिधींकडून आश्वासन देण्यात येते. मात्र, त्याची पूर्तता होताना दिसत नाही. याठिकाणी लहान मुलांना खेळण्यासाठी असलेले पाळणे तुटलेले आहेत. तसेच, घसरगुंडी आहे मात्र, तिची अवस्थाही म्हणावी तशी चांगली नाही. राशी भविष्याच्या नावाने लावण्यात आलेली झाडेही तुटलेली असून पाट्याही गायब झाल्या आहेत.

तुटलेली खेळणी
कल्याण पश्चिमेतील लालचौकी परिसरात वासुदेव बळवंत फडके मैदान आहे. या मैदानात एका बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी खेळणी लावण्यात आली आहेत. मात्र, तुटलेल्या या खेळण्यांवर लहान मुले खेळणार तशी कशी..? ही खेळणी दुरूस्ती करण्याची जबाबदारी कुणाची हा खरा प्रश्न आहे.

काम पूर्णत्वाच्या मार्गावर
पश्चिमेतील आधारवाडी परिसरात माता रमाई आंबेडकर उद्यान आहे. मागील काही दिवसांपासून या उद्यानाचे काम सुरू होते. त्यामुळे हे उद्यान काही काळासाठी लहान मुले तसेच नागरिकांसाठी बंद करण्यात आले होते. हे काम आता जवळजवळ संपत आल्याने याठिकाणी खेळण्यास येणाºया लहान मुलांना या उद्यानाने कात टाकल्याचे जाणवेल. ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठीही चांगली व्यवस्था करण्यात
आल्याचे चित्र पाहायला मिळते. याठिकाणी ओपन जिमही आहे.

ओपन जिमला चांगला प्रतिसाद
पश्चिमेतील सिंडिकेट परिसरात राणी लक्ष्मीबाई उद्यान आहे. या उद्यानामध्ये ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी असलेली जागा आणि लहान मुलांसाठी असलेल्या खेळण्यांमुळे याठिकाणी आबालवृद्धांची बºयापैकी गर्दी पाहायला मिळते. त्याचबरोबर याठिकाणी असलेल्या ओपन जिमचा लाभ घेण्यासाठी नागरिक येत असतात. ही साहित्य व्यवस्थित टिकणे गरजेचे आहे.

कामामुळे जागोजागी खड्डे
पश्चिमेतील भारताचार्य वैद्य चौकात बाजीप्रभू देशपांडे उद्यान आहे. मागील कित्येक वर्षांपासून या उद्यानाची दुरवस्थाच झालेली आहे. याठिकाणी मुलांना खेळण्यासाठी ना खेळणी आहेत ना बसायला चांगली जागा. सध्या याठिकाणी काम सुरु असल्याने उद्यानात जागोजागी खड्डे खणण्यात आल्यामुळे मुलांना खेळणे अशक्यच आहे.

शाहू महाराज किलबिलाट
कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात राजश्री शाहू महाराज उद्यान आहे. या उद्यानातील खेळणी सुस्थितीत असल्याने लहान मुलांचा राबता पाहायला मिळतो. तसेच, ड प्रभाग कार्यालयाशेजारी असणाºया उद्यानांमध्येही लहान मुले सुटीचा आनंद लुटताना दिसतात. उद्याने चांगली ठेवली पाहिजे.

देखभालीकडे पालिकेचे दुर्लक्ष
शहरात उद्यान नाही, असे म्हणता येणार नाही. मात्र जी उद्याने तयार केली जातात त्यांची नियमित देखभाल, दुरूस्ती करण्यासाठी स्वतंत्र निधीची तरतूदच केली जात नाही. एकदा बनविलेले उद्यान थेट मोडकळीस आल्यावरच नव्याने बनविण्याचा प्रस्ताव सादर केला जातो. त्यामुळे या उद्यानांची देखभालीअभावी पूर्ण वाताहात झाली आहे. अंबरनाथ आणि बदलापूरमधील उद्यानांची हीच अवस्था आहे. अंबरनाथच्या तुलनेत बदलापुरातील उद्याने काही प्रमाणात सुस्थितीत आहेत. अंबरनाथ तालुक्यातील उद्यानांची अवस्था ही बिकट आहे. तालुक्यातील अंबरनाथ नगरपालिका आणि बदलापूर या दोन्ही नगरपालिकांमधील उद्यानांची अवस्थाही बिकट झाली आहे. अंबरनाथ पालिकेने उद्यानांसाठी लाखोंचा निधी खर्च केला आहे. इतकेच नव्हे तर नव्या उद्यानांसाठी अमृत योजनेतून कामही केले आहे. मात्र इतके करूनही नागरिकांच्या वाट्याला दयनीय अवस्थेतील उद्यानेच आली आहेत. शहरातील नेहरू उद्यानासाठी पालिकेने सातत्याने लाखो रुपये खर्च केले आहे. या उद्यानाची दुरवस्था सुधारली होती. मात्र या ठिकाणी नियमित देखभाल न झाल्याने आज हे उद्यान भग्न अवस्थेत आहे. या उद्यानातील खेळणीही तुटायला आली आहेत. त्यामुळे हे उद्यान नावापुरतेच राहिले आहे. शहरातील मोरिवली उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. हे उद्यान केवळ नावापुरते शिल्लक राहिले आहे. या ठिकाणी खेळणीच नसल्याने लहान मुलांसाठी हे उद्यान म्हणजे केवळ फिरण्याची जागा झाली आहे. सीताराम उद्यान सर्वात सुंदर असे उद्यान म्हणून नावारुपाला आले होते. मात्र आज हे उद्यान अडगळीत पडले आहे.

मुंब्रा, दिवा उद्याने नसलेली शहरे
मुंबईत १९९२ मध्ये झालेल्या जातीय दंगली तसेच त्यानंतर काही महिन्यांनी झालेल्या बॉम्बस्फोटांमध्ये मुंबई आणि उपनगरांमध्ये राहणारी अनेक कुटुंबे होरपळली. यामुळे असुरक्षिततेच्या भावनेतून हजारो कुटुंबानी मुंब्रा,दिव्यात स्थलांतर केले. यामुळे ठाणे महापालिकेच्या हद्दीत असलेल्या वरील दोन्ही शहरांचे मागील अडीच दशकांमध्ये झपाट्याने नागरीकरण झाले. यामुळे हजारोंच्या घरात असलेली वरील शहरांची लोकसंख्या अल्पावधीतच लाखोंच्या घरात पोहोचली. ही शहरे वानराच्या शेपटीसारखी वाढत असताना त्याच्या नियोजनबद्ध वाढीकडे मात्र कुणीही लक्ष दिले नाही. यामुळे या शहरांची लोकसंख्या जरी वाढली असली तरी तेथे अजूनही अनेक मूलभूत सुविधांची वानवा आहे. यातील एक म्हणजे उद्याने. दिव्यातील साबेगाव, दातिवली, नागवाडी, आगासन, म्हातार्डी आदी गावांमध्ये राहणाऱ्यांसाठी महापालिकेने एकाही उद्यानांची उभारणी केलेली नाही. यामुळे या परिसरातील मुलांना खेळायला कुठे जायचे, हा प्रश्न सतावत असतो. उद्याने नसल्यामुळे त्यांच्या बालमनाला मुरड घालून त्यांना घरातच बसावे लागते. दिव्याच्या तुलनेत मुंब्रा येथे काही ठिकाणी उद्यानांची उभारणी करण्यात आली होती. यातील एक असलेल्या मुंब्रेश्वर महादेव मंदिराजवळील उद्यानांची देखभाल करण्यासाठी सुरक्षारक्षकाची नेमणूक करण्यात न आल्याने समाजकंटकांनी त्याची पूर्णपणे वाताहत केली आहे. सद्य:स्थितीत या उद्यानांची सर्व बाजूच्या संरक्षक भिंतींना मोठमोठी भगदाडे पडली आहेत. या उद्यानांचे मुख्य प्रवेशद्वारही चोरीस गेले आहे. या उद्यानांमधील सर्व खेळण्यांची नासधूस झाली असून त्याचे अस्तित्व नावापुरते शिल्लक आहे. रात्रीच्यावेळी या उद्यानांचा वापर दारू पिण्यासाठी होत असल्याने तेथे काचांचा खच पडलेला असते. अनवधानाने तेथे जाणाऱ्यांच्या पायांमध्ये काचा शिरण्याची शक्यता आहे. या उद्यानांमध्ये सर्वत्र कचºयाचे साम्राज्य पसरले आहे. येथील हिरवळ, बसण्याची बाकडे यांचे अस्तित्त्व संपुष्टात आले आहे. येथील कौसा भागात असलेल्या उद्यानाचे नुकतेच नूतनीकरण करण्यात आले आहे. परंतु पूर्वीप्रमाणे यावेळीही तेथे मुलांसाठी खेळणी बसविण्यात आलेली नाहीत. यामुळे त्याचा वापर फक्त बसण्याउठण्यासाठी तसेच फेरफटका मारण्यासाठीच होऊ शकतो. या उद्यानात अद्याप विजेची व्यवस्था झालेली नसल्यामुळे संध्याकाळी ते लवकर बंद होते. येथील वाय जंक्शनजवळ असलेल्या छोट्या उद्यानाचे अस्तित्त्व रस्ता रूंदीकरणामुळे संपुष्टात आले आहे. याचप्रमाणे रेतीबंदर परिसरातील उद्यानांमध्ये लावण्यात आलेली झाडे सुकल्यामुळे या उद्यानाचीही
वाट लागली आहे.

कोट्यवधींचा निधी गेला कुठे?
शहराचे एकेकाळी वैभव राहिलेल्या बहुतांश उद्यानांवर कोट्यवधी रूपये खर्चूनही दुरवस्था झाली आहे. तसेच उद्यानाला सुरक्षारक्षक नसल्याने गर्दुल्ले, भंगारचोर, नशेबाजांचे अड्डे झाले असून अनेक उद्यानांत अतिक्रमण होत आहेत. सरकारचे तीन तर महापालिकेने तीन असा एकूण सहा कोटींचा निधी विकासासाठी देऊनही उद्याने भकास कशी? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.
नागरिकांसह मुले, वृद्धांच्या सोयीसाठी शहरात एकूण ६६ पेक्षा अधिक उद्याने आहेत. यातील सपना गार्डन, नेताजी गार्डन, लालसाई गार्डन, शिवाजी गार्डन अशी मोजकी उद्याने सोडली तर इतर उद्यानांची दुरवस्था झाली आहे. अशा उद्यानातील साहित्यही चोरीला गेले आहे. उद्यानांच्या दुरूस्तीसाठी महापालिका दरवर्षी कोट्यवधी रूपये खर्च करते. ठेकेदाराच्या हितासाठी उद्यानाचे काम केले जाते का? असा प्रश्नही विचारला जात आहे.
जुन्या उद्यानांची दुरूस्ती करण्याऐवजी महापालिकेने चक्क व्हीनस चौकातील भररस्त्यावर तसेच कॅम्प नं-चार सिद्धार्थनगर जलकुंभाखाली लाखो रूपये खर्चून असेच उद्यान उभारले. तसेच गोलमैदानातील मिडटाउनमधील एका लहानशा जागेवर उद्यान उभारले आहे. एकूणच निधीचा गैरवापर झाल्याचा आरोप होत आहे.
एका वर्षापूर्वी विविध उद्यानांत लहान मुलांसाठी खेळणी व नागरिकांसाठी खुली व्यायामशाळेची संकल्पना राबवली. त्यावर लाखोंचा खर्च केला. मात्र एका वर्षात व्यायामाची साधने व खेळणीचे लोखंडी साहित्य गेली कुठे? असा प्रश्न विचारला जात आहे. दरवर्षी कोट्यवधींचा निधी उद्यानासाठी वापरला जातो. असे दाखवले जाते.
शहरातील एकूण ६६ उद्यानांपैकी मोजकीच आठ ते नऊ उद्याने विकसित झाली आहेत. इतर उद्यानांचा विकास कधी होणार. तसेच वर्षानुवर्षे केलेल्या खर्चाचा हिशेब पालिकेने द्यावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून होत आहे. नगरसेवक उद्यानांचा विकास का करत नाही? असा प्रश्नही विचारला जातो. अशा उद्यानांवर भूमाफियांची नजर असून अनेक उद्यानांवर अतिक्रमण झाले आहे. पालिकेने ही अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अशी मागणी उल्हासनगरच्या नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे सातत्याने करत आहेत.

Web Title: How To Play The Toys Breakthrough?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.