वाहनांच्या पार्किंगवर येणार टाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 12:27 AM2019-01-31T00:27:24+5:302019-01-31T00:27:39+5:30

ठाकुर्लीतील म्हसोबा चौकात होणार कारवाई; जप्त केलेली वाहने ठेवायची कुठे?

Heel to come to the parking lot of the vehicles | वाहनांच्या पार्किंगवर येणार टाच

वाहनांच्या पार्किंगवर येणार टाच

Next

डोंबिवली : ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्त्यावरील म्हसोबा चौकात ठिकठिकाणी लावलेल्या नो-पार्किंगच्या फलकांबाबत अनभिज्ञ असलेली डोंबिवली वाहतूक शाखा आता मात्र कारवाईसाठी पुढे सरसावली आहे. या परिसरात पार्किंगची सुविधा नसल्याने रस्त्यावरच मोठ्या प्रमाणावर दुचाकींचे पार्किंग केले जात आहे. मात्र, आता वाहने उभी करायची कुठे, असा प्रश्न दुचाकीचालकांना पडला आहे.

ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रस्त्याच्या परिसरात मोठमोठी गृहसंकुले उभी राहिली आहेत. त्यामुळे या भागात वस्ती वाढली आहे. परंतु, येथे वाहनतळ नसल्याने नोकरदार सकाळी येथील म्हसोबा चौकात दुचाकी उभी करून रेल्वेस्थानक गाठतात. परंतु, केडीएमसीने आता तेथे नो-पार्किंगचे फलक लावले आहेत. त्याची माहिती त्यांनी वाहतूक शाखेला दिलेली नव्हती. परिणामी, या दोन्ही विभागांतील समन्वयाचा अभाव दिसून आला होता. मात्र, वाहतूक शाखेने आता म्हसोबा चौकातील वाहनांवर कारवाई करण्याचे ठरवले आहे. यासंदर्भातील अंमलबजावणी लवकरच केली जाणार असल्याचे वाहतूक शाखेकडून सांगण्यात आले.

म्हसोबा चौकातील वाढत्या पार्किंगवर ‘पी-१’, ‘पी-२’, पे अ‍ॅण्ड पार्किंगचा प्रस्ताव तयार करून त्याची अंमलबजावणी वाहतूक शाखेतर्फे केली जाणार होती. ‘पे अ‍ॅण्ड पार्क’ची अंमलबजावणी झाली असती, तर केडीएमसीला त्यातून उत्पन्न मिळाले असते. परंतु, आता थेट कारवाईचा पवित्रा घेतला जाणार असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, म्हसोबा चौक हा नो-पार्किंग झोन ठरवल्याने पोलीस येथील दुचाकींवर कारवाई करणार आहेत. यावेळी उचललेली वाहने ठेवण्यासाठी जागा संबंधित विभागाकडे नाही. त्यामुळे वाहने ठेवायची तरी कुठे, असाही पेच पोलिसांसमोर आहे.

अवजड वाहनांची वाहतूक रोखणार : येत्या एकदोन दिवसांत केडीएमसी मुख्यालयात वाहतूक नियोजनासंदर्भात बैठक होणार आहे. ठाकुर्ली उड्डाणपुलावरून मोठ्या प्रमाणावर रेतीचे डम्पर, सिमेंट मिक्सर, पाण्याचे टँकर, कचरागाड्या, शाळेच्या मोठ्या बसची वाहतूक होते. ती पूर्णपणे रोखण्यात येणार आहे. त्यासाठी पूर्व-पश्चिमेला पुलाच्या चढणापूर्वी लोखंडी कमान लावण्यात येणार आहे. लवकरच त्याची अधिसूचना जारी केली जाईल. समांतर रस्त्यावर नो-पार्किंगचे फलक लागले, तरी दुचाकी उभ्या केल्या जात आहेत. या बेकायदा पार्किंगविरोधात कारवाई सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती डोंबिवली वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक एन.सी. जाधव यांनी दिली.

पुलाचा पडला विसर
कल्याण-डोंबिवलीतील अरुंद रस्त्यांवर बेशिस्तीने वाहने उभी करणाऱ्या वाहनचालकांना चाप लावण्यासाठी केडीएमसीने नवे पार्किंग धोरण आखले होते. ते एकीकडे बासनात गुंडाळले असताना दुसरीकडे ठाकुर्ली उड्डाणपूल परिसरातील वाहतूक नियोजनासाठी अधिसूचना काढण्याचाही विसर वाहतूक विभागाला पडला आहे.
डोंबिवली पूर्व-पश्चिम जोडणाºया कोपर उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी नवीन ठाकुर्ली उड्डाणपूल बांधण्यात
आला. परंतु, नियोजनाअभावी येथे वाहतुकीचा पुरता बोजवारा उडाल्याचे येथे नेहमीच पाहायला मिळते.
पूल परिसरातील कोंडीवर उपाय म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यासाठी लवकरच कार्यवाही केली जाईल. त्यासाठी दिवाळीनंतर अधिसूचना जारी करून अंमलबजावणी होईल, असे वाहतूक शाखेने सांगितले होते. परंतु, अद्याप मुहूर्त मिळालेला नसल्याने उड्डाणपुलाचा विसर पडला आहे का, असा सवाल केला जात आहे.

Web Title: Heel to come to the parking lot of the vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.