शिक्षण, आरोग्याचा प्रश्न अधांतरीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 5, 2019 04:57 AM2019-04-05T04:57:40+5:302019-04-05T04:58:11+5:30

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना,

Education, Health Question Hour | शिक्षण, आरोग्याचा प्रश्न अधांतरीच

शिक्षण, आरोग्याचा प्रश्न अधांतरीच

Next

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे विभाजन होऊन अस्तित्वात आलेला कल्याण लोकसभा मतदारसंघ हा शिवसेना, भाजपचा बालेकिल्ला असून, यावेळी शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशीच लढत प्रामुख्याने पाहावयास मिळणार आहे. सेनेचे विद्यमान खा. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीने ठाणे महापालिकेचे नगरसेवक बाबाजी पाटील यांना रिंगणात उतरवले आहे. शिंदे यांनी पाच वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या वचननाम्यातील बहुतांश कामे मार्गी लावल्याचा दावा त्यांच्याकडून केला जात असला, तरी या मतदारसंघातील शिक्षण, आरोग्यसुविधांची वानवा आणि प्रदूषणाची समस्या हे प्रश्न आजही आ वासून उभे आहेत.

भूमिका
२०१४ च्या वचननाम्यातील ७० टक्के कामे झालेली आहेत. बहुतांश मोठी कामे मार्गी लागलेली आहेत. जी कामे राहिली आहेत, ती आणि नवीन वचननाम्यात नमूद केली जाणारी कामेही पाच वर्षांत पूर्ण करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न राहणार आहे.
- डॉ. श्रीकांत शिंदे, सेना

आक्षेप
विकासकामे केली असल्याचा दावा केला जात असला, तरी जनतेला वस्तुस्थिती माहिती आहे. काय खरे आणि काय खोटे, ते मतदार ठरवतील. मी नवखा असलो, तरी नगरसेवक म्हणून जी विकासाची कामे केलीत, ती जनतेला माहीत आहेत.
- बाबाजी पाटील, राष्ट्रवादी

दिलेली आश्वासने
उल्हास आणि वालधुनी नद्या प्रदूषणमुक्त होण्याकरिता केंद्रातून निधी मिळविण्याचा प्रयत्न. वालधुनी प्राधिकरणाला चालना देणार. वाढते प्रदूषण रोखण्यासाठी प्रभावी उपायांची अंमलबजावणी करणार.

चांगल्या वैद्यकीय सुविधा देण्यासाठी अपुरे असणारे मनुष्यबळ लक्षात घेऊन वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा भरण्यासाठी सरकारकडे पाठपुरावा करणार.

दहावी व बारावी अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी कि मान कौशल्यावर आधारित व्यवसायाभिमुख प्रशिक्षण केंद्राची उभारणी, व्यवसायात येणाऱ्या तरूणाईसाठी मार्गदर्शन केंद्र व उद्योजक केंद्रउभारणीला चालना देणार.

वस्तुस्थिती
२००५ च्या महापुरानंतर वालधुनी नदी प्राधिकरणाची स्थापना झाली. या प्रश्नावर केवळ बैठका झाल्या; परंतुुु सरकारकडेच निधी नसल्याने या नदीचा विकास अद्यापपर्यंत कागदावरच आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या रूग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची वानवा आहे. उल्हासनगरला कामगार रुग्णालयाच्या नूतनीकरणासाठी १२५ कोटी मंजूर झाले, भूमिपूजनही झाले; पण काम अद्याप सुरू झालेले नाही.

दिव्याला एज्युकेशन हबउभारणीचा प्रस्ताव आहे. त्याचबरोबर अंबरनाथमध्ये एमपीएससी भवन बांधले जाणार आहे; परंतु या दोन्ही प्रस्तावांवर ठोस कृती झालेली नाही.
 

Web Title: Education, Health Question Hour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.