पालिका रेस्ट रुम वाटते का ? स्थायी समिती सभापतींचा आयुक्तांना सवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 1, 2017 06:57 AM2017-12-01T06:57:13+5:302017-12-01T06:57:21+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने आर्थिक मंजुरी देण्याच्या प्रकरणांवर आयुक्त सह्या करीत नाहीत. पण आर्थिक नसलेल्या कामांवर, अहवालांवरही ते सह्या करीत नसल्याने स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी

 Do you think the municipality restroom? The Chairman of Standing Committee chairmen questioned | पालिका रेस्ट रुम वाटते का ? स्थायी समिती सभापतींचा आयुक्तांना सवाल

पालिका रेस्ट रुम वाटते का ? स्थायी समिती सभापतींचा आयुक्तांना सवाल

Next

कल्याण : कल्याण-डोंबिवली महापालिका आर्थिक अडचणीत असल्याने आर्थिक मंजुरी देण्याच्या प्रकरणांवर आयुक्त सह्या करीत नाहीत. पण आर्थिक नसलेल्या कामांवर, अहवालांवरही ते सह्या करीत नसल्याने स्थायी समितीचे सभापती रमेश म्हात्रे यांनी गुरूवारी तीव्र नाराजी व्यक्त केली. काहीच कामे न करता पालिकेत येऊन बसायला आयुक्तांना महापालिका ही रेस्ट रुम वाटते का, असा संतप्त सवाल त्यांनी केला.
महापालिकेने त्रयस्थ लेखा परीक्षणाचे काम मुंबईतील व्हिजेटीआय या संस्थेला दिले होते. महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियानांतर्गत रस्त्यांच्या सिमेंट काँक्रिटीकरणाची जी कामे करण्यात आली, त्याचे त्रयस्थ लेखा परीक्षण करण्याचे हे काम आहे. त्यांच्या आधीच्या कामाचा अहवाल सादर न करताच व्हिजेटीआयला पुन्हा एक वर्षासाठी त्रयस्थ लेखा परीक्षक म्हणून नेमण्यासाठी २३ लाख ६० हजारांच्या खर्चाला मान्यता देण्याचा विषय यापूर्वीच्या सभेत आला होता. तेव्हा आधीच्या त्रयस्थ लेखा परीक्षण अहवालानुसार महापालिकेने काय कारवाई केली, याचा सविस्तर अहवाल सादर करण्याची मागणी भाजपा सदस्या उपेक्षा भोईर यांनी केली होती. त्यावेळी शहर अभियंता प्रमोद कुलकर्णी यांनी हा अहवाल तयार करुन आयुक्तांच्या सहीनिशी सभेला सादर केला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यामुळे त्रयस्थ अहवालाच्या कामाला मंजुरी देण्याचा विषय स्थगित ठेवण्यात आला होता. दोन सभांनंतर गुरूवारी पुन्हा हा विषय पटलावर घेण्यात आला होता. तेव्हा अहवाल तयार असून त्यावर आयुक्तांनी सही केली नसल्याचे स्पष्टीकरण अभियंता कुलकर्णी यांनी दिले. त्यावर सभापती म्हात्रे संतप्त झाले. आयुक्तांना सही करण्यासाठीही वेळ नाही का, असा प्रश्न त्यांनी विचारला. आर्थिक कोंडीमुळे विकासकामांना मंजुरी मिळत नाही, हे सदस्य समजू शकतात. मात्र अहवालाचा विषय आर्थिक नसताना त्यावर सही करणे आयुक्तांनी का रोखून धरले आहे? आयुक्त महापालिकेत येऊन जातात. ते महापालिकेला केवळ रेस्ट रुम समजत असल्याचा आरोप म्हात्रे यांनी केला आणि त्रयस्थ लेखा परीक्षणाचा विषय पुन्हा स्थगित ठेवण्यात आला.

काळेंची केवळ बदली नको

लेखा विभागत काम करणाºया रवी काळे यांचा मुलगा रोहित याने विकासकामे केली आणि महापालिकेने त्याला दोन कोटी रुपयांची बिलेही दिली. अन्य ठेकेदारांची बिले न देता रोहित काळेवर इतकी मेहरबानी का? त्याचे वडील त्याच खात्यात असल्याने ही मेहेरनजर केली का? असाही मुद्दा सभेत उपस्थित झाला. त्यांच्या भावानेही विकासकामे केल्याचे लक्षात आणून देण्यात आले. त्याच्यावर कठोर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने केवळ त्याची त्या खात्यातून बदली केली. त्याची चौकशी का केली नाही, असा मुद्दा मांडून पुन्हा या प्रकरणी चौकशी करण्याचे आदेश सभापती म्हात्रे यांनी प्रशासनाला दिले.

सुरक्षारक्षकांची फेरनेमणूक
मोहिली, नेतिवली, टिटवाळा, बारावे याठिकाणी दोन वर्षे जलशुद्धीकरणाचे रसायन वापरण्यासाठी एक कोटी ३२ लाख, तर जलकुंभासाठी ब्लिचिंग पावडर वापरण्यासाठी ८३ लाखांच्या कामाला मंजुरी देण्यात आली. सुरक्षा महामंडळाकडून पुरविण्यात आलेले ४४ सुरक्षा रक्षक व दोन सुपरवायझर यांच्या फेरनेमणुकीसही मंजुरी देण्यात आली. त्यावर ५० लाख ५५ हजार खर्च होणार आहेत.

Web Title:  Do you think the municipality restroom? The Chairman of Standing Committee chairmen questioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.