भिवंडी : भिवंडी महापालिकेच्या निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयाने हुरूप वाढलेला काँग्रेस पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहे. ग्रामीण भागात दीर्घकाळ असलेला प्रभाव, त्या राजकारणाची नस ओळखण्याची क्षमता हेच काँग्रेसचे या निवडणुकीतील भांडवल असेल. शिवाय मुस्लिम मतदारांवरही पक्षाची भिस्त असल्याची माहिती काँग्रेसचे ठाणे ग्रामीण अध्यक्ष तथा माजी खासदार सुरेश टावरे यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागतील हे गृहीत धरून ग्रामीण भागातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यात आणि जिल्ह्यात विविध कार्यक्रम राबविले होते. त्याला जो प्रतिसाद मिळाला, त्या आधारे काँद्रेस पक्षाने विजायची गणिते बांधण्यास सुरूवात केली आहे. त्यातही ग्रामीण भागातील पारंपरिक मतदारांवर पक्षाची भिस्त आहे.
या निवडणुकीत युती किंवा आघाडी झाली तर जागावाटपात एखाद्या भागातील आपल्या अस्तित्त्वाला नख लागू शकते हे गृहीत धरून कोणीही जागा सोडण्यास तयार होणार नाही. त्यामुळे मैत्रीपूर्ण लढतींवरच राजकीय पक्षांचा भर असेल याचे भाव ठेवत काँग्रेस समविचारी पक्षांची मोट बांधण्याच्या तयारीत आहे. जिल्ह्यातील मुस्लिम समाजाची एकगठ्ठा मते मिळावीत, यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. या समाजाने पाठिंबा दिल्यानेच भिवंडी महापालिकेत काँग्रेस पक्षाला घवघवीत यश संपादन करता आले होते. ग्रामीण भागातील मुस्लिम समाजाची मते अशी वळली, तर भाजपाचे सर्व मनसुबे उधळून यश मिळवणे काँग्रेसला शक्य होईल, असा त्या पक्षाच्या नेत्यांचा दावा आहे.
ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात काही ठिकाणी राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. जिल्हा परिषदेचे मागील उपाध्यक्ष इरफान भुरे हे राष्ट्रवादीचे होते. त्यांचे जिल्ह्यातील सर्व समाजाशी चांगले संबध आहेत. त्यामुळे स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीसह समविचारी पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढविणे अथवा भाजपाला एकटे पाडण्यासाठी सर्व पक्षांची एकत्र मोट बांधणे, असे दोन पर्याय दिले आहेत. गेले वर्षभर भाजपाला एकटे पाडण्यासाठी स्थानिक पुढाºयांचे प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांच्या काही बैठकाही झाल्या आहेत. त्यामुळे भाजपाने निवडून येण्याच्या क्षमतेचे किंवा प्रभावशाली स्थानिक नेते फोडण्यावर भर दिला आहे.
शिवसेना, रिपब्लिकन पक्षाला सोबत घेत आम्हीही निवडणूक लढवू, अशी माहिती भाजपाचे नेत जाणीवपूर्वक पसरवत आहेत. पण त्याला दुजोरा देण्यास शिवसेनेचे नेते तयार नाहीत.