७११ मध्ये दवाखाना सुरू करण्यास टाळाटाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2019 03:27 AM2019-01-07T03:27:47+5:302019-01-07T03:28:20+5:30

भार्इंदर पालिका : प्रदीप जंगम यांचे बेमुदत उपोषण

Avoid starting a dispensary in 711 | ७११ मध्ये दवाखाना सुरू करण्यास टाळाटाळ

७११ मध्ये दवाखाना सुरू करण्यास टाळाटाळ

Next

मीरा रोड : दवाखाना व प्रसूतिगृहाच्या आरक्षणात बांधलेल्या आमदार नरेंद्र मेहता व संबंधितांच्या ७११ रुग्णालयप्रकरणी पालिकेने जागा ताब्यात घेऊनही तेथे दवाखाना सुरू न केल्याच्या निषेधार्थ जिद्दी मराठा संस्थेचे प्रदीप जंगम यांनी रविवारपासून पालिका मुख्यालयाबाहेर साखळी उपोषण सुरू केले आहे. संबंधितांवर कारवाई करून ७११ कंपनीला काळ्या यादीत टाकण्यासह आयुक्त व प्रशासनाविरोधात आता माघार घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

२०११ मध्ये परवानगी घेऊन ७११ कन्स्ट्रक्शन कंपनीने दवाखाना व प्रसूतिगृहाच्या आरक्षणात २०१३ पासून स्वत:चे रुग्णालय सुरू केले. पण, महापालिकेला चार हजार ६६० चौरस फुटांचा दोन मजली दवाखाना व प्रसूतिगृहाचे बांधकाम विनामूल्य बांधून दिले नाही.
उलट, मेहता यांनी स्वत: २०१६ मध्ये पालिकेला पत्र देऊन बांधकाम पालिकेस हस्तांतरण करण्यात सूट द्यावी, अशी मागणी केली.
७११ रुग्णालय सुरू असताना नागरिकांना पालिकेच्या प्रसूतिगृह व दवाखान्याची सुविधा मात्र मिळत नसल्याने जिद्दी मराठा प्रतिष्ठानचे प्रदीप जंगम यांनी बेमुदत उपोषण सुरू केले असता जुलै २०१७ मध्ये पालिकेने तीन महिन्यांत इमारत ताब्यात घेण्याचे लेखी आश्वासन दिले होते. पण, ताब्यात घेणे तर सोडाच, उलट आॅगस्ट २०१८ च्या पालिका निवडणुकीत भाजपाचे व नंतर महापौर डिम्पल मेहता यांचे पक्ष कार्यालय उघडण्यात आले.

जंगम यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली असता आयुक्तांनाच हजर राहण्याचा आदेश दिला. त्यानंतर, पालिकेला देय असलेला बांधकाम करारनामा करून पालिकेस हस्तांतरित करण्यात आले. विनाभोगवटा रुग्णालय चालवण्यासह करआकारणी न केल्याने पालिकेने त्याचे सुमारे २४ लाख रुपये कंपनीकडून वसूल केले.
त्या अनुषंगाने आॅगस्ट २०१८ मध्ये लोकायुक्तांनी तक्रार निकालात काढली. पण, त्यालाही पाच महिने झाले, तरी पालिकेने दवाखाना व प्रसूतिगृह सुरूच केलेले नाही. जंगम, कृष्णा गुप्ता उपोषणात सहभागी झाले आहेत. प्रशासन काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.

प्रशासनाची धावपळ
जंगम यांनी आंदोलन सुरू केल्याने पालिका प्रशासनाची पुन्हा धावपळ सुरू झाली असून नगररचना विभागाचे सहायक संचालक श्रीकांत देशमुख यांनी लेखी पत्र देऊन उपोषणास बसू नये, म्हणून कळवले आहे. पत्रात देशमुख यांनी दिशाभूल करण्याचा पवित्रा कायम ठेवला आहे. जंगम यांनी मेहता, महापौर डिम्पल, आयुक्त खतगावकर यांच्यावर संगनमताचा आरोप करत नागरिकांसाठी दवाखाना व प्रसूतिगृह सुरू करेपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचे जंगम यांनी म्हटले आहे.

Web Title: Avoid starting a dispensary in 711

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.