नफ्यासाठी नाटकांच्या तारखांचे ‘खासगी’करण?, नाटकाच्या गळचेपीचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 02:49 AM2017-11-24T02:49:29+5:302017-11-24T02:50:23+5:30

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या व्यवस्थापनाकडूनच तारीखवाटपाचे ‘नाटक’ सुरू आहे.

The allegations of drama 'privatization' of plays for drama, drama playback | नफ्यासाठी नाटकांच्या तारखांचे ‘खासगी’करण?, नाटकाच्या गळचेपीचा आरोप

नफ्यासाठी नाटकांच्या तारखांचे ‘खासगी’करण?, नाटकाच्या गळचेपीचा आरोप

Next

जान्हवी मोर्ये 
डोेंबिवली : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या सावित्रीबाई फुले कलामंदिराच्या व्यवस्थापनाकडूनच तारीखवाटपाचे ‘नाटक’ सुरू आहे. त्यामुळे नाटकांना तारखा मिळत नाही. केवळ खाजगी कार्यक्रमांना तारखा दिल्या जात आहेत. त्यामुळे नाट्यनिर्मात्यांना तारखाच मिळत नाहीत. शनिवारी-रविवारी खाजगी कार्यक्रमांनाच बरोबर तारखा दिल्या जातात. जास्तीचा नफा आणि ब्लॅक मनी मिळवण्यासाठी हा उद्योग सुरू आहे. या हव्यासातून नाटकाची गळचेपी होत असल्याचा आरोप नाट्यनिर्मात्यांनी केला आहे.
नाट्यनिर्माते धनंजय चाळके यांनी सांगितले की, कल्याणमधील अत्रे मंदिरात सध्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे डोंबिवलीतील फुले कलामंदिरात कल्याणमधील संस्थांचे कार्यक्रम होत आहेत. अनेक नाट्यनिर्मात्यांनी तीन महिने आधीपासून अर्ज करून नाटकांच्या तारखा देण्याची मागणी फुले कलामंदिराच्या व्यवस्थापनाकडे केली आहे. वास्तविक पाहता शनिवार-रविवार सुट्यांचे वार असल्याने नाटकांना या दिवशीच्या तारखा मिळाव्यात, असे अलिखित आहे. मात्र, त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे. १८ नोव्हेंबर ते २४ डिसेंबरदरम्यान केवळ ‘सही रे सही’ या एकाच नाटकाला तारीख देण्यात आली आहे. अन्य कोणत्याही नाट्यनिर्मात्याच्या तारखेच्या मागणीचा विचार झालेला नाही. रविवार व शनिवार या दिवशी नाट्यनिर्मात्यांच्या अर्जांचा विचार करून त्यांना तारखा मिळणे अपेक्षित असताना त्याऐवजी खाजगी कार्यक्रमांना तारखा दिल्या जातात. तारखावाटपात व्यवस्थापनाचे स्वयंघोषित खाजगीकरण झाल्याचा आरोप चाळके यांनी केला आहे. व्यवस्थापनाला खाजगी कार्यक्रमांच्या तारखा देण्यातून ब्लॅक मनी मिळत असेल. नाट्यनिर्मात्यांनी भेटून याविषयी चर्चा करण्याचे ठरवले,तेव्हा १० दिवसांसाठी नाट्यगृह बंद ठेवणार असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे चर्चेला फाटा मिळाला. परंतु, नाट्यनिर्माते आलेच नाही, अशी उलटी बोंब व्यवस्थापनाने मारली आहे, असे चाळके म्हणाले.
तारखांचे वाटप आॅनलाइन केले जाईल, अशी घोषणा करण्यात आली होती. मात्र, ती हवेत विरली आहे. आॅनलाइन बुकिंगमुळे ब्लॅक मनी व स्वयंघोषित खाजगीकरणाला लगाम लागेल, अशी अपेक्षा नाट्यनिर्मात्यांकडून केली जात होती. तीही फोल ठरली आहे. त्यामुळे आॅनलाइनपद्धत ‘आॅफलाइन’ आहे, याकडेही चाळके यांनी लक्ष वेधले आहे. दुसरीकडे ‘कोडमंत्र’ या नाटकालाही तारखा न मिळाल्याने त्याच्या निर्मात्यांनीही डोंबिवलीत प्रयोग न करण्याची भूमिका घेतली.
दरम्यान, यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत महापालिकेत बैठक झाली होती. तेव्हा नाट्यनिर्माता व नाट्य परिषदेचा प्रत्येकी एक प्रतिनिधीशी चर्चा करून तारखावाटप केले जाईल, असे सांगण्यात आले. मात्र, त्याचीही अंमलबजावणी प्रशासनाकडून अद्याप झालेली नाही. मराठी नाटकांचीच गळचेपी केली जात आहे, असा आरोप नाट्यनिर्मात्यांकडून केला जात आहे. मध्यंतरी, नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यात आली. तेव्हा नाट्यनिर्मात्यांना विश्वासात घेतलेले नाही. साधे पत्रही त्यांच्याकडे नाही. त्यामुळे कोणाची चर्चा करून भाडेवाढ केली, असा सवाल नाट्यनिर्मात्यांनी केला आहे.
>तारखावाटपाची यादी देता येणार नाही. मात्र, १८ ते २४ डिसेंबरदरम्यान चार नाटकांना तारखा दिलेल्या आहेत. त्यामुळे एकाच नाटकाला तारीख दिल्याचे म्हणणे चुकीचे आहे. देवगंधर्व महोत्सवाला राष्ट्रीय कीर्तीचे कलावंत येतात. सवाई गंधर्व एवढाच मानाचा देवगंधर्व महोत्सव समजला जातो. याशिवाय, मेडिकल असोसिएशनचा कार्यक्रम आहे. तोही महत्त्वाचा आहे. त्यामुळे त्यांना नाट्यगृह नाकारता येत नाही. प्रशासकीय समिती तारीखवाटपांचे काम करते. त्यात माझा सहभाग नसतो. या समितीत नाट्यपरिषदेचे व निर्माता संघाचा प्रतिनिधी नसतो. हे प्रतिनिधी येत नाही.
- दत्तात्रय लधवा, व्यवस्थापक, सावित्रीबाई फुले नाट्यगृह

Web Title: The allegations of drama 'privatization' of plays for drama, drama playback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.