प्लास्टिकबंदी एक महिन्यानंतर; सर्वसामान्यांनाच बसला भुर्दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2018 03:14 AM2018-07-23T03:14:59+5:302018-07-23T03:15:15+5:30

नव्या नवलाईपुरताच उगारला कारवाईचा बडगा

After one month of plastic ban; The common man sat | प्लास्टिकबंदी एक महिन्यानंतर; सर्वसामान्यांनाच बसला भुर्दंड

प्लास्टिकबंदी एक महिन्यानंतर; सर्वसामान्यांनाच बसला भुर्दंड

Next

राज्यभरात प्लास्टिकबंदीस महिना होत आहे. या महिनाभरात पालिकेने कारवाई करून अडीच लाखांचा दंड आणि ७.५ टन प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या आहेत; परंतु या प्लास्टिकबंदीचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांनाच बसला असून ज्या पिशव्या पूर्वी विनामूल्य मिळत होत्या, त्याच पिशव्यांसाठी आता पाचपासून ते २० रुपये मोजावे लागत आहे. सामान्यांबरोबरच मिठाई दुकानदारांनाही याचा अधिक फटका बसला असून अनेक दुकानांमधून रसमलाई, बासुंदी अशासारखे पदार्थ गायब झाले आहेत. शिवाय उत्पन्नांवर थेट ४० ते ५० टक्यांपर्यंत परिणाम झाल्याचा दावा या दुकानदारांनी केला आहे.
बंदीला महिना उलटून गेल्यानंतरही कोणत्या प्रकारच्या पिशव्या वापराव्यात, कोणत्या वापरू नयेत याबाबत संभ्रम तर आहेच, शिवाय जनजागृती करण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे त्यांनीच मान्य केले आहे. महापालिका क्षेत्रामध्ये विशेष पथकाने प्लास्टिकचा वापर करणाऱ्यांच्या विरोधात कारवाईला सुरुवात केली. त्यानुसार २३ जून ते आतापर्यंत पालिकेने ३ हजार ६६० किलो प्लास्टिक जप्त केले आहे. तर विविध आस्थापनांकडून आतापर्यंत दोन लाख २० हजारांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.
राज्य सरकारच्या वतीने प्लास्टिकवर बंदी आणल्यानंतर २३ जूनपर्यंत सर्व आस्थापने आणि गृहसंकुलांना आपल्याजवळ असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या व प्लॅस्टिकची विल्हेवाट लावण्यासाठी मुदत देण्यात आली होती. त्यानंतर मागील महिन्याभरात पालिकेच्या माध्यमातून विविध पथके तयार करून आता पर्यंत २.५० लाखांचा दंड वसूल केला आहे. तर तब्बल ७.५ टन प्लास्टिक जप्त करण्यात आले आहे. तर थर्माकोल हे वेस्ट सेंटरवर नेउन त्यावर प्रक्रिया केली जात असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे; परंतु जनजागृतीमध्ये आम्ही कमी पडल्याची कबुली मात्र पालिका प्रशासनाने दिली आहे.
कुठलाही पर्याय उपलब्ध न करताच प्लास्टिकबंदी केल्याने त्याचा फटका हा नागरिकांना सहन करावा लागला आहे. किराणामालाच्या दुकानात जा नाही तर मॉलमध्ये किंवा भाजी विकत घ्यायला जा सर्वच ठिकाणी कापडी पिशव्यांसाठी दोन रुपयांपासून ते अगदी दहा रुपये मोजावे लागत आहेत. मॉलमध्ये तर कापडी पिशवीसाठी १६ ते २० रुपये आकारत आहेत. त्यामुळे हा नाहक भुर्दंड ग्राहकांना सहन करावा लागत आहे. त्यातही मॉलमध्ये डाळी, तांदूळ, साखर हे ज्या पिशव्यांतून दिले जात आहे, त्या पिशव्या खालून केव्हा फाटतील याचा नेम नसल्याने त्याची सतत भीती ग्राहकांच्या मनात आहे. काही ठिकाणी कापडी पिशव्या विनामूल्य दिल्या जात असल्या तरी त्याची किंमत वस्तूमधून दुकानदार घेत आहे. स्वाभाविक त्या वस्तूंचे भाव वाढले आहेत. अगदी भाजीपासून वेफर म्हणा किंवा मिठाई या सर्वांचेच भाव चढे झाले आहेत. त्यामुळे हा आणखी एक फटका ग्राहकांना बसला आहे. या बंदीमुळे ग्राहकाची मात्र दोन्हीकडून कोंडी झाली आहे.
शहरातील काही मिठाई दुकानांतून मलाईचे पदार्थ तर गायबच झाले आहेत. रसमलाई, बासुंदी आदींसह इतर पदार्थही बहुतेक मिठार्इंच्या दुकानातून दिसेनासे झाले आहेत. काही ठिकाणी वेफर किंवा इतर वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत. शिवाय दुकानात येणाºया ग्राहकांचा ओढा असला तरीही वस्तू घेण्याचे प्रमाण मात्र कमी झाले आहे. त्यामुळे या व्यवसायवर ४० ते ५० टक्के परिणाम झाला आहे. शिवाय हातगाड्यांवर भाजीविक्री करणाºया भाजी विक्रेत्यांच्या व्यवसायावरही चांगलाच परिणाम झाला असून व्यवसाय हा अर्ध्यापेक्षाही खाली आला आहे.

प्लास्टिकबंदीचे स्वागतच आहे; परंतु आमच्या व्यवसायावर बराच परिणाम झाला आहे. ग्राहक दुकानात येत असले तरी पूर्वी जेवढ्या वस्तू नेत होते, आता ते कमी नेतात. व्यवसायावर ४० ते ६० टक्के परिणाम झाला असून नोकरदारांचे पगार कसे द्यायचे याचाही आता विचार करावा लागत आहे. कागदी पिशव्या तयार करण्यासाठी येणारा खर्च हा प्लॅस्टिक पिशवीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे इतर पदार्थांच्या किमती वाढविण्याशिवाय पर्याय शिल्लक राहत नाही.
- ब्रिजेश गोस्वामी, शतरंज मिठाईचे मालक.

जनजागृती करण्यात प्रशासन म्हणून आम्ही कमी पडलो हे मान्य करतो. परंतु आता विविध माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. तसेच कोणत्या प्रकारचे प्लास्टिक वापरायचे, कोणते वापरु नये याबाबत जो काही संभ्रम आहे तो दूर करण्याचाही प्रयत्न केला जाईल. तसेच प्लास्टिक पिशव्यांऐवजी कागदी पिशव्यांचा पर्याय दिला जाणार आहे.
- मनीषा प्रधान, मुख्य प्रदूषण नियंत्रण अधिकारी

प्लास्टिकबंदी झाली; परंतु सर्वसामान्यांच्या खिशाला मात्र कात्री लागली आहे. साधी वस्तू घ्यायची झाली तरी कागदी पिशवीसाठी जास्तीचे पैसे जवळ ठेवावे लागतात.
- रत्नमाला भोईर, गहिणी.

प्लास्टिकबंदीचे स्वागतच आहे; परंतु पर्याय देणेही गरजेचे आहे. पर्याय नसल्याने अनेक ठिकाणी ग्राहकांची लूट सुरू झाली आहे. पर्याय मिळाल्यास किमान याला आळा तरी बसेल.
- हर्षलता कांबळे, नोकरदार.

आता वस्तू आणायच्या झाल्यास हातात पिशवी घेऊन जाणे भाग पडते. प्लास्टिक पिशव्यांचा पुन्हा पुन्हा वापर करणे शक्य होत होते; परंतु कापडी आणि कागदी पिशव्यांचा वापर अशा पद्धतीने शक्य नाही. या पिशव्या हव्या असल्यास त्यासाठी वेगळे पैसे मोजावे लागतात.
- यशवंत यादव, नोकरदार.

Web Title: After one month of plastic ban; The common man sat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.