विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 05:59 PM2017-07-25T17:59:00+5:302017-07-25T18:07:07+5:30

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर,१९२६ रोजी जन्मलेले प्रा.यशपाल यांचे काल, सोमवार दिनांक २४ जुलै, २०१७ रोजी म्हणजे वयाची नव्वदी पार केल्यानंतर निधन झाले. एक परिपूर्ण जीवन जगलेले प्रा.यशपाल हे सर्वांनाच प्रिय असलेले, उमदे व्यक्तीमत्व होते.

vaijanaana-anai-tantarajanaanaata-ramalaelaa-khaelaiyaa | विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

विज्ञान आणि तंत्रज्ञानात रमलेला खेळीया

googlenewsNext

- अ.पां.देशपांडे 

पाकिस्तानातील झांझ या गावी २६ नोव्हेंबर,१९२६ रोजी जन्मलेले प्रा.यशपाल यांचे काल, सोमवार दिनांक २४ जुलै, २०१७ रोजी म्हणजे वयाची नव्वदी पार केल्यानंतर निधन झाले. एक परिपूर्ण जीवन जगलेले प्रा.यशपाल हे सर्वांनाच प्रिय असलेले, उमदे व्यक्तीमत्व होते. प्रा. यशपाल जबलपूरहून पाकिस्तानच्या फैझलाबादमधील लैलापूराच्या कॉलेजात इंटर सायन्स (आताची बारावी) करायला आले होते. नंतर लाहोरच्या सरकारी कॉलेजातून यशपाल यांनी  भौतिकशास्त्रात पदवी घेण्यासाठी प्रवेश घेतला, पण दरम्यान भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि अनेकांना पाकिस्तान सोडून भारतात यावे लागले. यशपाल हे त्यातील एका  होते. मग त्यांनी आपले पदवीचे शिक्षण दिल्ली विद्यापीठात पुरे केले. १९४९ मध्ये यशपाल मुंबईला नुकत्याच सुरू झालेल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च उर्फ टी.आय.एफ.आर.मध्ये कामाला आले. यशपाल यांनी प्रा.पीटर्स बर्नार्ड यांच्याबरोबर विश्वकिरणांवर (कॉस्मिक किरण) काम केले. विश्वकिरण वातावरणात कसे प्रवास करतात, यावर त्यांनी महत्त्वाचे काम केले आहे.  फैझलाबदामधील लैलापूराच्या कॉलेजात यशपाल इंटर सायन्स करीत असताना त्यांची निर्मल  यांच्याशी  दोस्ती झाली, तिचे पुढे प्रेमात रूपांतर झाले व १९५३ साली त्यांचा पुण्यात विवाह झाला. निर्मल यांनी त्यांना तेव्हापासून यशपालांच्या कालच्या मृत्युदिनापर्यंत म्हणजे ६४ वर्षे साथ दिली.१९५४ साली यशपाल मेसेचूसेटस येथील एम.आय.टी.मध्ये पीएच.डी.करायला गेले. यशपाल यांना संगीताची आवड असल्याने त्यांनी एमआयटीमध्ये रवीशंकर यांच्या सतार वादनाचा कार्यक्रम तेव्हा आयोजित केला होता. पीएच.डी.करून यशपाल १९५८ मध्ये परत टीआयएफआरला आले. 
टीआयएफआरला यशपाल असतानाच प्रा.भा.मा.उदगावकर आणि प्रा.वि.गो.कुलकर्णी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांचे विज्ञान शिक्षण सुधारण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांच्या या प्रयत्नात प्रा.यशपाल सहभागी झाले होते आणि ते या शालेय मुलांना शिकवत असत. या गरीब मुलांचे शिक्षण चांगले व्हावे याची कळकळ त्यांनाही प्रा.उदगावकर व कुलकर्णी यांच्या एवढीच प्रकर्षाने होती.नंतर १९७३ मध्ये प्रा.यशपाल अहमदाबादला इस्रोच्या  स्पेस अॅप्लीकेशन सेन्टरमध्ये दाखल झाले. यशपाल यांच्या गटाला सॅटलाईट इंस्ट्रक्शनल टेलिव्हिजन एक्सपिरीमेंट उर्फ साईट कार्यक्रमाची जबाबदारी दिली होती.या कार्यक्रमाद्वारे मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, राजस्थान व बिहार येथील चार राज्यातील ग्रामीण मुलांचे शिक्षण सेटलाईटद्वारा करण्याचा  उपक्रम हाती घेतला होता. यावेळी लागणारी अनेक इलेक्ट्रोनिक उपकरणे कुठे बाजारात मिळत नसत, पण त्यापूर्वी वर्ष-दोन वर्षे अमेरिकेने ती विकसित केली होती आणि त्या त्या खात्यातील लोक यशपालान्च्या मागे असत की, आम्हाला ही उपकरणे शिकण्यासाठी अमेरिकेला पाठवा. यशपाल म्हणत अमेरिकेने काय केले? त्यांच्या वेळी  जगात ती कोणालाही माहीत नव्हती. आता ती अमेरिकनांना माहीत आहेत. पण तुम्ही स्वत: ती विकसित का करत नाही? मी नाही कुणाला अमेरिकेत पाठवणार आणि असे करून त्यांनी आपल्या वैज्ञानिकांना ती येथे भारतात विकसित करायला लावली.त्यामुळे या वैज्ञानिकांत एक आत्मविश्वास तयार झाला. यशपाल त्यांच्या बरोबर काम करणा-या लोकांबरोबर चर्चा करून त्यांना सतत नवनवीन कल्पना देत व नाविन्यपूर्ण कामासाठी उद्युक्त करत.साईट कार्यक्रमाच्या वेळी ते नॅशनल  इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या विद्यार्थ्यांना अवकाश विज्ञान समजावून देत. अवघड विषय सोपा करून सांगण्यात त्यांची हातोटी होती. यामुळेच ते या संस्थेचे काही वर्षे अध्यक्षही झाले होते.  ते मोठ्यांबरोबर शालेय विद्यार्थ्यांतही चांगले रमत. त्यांना हिंदी बोलण्याची विलक्षण हौस होती.पॅशचन म्हणा ना! त्यामुळे ते इग्रजीत बोलत असताना कधी हिंदीत शिरतील हे त्यांनाही समजत नसेल, इतकी ती भाषा त्यांच्या रक्तात भिनली होती. 
१९८१ पासून दोन वर्षे प्रा.यशपाल युनेस्कोमध्ये गेले व यूएन कॉन्फरन्स ऑन आऊटर स्पेससाठी प्रमुख बनले. नंतर ते नियोजन आयोगात प्रमुख सल्लागार होते. पुढे ते भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान या खात्याचे सेक्रेटरी झाले. तेथून ते बाहेर पडून विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष झाले. या काळात त्यांनी भारतभर चार अंतर विद्यापीठीय केंद्रे स्थापन केली. डॉ.जयंत नारळीकरांची आयुका ही त्यातली एका संस्था होय. त्याच वेळी विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याने भारत जन विज्ञान जाथा या नावाचा एक भारतव्यापी कार्यक्रम आखला होता व त्यांना त्याचे अध्यक्ष केले होते. या विज्ञान प्रसाराच्या कार्यक्रमात ते पुरते रमले होते. त्यांना इतक्या विषयात रस होता की ती यादी संपणारच नाही. उदा. भौतिक शास्त्रज्ञ स्ट्रिंग थिअरीबद्दल बोलत असू देत, गाववाले लोक दुष्काळ, पूर, वाया गेलेले पीक याबद्दल बोलत असू देत, बाल विवाहाचा विषय असू देत की सतीची चाल असू देत, एखाद्या नाटकाची चर्चा असू देत, शालेय विद्यार्थी त्यांच्या एखाद्या प्रकल्पाबद्दल बोलत असू देत, समाज विज्ञान शास्त्रज्ञ एखाद्या सर्वेक्षणाची प्रश्नावली तयार करत असू देत की आणखी काही, यशपाल त्या त्या लोकांना काहीतरी न सुचलेले सांगून त्यांच्यात एक चैतन्य निर्माण करत असत. यशपालांची एक समिती मुलांच्या पाठीवरचे ओझे कमी करण्यासाठी होती. शिक्षणासम्बंधात तर त्यांची अनेक समित्यांवर नेमणूक झाली होती. दूरदर्शनच्या टर्निंग पॉईन्टमधील अथवा खग्रास सूर्याग्रहणाच्या वेळची त्यांची कॉमेंट्री कोण विसरेल?
आमच्या नॅशनल सेंटर फॉर सायन्स कम्युनिकेटर्सच्या २००० सालच्या पहिल्या परिषदेचे ते उद्घाटक होते. तेव्हा ते मंचावरून म्हणाले की, ही आंतरराष्ट्रीय परिषद भरवायला लागणारे पैसे हे लोक जमवू शकणार नाहीत, म्हणजे ही परिषद होऊ शकणार नाही, म्हणून मी येतो म्हणालो, पण यांनी पैसे तर जमवलेच, शिवाय  ही परिषदाही यशस्वीपणे भरवली. त्यांनतर २००३ साली जयंतराव नळीलीकरांच्या सन्मानार्थ भारावलेल्या परिषदेचे बीज भाषण त्यांनी केले होते. २००५ साली ब्राझील येथे भरवलेल्या आमच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला त्यांना एक वक्ता म्हणून बोलावले होते. ते येतोही म्हणाले होते, पण त्यांची तब्येत थोडी बिघडल्याने ते आले नाहीत. मग २००६ साली त्यांना ८० वर्षे पुरी झाली तेव्हा त्यांच्या सन्मानार्थ आम्ही दिल्लीत परिषद बोलावली होती. त्याचे उद्धाटन राष्ट्रपतीअब्दुल कलाम यांनी केले होते. त्यात नारळीकर, माशेलकर, गोवारीकर, माधवन नायर, एम.जी.के.मेनन, वरदराजन अशा दिग्गज शास्त्रज्ञानी भाग घेतला होता. त्यांना मुंबईच्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने राष्ट्रीय पुरस्कार दिला होता, तेव्हा शालेय मुलांबरोबर त्यांची प्रश्नोत्तरी ठेवली होती. अशा त्यांच्याबद्दलच्या अनंत आठवणी आहेत.पण एक खरे की विज्ञान आणि तंत्रज्ञानात इतका रमलेला खेळीया परत न होणे.

(लेखक मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह आणि प्रसिद्ध विज्ञान प्रसारक आहेत.)

Web Title: vaijanaana-anai-tantarajanaanaata-ramalaelaa-khaelaiyaa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.