उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 10:48 AM2019-03-27T10:48:39+5:302019-03-27T10:52:26+5:30

भावाभावात लढत...या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे.

Osmanabad Lok Sabha elections Barshi | उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीत जिकडं बार्शी, तिकडं सरशी !

Next
ठळक मुद्दे मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिलेएकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

बार्शी : पूर्वीच्या राखीव असलेल्या उस्मानाबादलोकसभा मतदारसंघात दोन वेळा संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी बार्शीच्या शिवाजी कांबळे यांना मिळाली असून, सेनेच्या तिकिटावर ते विजयी झाले होते. मागील सहा निवडणुकांमध्ये बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोन वेळा राष्ट्रवादी काँग्रेसला मताधिक्य दिले आहे़ एकंदरीत निवडणुकीच्या निकालामध्ये बार्शी तालुक्याची भूमिका ही निर्णायक राहिली असून, जिकडे  बार्शी तिकडे सरशी ही म्हण सर्वार्थाने लागू पडली आहे.

उस्मानाबादलोकसभा मतदारसंघ हा गेल्या वीस ते पंचवीस वर्षांपासून राखीव होता़ यापूर्वी काँग्रेसचे अरविंद कांबळे हे पाच वेळा खासदार होते़ त्यानंतर १९९६ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या शिवाजी बापू कांबळे यांनी अरविंद कांबळे यांचा पराभव केला़ पुढील १९९८ व १९९९ च्या दोन्ही निवडणुकात ते एकदा पराभूत झाले तर एकदा विजयी झाले़ या तिन्ही निवडणुकीत शिवाजी कांबळे यांना बार्शी तालुक्याने भरभरुन साथ दिली़ त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला.

त्यांना पहिल्यांदा तीस हजार, पुन्हा पंधरा व दहा हजार असा लीड तालुक्याने दिला़ २००४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या कल्पना नरहिरे व राष्ट्रवादीचे लक्ष्मणराव ढोबळे अशी लढत झाली़ यात ढोबळे यांना दोन हजारांचे मताधिक्य तालुक्यातून मिळाले़ मात्र ढोबळे हे पराभूत झाले़ २००९ ला मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर हा मतदारसंघ खुला झाला.

राष्ट्रवादीचे पद्मसिंह पाटील विरुध्द शिवसेनेचे रवींद्र गायकवाड अशी लढत झाली़ यामध्ये बार्शी तालुक्यात आ़ दिलीप सोपल व राजेंद्र राऊत या दोघांनीही पद्मसिंह पाटील यांचा प्रचार केल्याने तालुक्यातून तब्बल पंधरा हजारांचे मताधिक्य मिळाले़ पाटील संसदेत पोहोचले़ २०१४ च्या निवडणुकीतही पाटील विरुध्द गायकवाड असाच सामना झाला. बार्शी तालुक्याने यावेळी ५५ हजारांचा लीड दिल्याने गायकवाड हे विक्रमी मताने विजयी झाले़ म्हणजेच सहा निवडणुकांत बार्शी तालुक्याने चार वेळा शिवसेनेला तर दोनदा राष्ट्रवादीला लीड दिला आहे़ 

भावाभावात लढत...
या निवडणुकीत आ़ राणा जगजितसिंह पाटील विरुद्ध ओमराजे निंबाळकर या दोन भावाभावांत लढत होत आहे़ हे दोन्ही नेते उस्मानाबादचे आहेत़ यंदा विजय मिळवण्यासाठी बार्शी तालुक्याची भूमिका ही महत्त्वपूर्ण असणार आहे़ नव्हे तर बार्शी ज्या उमेदवाराला मताधिक्य देणार तोच खासदार विजयी होणार हे मात्र नक्की़ 

Web Title: Osmanabad Lok Sabha elections Barshi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.