वंशाचा दिवा नव्हे दिवटा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2019 10:26 AM2019-08-19T10:26:27+5:302019-08-19T10:26:31+5:30

कोर्ट स्टोरी...........

The lights don't ring! | वंशाचा दिवा नव्हे दिवटा !

वंशाचा दिवा नव्हे दिवटा !

Next

मागील दोन आठवड्यांतील दुनियादारीतील ‘माणसा रे माणसा कवा होणार माणूस?’ या दोन्ही कोर्ट स्टोरीला वाचकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. 

वंशाला दिवा पाहिजे म्हणून लोक मुलगा होण्याची आस ठेवतात. पण हे दिवे नव्हे दिवटे ! काय काय गुणं दाखवतात ते वाचा आजच्या कोर्ट स्टोरीत. 

त्या दिवशी त्या वृध्द बाई आॅफिसला आल्या. त्यांच्या डोक्याला बँडेज होते. दारुड्या मुलाने त्यांना बेदम मारहाण केली होती. कारण माहीत आहे? जमीन त्याच्या नावावर करुन मागण्यासाठी. त्या बार्इंचे पती निवृत्त शिक्षक होते. त्या बाईदेखील शिक्षिका होत्या. त्यांना चार मुलींवर मुलगा झाला होता. आई-वडिलांनी चार मुलींनंतर मुलगा झाला म्हणून त्याला अत्यंत लाडात वाढविले होते. चारही मुलींनी आई-वडिलांकडून सरस्वतीचा वारसा घेतला होता. चारही मुली अत्यंत हुशार होत्या. त्यांना चांगली स्थळं मिळाली. मुली त्यांच्या त्यांच्या घरी सुखात होत्या. अति लाडाने मुलगा बिघडला होता़ दारुच्या व्यसनाधीन झाला होता. लग्न केल्यावर मुलगा सुधारेल या आपल्याकडील वेड्या समजुतीप्रमाणे त्याचे लग्न करुन दिले. 

मुलीच्या वडिलांनीदेखील मुलाकडे न बघता त्याच्या आई-वडिलांच्या प्रॉपर्टीकडे बघून मुलगी दिली. ती बिचारी मुलगी कशीबशी सहा महिने नांदली व नवºयाच्या व्यसनाला कंटाळून माहेरी निघून गेली. मुलाचे हे कर्तृत्व बघून वडिलांनी जे अंथरुण धरले ते दोन महिन्यांतच स्वर्गवासी झाले. जाताना मृत्यूपत्रान्वये सर्व प्रॉपर्टी बायकोच्या नावावर केली होती. मुलाच्या नावाने काहीही केले नव्हते. त्यामुळे दिवटा आईला प्रॉपर्टी त्याच्या नावावर करण्यासाठी त्रास देत होता. मारहाण करत होता. त्या दिवशी तर आईचे डोकेच त्याने फोडले होते. जणूकाही आईने त्याच्यासाठी केलेले नवसच फेडत होता. मुलापासून कशी सुटका होईल हे विचारण्यासाठी त्या बाई माझ्याकडे आल्या होत्या. मी त्या बार्इंना दिवट्यावर केस करु असे सांगितले. त्याप्रमाणे त्यांना फिर्याद लिहून दिली. दिवट्यास अटक झाली. त्या बाई दहाच दिवसांत पुन्हा आॅफिसला आल्या. कशासाठी माहिती आहे? दिवट्याला जेलमधून सोडविण्यासाठी. मी त्यांना समजावून सांगितले की, तुमचा मुलगा आता सुधारण्याच्या पलीकडे गेला आहे. त्याला सोडवू नका. तो जेलबाहेर आल्यानंतर पहिले पाढे पंचावन्न सुरु होतील. त्या बाई आॅफिसमधून निघून गेल्या. त्या दिवशी त्या कोर्टाच्या आवारात दिसल्या. त्यांनी दुसरा वकील देऊन मुलाला सोडविले, असे माझ्या कानावर आले. काही महिन्यांतच वर्तमानपत्रात बातमी आली मुलाकडून आईचा खून. त्या बार्इंच्या मुली भेटायला आल्या. त्या मुलींतर्फे वकीलपत्र दाखल केले. मुलाला जामीन होऊ दिला नाही. अखेर मुलाला जन्मठेपेला पाठविले. वंशाला दिवा पाहिजे या अट्टाहासापोटी चांगल्या सुशिक्षित घराची कशी वाताहत होते याचे हे धडधडीत उदाहरण. 

आता दुसरा दिवटा बघा. या दिवट्याने वडिलांचा खून केला होता. कारण माहिती आहे? पोटगी द्यायला लागू नये म्हणून. त्याचे असे झाले, मयतास तीन मुलींनंतर मुलगा झालेला होता. चांगली शेतीवाडी होती. उत्पन्न चांगले होते. त्या दिवट्यालादेखील दारुचे व्यसन लागले. खरोखरी ही दारु कितीजणांचा विनाश करणार आहे हेच समजत नाही. दारुच्या व्यसनाबरोबरच जुगाराचेदेखील व्यसन त्या दिवट्यास लागले. मुलींची लग्ने झाली होती. त्या नांदत्या घरी सुखी होत्या. मुलाच्या व्यसनामुळे आईने अंथरुण धरले. त्यातून त्या उठल्याच नाहीत. बायकोच्या निधनानंतर ते खचून गेले होते.

मुलाच्या व्यसनाला कंटाळून त्यांनी घर सोडले. पोटगीसाठी त्यांनी मुलावर दावा दाखल केला. कोर्टाने पोटगी मंजूर केली. पोटगी भरली नाही म्हणून मुलास अटक झाली. यापुढे वडिलांना नियमितपणे पोटगी देईन असे लिहून दिले. त्यामुळे त्यास सोडले. वडिलांना घरी घेऊन गेला. त्यांचा खून केला व चोरट्याने मारले असा बनाव केला. परंतु पोलिसांनी त्यास तपासाअंती अटक केलीच. त्याच्या चुलत्याने माझ्याकडे वकीलपत्र दिले होते. रात्रीच्या वेळी हा प्रकार झाल्याने व पुरावा नसल्याने दिवटा सुटला. थोड्याच दिवसांत वर्तमानपत्रात बातमी आली मोटरसायकल ट्रकवर धडकून तरुणाचा मृत्यू. तोच दिवटा होता तो. वडिलांच्या खुनातून सुटला, पण त्या सर्वश्रेष्ठ न्यायाधीश भगवंताने त्याला सजा दिलीच. 
वंशाचा दिवा नव्हे दिवटेच हे ! 
अ‍ॅड. धनंजय माने
(लेखक ज्येष्ठ विधिज्ञ आहेत.) 

Web Title: The lights don't ring!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.