दुष्काळाची दाहकता; पाण्याअभावी हंजगी गावातील ग्रामस्थांनी केले स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2019 12:36 PM2019-05-16T12:36:25+5:302019-05-16T12:39:20+5:30

हंजगी गावात तीव्र पाणीटंचाई; तलाव, बोअर, विहीर, अन्य पाण्याचे स्रोत पडले बंद

Due to drought; The residents of Hanjgi village migrated due to lack of water | दुष्काळाची दाहकता; पाण्याअभावी हंजगी गावातील ग्रामस्थांनी केले स्थलांतर

दुष्काळाची दाहकता; पाण्याअभावी हंजगी गावातील ग्रामस्थांनी केले स्थलांतर

Next
ठळक मुद्देगेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहेया गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहे

अक्कलकोट : गेल्या काही वर्षांपासून सतत पाणीटंचाईला सामोरे जात खडतर जीवन जगणाºया हंजगी ग्रामस्थांना पाणीटंचाईची समस्या पाचविला पुजलेली आहे. या गावाला जानेवारीपासूनच तीव्र पाणीटंचाई भासत आहे. यामुळे येथून अनेक लोक पुणे, मुंबई यांसारख्या महानगरांत रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होत आहेत. एकूणच या भागातील तलाव, बोअर, विहीर आदी प्रकारचे स्रोत कोरडेठाक पडल्याने भयावह स्थिती निर्माण झाली आहे.

एकेकाळी ऊसशेती, फळबाग व दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव़ बोअर, विहीर घेईल तिथे पाणी लागत होते. या माध्यमातून नावारूपाला आलेले हंजगी गाव सध्या भीषण पाणीटंचाईचा सामना करीत आहे. मागील ५-६ वर्षांपासून या गावाला दर जानेवारीपासून पाणीटंचाई भासत आहे. 

दरवर्षी ग्रामस्थांना याचे हाल सोसावे लागत आहेत. याबरोबरच तालुक्यातील हंजगी, जेऊर, हंद्राळ, हालचिंचोळी, वळसंग, बॅगेहळ्ळी, करजगी, मंगरुळ या भागातसुद्धा तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे. या भागात ५०० ते एक हजार फुटापर्यंत बोअरवेल घेऊन ही पाणी लागताना दिसत नाही. शासनाचे नियम धाब्यावर बसवून आज शेतकरी व नागरिक नवीन विहीर व बोअरवेल घेताना दिसतात. 
आज प्रत्येकाच्या शेतात दोन-दोन विहिरी व दोनपेक्षा अधिक बोअरवेल पाहायला मिळतात. यंदा मात्र या सर्व विहिरी व बोअरवेल कोरडे ठणठणीत पडले आहेत. यामुळेच या भागात सामान्य नागरिक, शेतकरी व जनावरे पाण्यासाठी वणवण भटकंती करताना दिसतात. उसाच्या पिकाला अधिक पाणी लागते़ ऊस शेतीतून अधिक उत्पादन मिळत असल्याने साहजिकच जास्तीत जास्त शेतकरी ऊस शेतीकडे वळले आहेत. अक्कलकोट तालुक्यात नेहमीच ऊस शेतीसाठी प्रसिद्ध असलेले हंजगी गाव सध्या पिण्याच्या पाण्यासाठी तीव्र संघर्ष करताना दिसते. 

दुग्धव्यवसाय अडचणीत
- एकेकाळी शेतीबरोबर दुग्धव्यवसायासाठी प्रसिद्ध असलेल्या हंजगी गावात हालहळ्ळी, कोन्हाळी अशा तीन-चार गावचे गवळी लोक दूध संकलन करून सोलापूर येथे छोट्या हत्तीच्या साह्याने घेऊन जात होते. आता याच गावात पाणी-चारा टंचाई निर्माण झाली आहे. म्हणून दूधव्यवसाय मोडकळीस        आलेला आहे. तसेच उसाचे क्षेत्र नेहमी मोठ्या प्रमाणात होते. यामुळे एका शेतकºयाकडे तीन-तीन साखर कारखान्यांचे शेअर्स होते. तरीही कधी कधी अतिरिक्त ऊस होत होता. या शिवारातील १०० विहिरी, ५०० हून अधिक बोअर, तलाव आदी स्रोत कोरडेठाक पडल्याने या गावात सध्या पिण्याच्या पाण्यासाठी मारामारी होत आहे, अशी माहिती रशीद मुल्ला यांनी दिली़

टँकर सुरू, पण नियोजन नाही...
- जानेवारीपासून हंजगी गावाला तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. आता महिनाभरापासून टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी नियोजन नाही.            यामुळे ज्या ठिकाणी एनटीपीसी फताटेवाडी येथे रोज टँकर भरतो त्या       ठिकाणी कधी डिझेल नाही म्हणून तर कधी वीज नाही म्हणून ठरलेल्या तीन खेपा होत नाहीत. यामुळे ग्रामस्थांकडून ओरड होत असते. पाण्यासाठी  शाळकरी मुले, आबालवृद्ध नेहमी धडपडत असतात, अशी माहिती सरपंच     उमेश पाटील यांनी दिली.

साखर कारखानदारी वाढली..
- गेल्या दहा ते पंधरा वर्षांखाली या भागात भरपूर ऊस होता. उसाचा पट्टा म्हणून  या गावाकडे पाहिले जायचे. म्हणूनच तालुक्यातील व जिल्ह्यातील सर्व कारखानदारांचे लक्ष या गावावर होते. गाळप हंगाम संपेपर्यंत गावातील ऊस टोळ्या हलत नव्हत्या. कधी कधी अतिरिक्त उसाचा प्रश्न या भागात निर्माण व्हायचा. या भागातील प्रत्येक शेतकरी पारंपरिक जुन्या पद्धतीने शेती करत असल्याने उसाच्या पिकासाठी भरपूर पाणी वाया जात असे. उसाच्या पिकाला पाणी कमी पडणार असे शेतकºयांना वाटले की, नवीन विहीर व बोअरवेल घ्यायला शेतकरी लगेच तयार व्हायचे. यामुळेच आज जमिनीतून पाण्याची  पातळी घटली आहे. या अतिरिक्त ऊस शेतीमुळेच आज या गावातील नागरिक व जनावरांनो पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. जमिनीतून पाण्याची पातळी घटल्याने शेतकरी व नागरिक हवालदिल झाले आहेत. 

Web Title: Due to drought; The residents of Hanjgi village migrated due to lack of water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.