सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नाविन्यपूर्ण कल्पना !

By Appasaheb.patil | Published: October 13, 2022 05:32 PM2022-10-13T17:32:38+5:302022-10-13T17:32:46+5:30

सोलापूर विद्यापीठात स्टार्टअप यात्रा कार्यक्रम

District officials of Solapur learned about students' innovative ideas about industry! | सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नाविन्यपूर्ण कल्पना !

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी जाणून घेतल्या विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नाविन्यपूर्ण कल्पना !

googlenewsNext

सोलापूर : स्वयंरोजगार व उद्योजकतेला वाव देण्यासाठी शासनाकडून सुरू असलेल्या महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रम अंतर्गत जिल्हास्तरीय प्रशिक्षण शिबीर व सादरीकरण सत्राचे आयोजन गुरुवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पार पडले. यावेळी स्वतः जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांच्या उद्योगाविषयी नवनवीन कल्पना जाणून घेतल्या. शासन विद्यार्थ्यांना निश्चितच मदत करेल तसेच उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी विविध योजना आणल्याचे शंभरकर यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील इनोव्हेशन इनक्युबेशन सेंटर आणि जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा कार्यक्रम अंतर्गत प्रशिक्षण शिबिर व सादरीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले होते. विद्यापीठाचे प्र-कलगुरू डॉ. राजेश गादेवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी शंभरकर यांच्यासह जिल्हा कौशल्य विकासचे सहायक आयुक्त सचिन जाधव यांची उपस्थित होती. संचालक डॉ. सचिन लड्डा यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविकात स्टार्टअप यात्रेविषयी सविस्तर माहिती दिली.

यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी विद्यार्थ्यांच्या कल्पना सुरुवातीला जाणून घेतल्या. सिंहगड, कोर्टी कॉलेजच्या वैष्णवी माळी, संदीप क्षीरसागर, प्रियदर्शनी महाडिक यांनी यावेळी कल्पनांचे सादरीकरण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी शंभरकर मार्गदर्शन करताना म्हणाले की, कल्पनेतूनच छोटे-मोठे उद्योग व्यवसाय निर्माण होऊन पुढे येतात. विद्यार्थ्यांनी भौगोलिक परिस्थिती, भविष्याचा विचार करून चांगल्या कल्पना आणाव्यात. स्किल डेव्हलपमेंट आणि इनक्युबेशन सेंटरच्या माध्यमातून त्या कल्पनांना स्टार्टअप करण्याचे काम शासनाकडून होईल. विद्यार्थ्यांनी स्वतःमध्ये कोणताही न्यूनगंड न बाळगता मोठ्या हिमतीने आत्मविश्वासाने परिस्थितीला सामोरे जाऊन आपल्या कल्पनांचा व उद्योग व्यवसायाचा विस्तार करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्र-कुलगुरू डॉ. गादेवार म्हणाले की, उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली पुढे जात आहे. वेगवेगळे कार्यक्रम हाती घेऊन विद्यार्थ्यांना उद्योजक होण्यासाठी पूर्ण क्षमतेने मार्गदर्शन करण्याबरोबरच शासनाच्यावतीने त्यांना निधीच्या माध्यमातून प्रोत्साहन दिले जात आहे. महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटीची यासाठी मदत मिळत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमास जिल्हाभरातून मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले.

Web Title: District officials of Solapur learned about students' innovative ideas about industry!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.