मोठी बातमी; सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेचा प्रस्ताव जाणार मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2021 04:27 PM2021-12-30T16:27:48+5:302021-12-30T16:27:54+5:30

विभागीय आयुक्तांकडून अद्याप नाही मंजुरी : प्रशासनाच्या भूमिकेवर घेतला संशय

Big news; The proposal of Siddheshwar Yatra in Solapur will go to the Chief Minister's Court | मोठी बातमी; सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेचा प्रस्ताव जाणार मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

मोठी बातमी; सोलापुरातील सिद्धेश्वर यात्रेचा प्रस्ताव जाणार मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

googlenewsNext

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा प्रस्ताव सध्या विभागीय आयुक्तांच्या टेबलवर असून आयुक्तांच्या मंजुरीनंतर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टेबलवर जाणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर यात्रेतील धार्मिक विधींना परवानगी मिळणार आहे.

साधारण पुढील सात ते आठ दिवसांत यात्रेचे स्वरूप प्रशासनाकडून जाहीर होणार आहे. दहा जानेवारीपासून धार्मिक विधी प्रारंभ होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर यात्रेचा आराखडा जाहीर करा, अशी मागणीदेखील भाविकांकडून होत आहे. माेजक्याच लोकांच्या उपस्थितीत योगदंडासह नंदीध्वज मिरवणुकीला परवानगी देण्याची मागणी यात्रेचे मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी केली आहे.

शहर व ग्रामीण भागात मोठे राजकीय, सांस्कृतिक कार्यक्रम होतात. कोरोना अद्याप गेलेला नाही. अशात गर्दीच्या ठिकाणी संसर्गाचा धोका अधिक आहे, याची जाणीव सिद्धेश्वरभक्तांना असून कार्तिक यात्रा, राजकीय सभा तसेच इलेक्ट्रोसारख्या कार्यक्रमांना परवानगी देताना ज्या अटी-शर्ती लागू होत्या, त्या अटी व शर्ती लागू करून यात्रेला परवानगी द्यावी, अशी मागणीदेखील हिरेहब्बू यांनी केलेली आहे.

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क असून ग्रामदैवत सिद्धेश्वर यात्रा मर्यादित स्वरूपात करण्याचा निर्णय घेतला आहे. हाेम मैदानावरील गड्डा यात्रा यंदा न करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला असून यंदा फक्त यात्रेतील धार्मिक विधींना प्रशासनाकडून परवानगी मिळणार आहे. प्रशासनाच्या भूमिकेवर भाविकांनी नाराजी व्यक्त केली असून प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटून अनेक भाविक यात्रेला परवानगी देण्याची मागणी करताहेत. धार्मिक विधी प्रसंगी किती भाविकांना तसेच मानक-यांना परवानगी असणार आहे. याबाबत प्रशासनाकडून निर्णय झालेला नाही. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यंदा यात्रेतील धार्मिक विधीदरम्यान गर्दी होऊ नये. त्यामुळे यात्रेतील धार्मिक कार्यक्रम पोलिसांच्या देखरेखीखाली व्हावेत, असा अहवाल पोलीस प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केला आहे.

यात्रेबाबत पोलीस आयुक्त तसेच मनपा आयुक्तांचा अहवाल जिल्हा प्रशासनासमोर सादर झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने यात्रेचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे पाठवला आहे. आयुक्त दोन दिवसांत पोलीस आणि मनपा प्रशासनाच्या प्रस्तावाला मंजुरी देतील. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात्रेच्या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देतील.

मागच्या वर्षी कोरोनाची तीव्रता अधिक होती. त्यावेळी प्रशासनाने यात्रेला परवानगी दिली नाही. प्रशासनाच्या आदेशानुसार यात्रा मर्यादित स्वरूपात झाली. मागच्या वर्षाच्या तुलनेत यंदा कोरोनाची परिस्थिती राहिली नाही. राजकीय मेळावे, उद्घाटने, कार्यक्रम तसेच सांस्कृतिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होताहेत. कार्तिक यात्रेलाही प्रशासनाने परवानगी दिली होती. मग, सिद्धेश्वर यात्रेला परवानगी देताना प्रशासन इतका विचार का करीत आहे.

राजशेखर हिरेहब्बू, सिद्धेश्वर यात्रेचे मानकरी

Web Title: Big news; The proposal of Siddheshwar Yatra in Solapur will go to the Chief Minister's Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.