बार्शी - कुर्डूवाडी पाईपलाईनमधून पाण्याची चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 02:57 PM2019-05-04T14:57:38+5:302019-05-04T14:59:13+5:30

गुप्त पद्धत : खांडवी ते श्रीपतपिंपरी फाट्यादरम्यान दहा एकर उसाची लागवड, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे बार्शीत कृत्रिम पाणीटंचाई

Barshi - Theft of water from the Kurdawadi pipeline | बार्शी - कुर्डूवाडी पाईपलाईनमधून पाण्याची चोरी

बार्शी - कुर्डूवाडी पाईपलाईनमधून पाण्याची चोरी

Next
ठळक मुद्देबार्शी शहरातील नागरिक अर्ध्या इंची पाईपलाईनसाठी वर्षाकाठी सुमारे २,५०० पाणीपट्टी भरतातश्रीपतपिंपरी फाट्यावर बाटलीच्या कारखान्यावर एक शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून गुप्त पध्दतीने उजनी पाईलपाईनमधील लाखो लिटर पाणी दररोज शेतीसाठी वापरत आहे

शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : बार्शी शहराला पाणीपुरवठा करणाºया उजनी-बार्शी पाईपलाईनच्या कंदर-कुर्डूवाडी ते बार्शी या ६५ कि़ मी़ अंतरावर मोठ्या प्रमाणात पाणीगळती व पाणीचोरी होत आहे. यामुळे प्रत्यक्षात उजनीतून उचलल्या जात असलेल्या पाण्यापैकी दहा टक्क्यांपेक्षा जास्त पाण्याची गळती होत आहे़ एवढेच काय तर कुर्डूवाडी ते बार्शी यादरम्यान खांडवी ते श्रीपतपिंपरी फाटा यादरम्यान एका शेतकºयाची उजनीच्या या पाण्यावर गुप्त पध्दतीने डल्ला मारत ऐन उन्हाळ्यात थोडे थोडके नव्हे तर  तब्बल दहा एकरापेक्षा जास्त ऊस बागायत आठ वर्षांपासून सुरु असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या पाणीचोरांचा तपास करुन संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी होत आहे.

बार्शी शहर हे पूर्वीपासून लोकसंख्येच्या बाबतीत मोठे शहर असून, या शहराला परंडा तालुक्यातील चांदणी व बार्शी तालुक्यातील पाथरी या दोन मध्यम प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो़ यातील पाथरीची पाईपलाईन ही तर ब्रिटिश काळातील असून, ग्रॅव्हिटीद्वारे पाणी शहराला येत आहे़ या दोन्ही योजना बंद आहेत़  याशिवाय आ़ दिलीप सोपल व तत्कालीन उजनी पाणी संघर्ष समितीच्या प्रयत्नाने उजनी ते बार्शी व्हाया कुर्डूवाडी ही संयुक्त पाणीपुरवठा योजना मंजूर झाली़ ९६ साली प्रत्यक्षात या योजनेचे  पाणी बार्शीत दाखल झाले़  योजनेवर असलेले एलआयसीचे कर्जही फिटले़ यातील कित्येक   कि़ मी़ पाईलपाईन ही काळ्या मातीतील असल्यामुळे सातत्याने लिकेजचे प्रमाण हे जास्त  आहे. याचबरोबरच आपल्या शेतीला तसेच जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे, यासाठी कित्येक शेतकरी मुद्दामहून पाईपलाईन फोडतात़ त्यामुळे दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते.

उजनी पाईपलाईनवर पाणीचोरी होऊ नये, तसेच पाण्याला गळती लागली आहे का, हे पाहण्यासाठी पेट्रोलिंगही केले जाते़ त्यासाठी स्वतंत्र तीन कर्मचाºयांची नेमणूकही केलेली असून, यावर दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात़ बार्शी शहरापासून श्रीपतपिंपरी फाट्यापर्यंत पाहणी केली असता, यादरम्यान तीन ठिकाणी पाईपलाईनला गळती झाल्याचे दिसून आले़ यामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याचे निदर्शनास आले़ यामुळे कृत्रिम पाणीटंचाई निर्माण झाली आहे.

अधिकारी गप्प कसे ?
अतिशय चलाखी करुन गेल्या आठ वर्षांपासून रोडच्या शेजारी बिनदिक्कतपणे दररोज लाखो लिटर पाण्याची चोरी सुरु असून, या परिसरातील लोकांनी याबाबत जिल्हाधिकाºयाकडे निनावी तक्रारीही दिलेल्या आहेत़ ऐन उन्हाळ्यात बार्शीत सातत्याने पाणीपुरवठा विस्कळीत होऊन नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत असताना दुसरीकडे बार्शीकरांच्या हक्काच्या पाण्याची चोरी असताना बार्शी नगरपालिकेच्या इतकी वर्षे हे कसे लक्षात आले नाही की, यामध्ये पदाधिकारी किंवा अधिकारी यांचे लागेबांधे आहेत, अशी शंका व्यक्त होत आहे़ 

कोणाचेही जाईना लक्ष
- श्रीपतपिंपरी फाट्यावर बाटलीच्या कारखान्यावर एक शेतकरी गेल्या आठ वर्षांपासून गुप्त पध्दतीने उजनी पाईलपाईनमधील लाखो लिटर पाणी दररोज शेतीसाठी वापरत आहे़ या शेतकºयाने पाईपलाईनला खालील बाजूस गळती करुन खाली खड्डा घेऊन त्यावर लोखंडी अँगल व पत्रे टाकून तीन पाईपद्वारे शेजारीच दोनशे फूट अंतरावर असलेल्या विहिरीत हे पाणी साठवले जात आहे़ यातून या कारखान्याशेजारी तब्बल दहा ते पंधरा एकर शेती बागायती केली आहे़ यामध्ये दहा एकर ऊस व तीन ते चार एकर कलिगंड तसेच इतर दुसºया पिकांचे बागायती क्षेत्र आहे़ विशेष म्हणजे या परिसरात सर्वत्र विहिरींच्या पाण्याने तळ गाठलेला आहे़ परिसरातील कोणत्याच शेतकºयाला मुबलक पाणी नाही, नव्हे तर तास-दोन तासदेखील मोटर चालणे शक्य नाही, अशी स्थिती असताना या एका शेतकºयाची जिवंत बागायत कशी, हे कोणाच्याच लक्षात आले नाही़

नुकसानभरपाईची मागणी
- बार्शी शहरातील नागरिक अर्ध्या इंची पाईपलाईनसाठी वर्षाकाठी सुमारे २,५०० पाणीपट्टी भरतात़ तरी संबंधित शेतकºयाकडून दिवस-रात्र तीन पाईपमधून पाच ते सात इंच पाणी वापरले जात आहे़ त्यामुळे या शेतकरी व व्यापाºयाकडून आजवर पालिकेचे झालेले नुकसान भरुन घेऊन त्याला व अशा पध्दतीने या लाईनवर जे कोणी पाणीचोरी करीत असतील त्यांच्यावर फौजदारी स्वरुपाचे गुन्हे दाखल करुन अद्दल घडवावी, अशी मागणी होत आहे.

दोन विहिरी असल्याचा बनाव 
या शेतकºयाने चलाखी करीत या कारखान्याच्या शेजारच्या विहिरीतून कुर्डूवाडी रोड क्रॉस करुन एक हजारपेक्षा जास्त फूट अंतरावर असलेल्या दुसºया विहिरीत पाणी सोडलेले आहे़ जर कोणी विचारले तर पाणी भरपूर आहे, आमच्याकडे दोन विहिरी आहेत, असे भासवले जात आहे़ 

Web Title: Barshi - Theft of water from the Kurdawadi pipeline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.