आनंदा उधाण...नाताळ सणात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2018 12:10 PM2018-12-25T12:10:43+5:302018-12-25T12:12:18+5:30

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून नाताळ सणाच्या पूर्वतयारीला सुरुवात होते़ ती थेट ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू असते़ ...

Anand Bhutan ... Christmas Celebration ... | आनंदा उधाण...नाताळ सणात...

आनंदा उधाण...नाताळ सणात...

googlenewsNext

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या रविवारपासून नाताळ सणाच्या पूर्वतयारीला सुरुवात होते़ ती थेट ख्रिसमसच्या पूर्वसंध्येपर्यंत म्हणजे २४ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत चालू असते़ कुटुंबातील प्रत्येक सदस्य याच भावनेने भारलेला असतो की, नाताळाची सर्व तयारी मनासारखी व वेळेत पूर्ण कशी होणार, याची धडपड प्रत्येक जण करीत असतो़ मागील शेकडो पिढ्यांपासून हे काम असेच चालू आहे.

सध्या यात भरपूर बदल झालेले पाहावयास मिळत आहे़ विज्ञान युगाचा प्रभाव, खुले आर्थिक धोरण, संगणक, मोबाईल, नेटकॅफे याचे परिणाम सर्वच क्षेत्रात तसेच ख्रिश्चन समुदायाच्या या एकमेव भव्य-दिव्य अशा ख्रिस्त जन्म महिन्याच्या प्रत्येक अंगावर झालेला आहे़ मागील काही वर्षांपासून आपण ते पाहत आहोत़ मात्र जुन्या पिढीतील लोकांना विचारल्यास नक्कीच ते जुना व नवीन नाताळ सण भाविक कसा साजरा करतात यावर परखड भाष्य करतील.

पूर्वीपासून नाताळाचा आनंद घेताना त्यासाठी अनेक प्रतिके आवश्यक असतात. त्यात कुटुंबाच्या प्रवेशद्वारात, दर्शनी भाग, उंचावर पंचकोनी तारा लावणे, मुख्य बैठकीच्या खोलीमध्ये एका कोपºयात गव्हाणीचा देखावा लावणे, छताला आकर्षक रंगातील पताका तयार करून बांधणे, दिवाणखान्यातच एक दोरी हाताला येईल या बेताने लावणे, त्यावर नातेवाईक, मित्र परिवार यांच्याकडून पोस्टाने आलेली शुभेच्छा कार्डे लावून ठेवायची़ स्वयंपाक घरात बनत असलेल्या फराळाची दरवळ सर्वत्र घमघमत असणे, फराळांची ताटे २६ डिसेंबर म्हणजे बॉक्सिंग डेला जिकडे तिकडे पोहोचविण्यासाठी शेजारी इष्टमित्र, परिवार यांची यादी पुन:पुन्हा तपासली जाते़ २४ तारखेच्या रात्री नवा पोशाख शिवणाºया टेलरकडे थांबलेले उत्साही तरुण, चेहºयावर प्रतीक्षा घेऊन त्याच्याकडे पाहत असतात़ मात्र सर्व तयार आहे फक्त काजे, बटन झाले की देतो, हे टेलरचे वाक्य ऐकले की, खट्टू होऊन एकमेकास पाहतात़ हे चित्र कमी-अधिक प्रमाणात सर्वत्र आढळते.

सोलापुरात मिशन स्कूल, संस्था यामधून नाताळाची धूम औरच असते़ नाताळाची मुख्य उपासना चर्चेसमध्ये होतात़ धर्मगुरू ख्रिस्त जन्मावर आधारित संदेश देतात़ सोलापुरातील मराठी भाषिक सभासद दि फर्स्ट चर्च याचे आहेत़ शाळा, संस्था यामधून सांस्कृतिक कार्यक्रम केले जातात़ सिद्धेश्वर पेठेतील ख्रिस्त सेवा मंदिर या संस्थेमार्फत विविध सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक उपक्रम राबविले जात असत़ १९६० च्या दशकातील नाताळ कसा साजरा होत असे, हे ज्यांनी पाहिले व अनुभवले ते खरोखरच भाग्यवान, त्यात एक मी होतो़ धार्मिक शिक्षण देणारी रविवारची शाळा, तरुण संघाची सभा प्रत्येक रविवारी. यातून नाताळाची तयारी महिनाभर आधी सुरू होत असे़ अनेक कलावंत सोलापूरसाठी येथूनच घडत गेले़ त्यातील काही ठळक नावे म्हणजे चित्रकार लमुवेल पाटोळे, अभिनेत्री सरला येवलेकर, शोभा येवलेकर, गायिका उषा येवलेकर, कॉमेडियन जॉनी डार्क, अनिल राबडे, अष्टपैलू जेम्स देवनूर, अशोक बनसोडे, उमाप बंधू, ज्योती गायकवाड, वादक सुधीर येळेकर, अभिनय क्षेत्रातील दादा साळवी, मोहन आंग्रे, सुगंध कांबळे, माधुरी पाटोळे, उदय आंबेकर यांनी अनेक वर्षे सोलापूर कलाक्षेत्रात ठसा उमटविला आहे़ याशिवाय आनंदराव उमाप, शशिकांत निकम, आंग्रेबुवा, रत्नाकर गायकवाड, ज्येष्ठ कलावंत जॉर्ज नाईक आदी मंडळी आपले नाव, आधीपासून राखून होती.

नाताळ म्हणजे आनंदपर्व़ साधारण डिसेंबर २० पासून कार्यक्रमाची सुरुवात होत असे़ ती ३ जानेवारीपर्यंत चालू असे़ लहान बालके ते तरुण, महिला, प्रौढ याप्रमाणे सर्व गटातून कार्यक्रम सादर होत. एक महत्त्वाची नोंद म्हणजे, मेथॉडिस्ट चर्चचे बहुतेक सभासद फर्स्ट चर्चचे होते़ नूतन वर्ष स्वागताची विशेष उपासना सध्याच्या मोतीबाग येथे होत असे़ त्या ठिकाणी सर्व कुटुंबे जेवणाचे डबे घेऊन येत़ एका मोठ्या झाडाखाली स्टेज बांधलेले असायचे़ प्रार्थना होई़ त्यानंतर एकमेकांना भेटून नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या जात़ मुले तरुण, महिला यांच्यात क्रीडा स्पर्धा होत असते़ कालांतराने या ठिकाणची नूतन वर्ष उपासना बंद पडली व ती हार्टलँड परिसर, रेल्वे लाईन्स येथे घेतली जात असे. आता ती सुद्धा बंद पडली आहे.

नाताळ व नवीन वर्ष यात आणखी दोन महत्त्वाच्या उपासना होत असतात़ शुभ्रदान ही उपासना नाताळाच्या आधीच्या रविवारी होते़ या उपासनेत चर्चमध्ये शुभ्र रंगाच्या वस्तू, पांढरी वस्त्रे आदी दान दिल्या जातात़ उपासनेच्या शेवटी या वस्तंूचा लिलाव होतो. त्यातून येणारी रक्कम चर्चच्या कोषात जमा होते़.

नूतन वर्ष म्हणजे एक जानेवारीच्या आधीचा दिवस ३१ डिसेंबर हा दिवस वर्षाखेरची उपासना होते़ याला वॉच नाईट सर्व्हिस तसेच कॅन्डल लाईट सर्व्हिस असे संबोधतात़ या उपासनेनंतर मेणबत्ती पेटवून गाणी गात, दत्त चौकातील जुने मंदिर ते रंगभवनजवळील नवीन चर्च अशी रॅली निघते व नवीन वर्षाचे स्वागत केले जाते़ 
- मोहन आंग्रे,
लेखक हे ख्रिश्चन धर्मातील प्रसिद्ध व्यक्ती आहेत.

Web Title: Anand Bhutan ... Christmas Celebration ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.