सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची लगबग सुरू 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2019 12:51 PM2019-03-18T12:51:03+5:302019-03-18T12:53:18+5:30

संतोष आचलारे  सोलापूर : कोण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा फ्लेक्स लावण्यात गुंतलाय, कोण मतदान यंत्राची व्यवस्थित मांडणी करून ...

The administration has started working for the Solapur, Madha Lok Sabha elections | सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची लगबग सुरू 

सोलापूर, माढा लोकसभा निवडणुकीसाठी प्रशासनाची लगबग सुरू 

Next
ठळक मुद्देरामवाडी येथील शासकीय गोदामात लोकसभा निवडणुकीत मतदान घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट ठेवण्यात आलेलोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी महसूल खात्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी गुंतलेनिवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्वतयारीची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सने जाणून घेतली

संतोष आचलारे 

सोलापूर : कोण निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयाचा फ्लेक्स लावण्यात गुंतलाय, कोण मतदान यंत्राची व्यवस्थित मांडणी करून त्याची तपासणी करतोय तर कोण व्हिडीओ कॉन्फरन्सच्या मिटिंगमध्ये व्यस्त आहे. असेच चित्र रविवारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात दिसून आले. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय यंत्रणा पूर्ण कामात गुंतली होती.

सोलापूर व माढा या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक प्रक्रिया निश्चित करण्यात आली आहे. मंगळवारपासून जिल्हाधिकारी तथा सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांच्या दालनात उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत. तत्पूर्वी उमेदवारांना आवश्यक असणाºया सुविधा निर्माण करण्याचे नियोजन सुटीच्या दिवशी करण्यात आले. निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी, निवडणूक उपजिल्हाधिकारी यांच्याकडून पूर्वतयारीची माहिती व्हिडीओ कॉन्फरन्सने जाणून घेतली. 

जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या खाली असलेल्या बहुउद्देशीय सभागृहात सोलापूर लोकसभा मतदारसंघाकरिता उमेदवारी अर्ज देण्याची- घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे या सभागृहासमोर निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या नावाचा फलक अर्ज स्वीकृती व विक्री केंद्राच्या तपशिलासह या ठिकाणी लावण्यात येत होता. गृहशाखेच्या समोर आचारसंहिता अंमलबजावणी नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले असून, तसा फलक त्या ठिकाणी लावण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रांताधिकारी कार्यालय, करमणूक खाते व तहसील कार्यालयासमोरही संबंधित विधानसभा मतदारसंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकाºयांचा फलक लावण्यात आला आहे. 

जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, निवडणूक उपजिल्हाधिकारी स्नेहल भोसले, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदींसह महसूल खात्यातील सर्व अधिकारी निवडणुकीच्या पूर्वतयारीसाठी सायंकाळी उशिरापर्यंत व्यस्त असल्याचे दिसून आले. सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी येत्या दोन दिवसांत उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्याची प्रक्रिया सुरू होत असल्याने उमेदवारी अर्ज देणे, उमेदवारांना सुविधा अ‍ॅपची माहिती देणे, आचारसंहिता पालन करणे, उमेदवारांच्या खर्चावर नियंत्रण ठेवणे, मतदान केंद्रात सुविधा निर्माण करणे आदींबाबत आयोगाकडून माहिती घेण्यात आली. 

अत्याधुनिक मशीन आल्या, पेटारे मात्र कायम
- लोकसभा निवडणुकीसाठी अत्यंत अत्याधुनिक अशा प्रकारच्या मतदान मशीन आल्या आहेत. विशेषत: व्हीव्हीपॅटमुळे मतदारांना मतदानाची खात्री व पोहोच देणारी मशीन पहिल्यांदाच मतदानासाठी वापरण्यात येत आहे. एका बूथवर एक बॅलेट युनिट, एक व्हीव्हीपॅट व एक कंट्रोल युनिट असे तीन मशीन एकत्रित असणार आहेत. रामवाडी येथील गोदामातून या मशीनची मतदान केंद्रापर्यंत सुरक्षित वाहतूक करणे व मतदान झाल्यानंतर परत त्या मशीन गोदामात आणण्यासाठी पत्र्याच्या पेटाºया मागविण्यात आल्या आहेत. यामुळे या मशीनची सुरक्षा आणखीन बळकट झाली आहे.

अधिकाºयांनी डबा आणला तसाच राहिला
- लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी करण्यासाठी महसूल खात्यातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी गुंतले गेले आहेत. रविवारी सुटीचा दिवस असतानाही कामाच्या व्यापामुळे घरी जेवणासाठी जायला वेळ मिळेल की नाही याची खात्री नसल्याने अधिकारी व कर्मचाºयांनी घरून येताना डबाही आणला होता; मात्र निवडणूक आयोगाकडून दुपारी तीन नंतरही व्हिडीओ कॉन्फरन्स व बैठकांचे सत्र सुरूच राहिल्याने अनेकांचा डबा कार्यालयात आहे तसाच दिसून येत होता.

वाहनचालकांचीही तारांबळ
- लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी महसूल खात्यातील अधिकारी व कर्मचारी दिवसभर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. अधिकाºयांच्या शासकीय वाहनावर कार्यरत असलेल्या वाहनचालकांना आपले साहेब येणार तरी कधी असा प्रश्न पडत होता. सायंकाळी उशिरापर्यंत बैठका व नियोजन सुरूच असल्याने वाहनचालकांचा जीव मात्र कासावीस होताना दिसून येत होता.

पोलिसांचा पहारा
- रामवाडी येथील शासकीय गोदामात लोकसभा निवडणुकीत मतदान घेण्यासाठी आवश्यक असलेल्या ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट व बॅलेट युनिट ठेवण्यात आले आहे. मतदानाच्या आदल्या दिवशी येथील मतदान यंत्रे मतदान केंद्रांत पाठविण्यात येणार आहेत. तोपर्यंत या मशीनची सुरक्षा गोदामात करण्यात येत आहे. यासाठी दोन पोलीस पथकांची छावणी लावण्यात आली आहे. उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे हे रविवारी या ठिकाणी मतदान यंत्राच्या पेट्या तपासून व्यवस्थित लावण्यात व्यस्त होते. 

Web Title: The administration has started working for the Solapur, Madha Lok Sabha elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.