ज्येष्ठ कवी विद्याधर करंदीकर यांचे निधन

By admin | Published: October 1, 2016 11:59 PM2016-10-01T23:59:13+5:302016-10-02T00:09:11+5:30

सिंधुदुर्गातील साहित्य क्षेत्रावर शोककळा

Veteran poet Vidyadhar Karandikar passed away | ज्येष्ठ कवी विद्याधर करंदीकर यांचे निधन

ज्येष्ठ कवी विद्याधर करंदीकर यांचे निधन

Next

कणकवली : ज्येष्ठ कवी डॉ. विद्याधर करंदीकर (वय ५९) यांचे शनिवारी कणकवली येथे निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानंतर त्यांना शुक्रवारी रात्री कणकवली येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये थोडी सुधारणा होते असे वाटल्यावर त्यांना शनिवारी अधिक उपचारासाठी कोल्हापूर येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे सकाळी ११ वाजता निधन झाले.
कवी, बालनाटककार, मराठी आणि संस्कृत भाषेचे गाढे अभ्यासक असलेले डॉ. करंदीकर यांचा जन्म २ नोव्हेंबर १९५८ रोजी झाला. ते कणकवली येथे दंतवैद्यक होते. मराठी आणि संस्कृत भाषेचे जाणकार असलेले डॉ. करंदीकर हे अनेकांचे चालताबोलता संदर्भग्रंथ होते.
‘मराठी कवीची नाट्यसृष्टी - स्वरूप विशेष’ यावरील प्रबंधाला त्यांना पीएचडी पदवी प्रदान करण्यात आली होती. या प्रबंधाला सर्वोत्तम प्रबंधाचा अ. का. प्रियोळकर पुरस्कार लाभला होता. ‘कवी नाटककार सावरकर’ या समीक्षा ग्रंथाचे प्रकाशन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते रत्नागिरी येथे यावर्षी २८ जानेवारीला करण्यात आले. ‘स्वच्छंद’चे विंदांसमोर सादरीकरण
डॉ. करंदीकर हे विद्यार्थ्यांसाठी निबंध लेखनाच्या कार्यशाळा आवर्जून घेत असत. वि. स. खांडेकर यांच्या जन्मशताब्दीनिमित्त खांडेकरांच्या निवडक साहित्यावर आधारित कार्यक्रम ‘अमृतधारा’ याचे लेखन डॉ. करंदीकर यांनी केले होते. या कार्यक्रमाचे मुंबई दूरदर्शन आणि आकाशवाणीवर प्रसारण करण्यात आले होते. विंदा करंदीकर यांच्या साहित्यावर आधारित ‘स्वच्छंद’ हा कार्यक्रम विंदांसमोर सादर करून त्याची वाहवा डॉ. विद्याधर करंदीकर यांनी मिळविली होती. (प्रतिनिधी)
बालनाट्याला शासनाचा पुरस्कार
त्यांचा ‘चंदनी धुक्यामध्ये’ कवितासंग्रह विशेष गाजला. त्यांची ‘किनारा’ ही कविता सहावीच्या अभ्यासक्रमात होती. त्यांच्या ‘पहिला माझा नंबर’ या बालनाट्याला शासनाचा राम गणेश गडकरी पुरस्कार मिळाला होता. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सिंधुदुर्ग शाखेचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.

Web Title: Veteran poet Vidyadhar Karandikar passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.