सिंधुदुर्गातील निवती रॉक्स बेटांचा वापर मौजमजा अन् पार्ट्यांसाठी, जैव अधिवास धोक्यात येण्याची भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 11:53 AM2024-01-11T11:53:41+5:302024-01-11T11:53:41+5:30

समुद्रातील बेटांवर आहेत गूढ गुहा..

Use of Nivati Rocks Island in Sindhudurga for fun and parties, threats to bio habitat | सिंधुदुर्गातील निवती रॉक्स बेटांचा वापर मौजमजा अन् पार्ट्यांसाठी, जैव अधिवास धोक्यात येण्याची भीती

सिंधुदुर्गातील निवती रॉक्स बेटांचा वापर मौजमजा अन् पार्ट्यांसाठी, जैव अधिवास धोक्यात येण्याची भीती

संदीप बोडवे

मालवण : सिंधुदुर्गच्या वेंगुर्ला द्वीपसमूहातील (निवती रॉक्स) गूढ, नैसर्गिक गुहांमध्ये दुर्मिळ जैव परिसंस्थेचा खजिना संशोधकांना सापडला आहे. महत्त्वाचे म्हणजे याठिकाणी भारतीय पाकोळीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रजोत्पादन वसाहत आणि काही अज्ञात प्रजातीसुद्धा या परिसंस्थेत आढळून आल्या आहेत. दरम्यान, या भागात हौशी पर्यटकांचा वावरही वाढल्याचे निदर्शनास आले आहे.

मौजमजा आणि पार्ट्यांसाठी या बेटांचा वापर झाल्यास येथील जैव परिसंस्था कायमची धोक्यात येणार आहे. शासनाने तातडीने पावले उचलत हा भाग पर्यावरणदृष्ट्या जबाबदार पर्यटनासाठी संरक्षित करण्यात यावा, अशी मागणी अभ्यासकांकडून केली जाऊ लागली आहे.

समुद्रातील बेटांवर आहेत गूढ गुहा..

या द्वीपसमूहात २३ बेटे आहेत. यात मुख्यत्वे न्यू लाइट हाऊस, ओल्ड लाइट हाऊस, मिडल आयलंड आणि बर्न्ट आयलँड (बंदरा) या बेटांचा समावेश आहे. उर्वरित ११ छोटी बेटे आहेत आणि आठ ठिकाणी पाण्याखाली असलेले खडक आहेत. यातील ओल्ड लाईट हाऊस, बर्न्ट आयलँड आदी बेटांवर दुर्मिळ सागरी जैव परिसंस्थांचा अधिवास असलेल्या समुद्री गुहा आढळल्या आहेत.

हौशी पर्यटकांपासून संरक्षण आवश्यक..

वेंगुर्ला द्वीप समूहातील काही बेटांवर हौशी पर्यटकांचा वावर अलीकडे वाढला आहे. विनापरवाना थ्रील आणि रिल्ससाठी लाईट हाऊसवर जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पार्टी आणि मौजमजेसाठी पर्यटकांची पावले या बेटांकडे वळली आहेत. या गुहांमधील अधिवासांचे हौशी पर्यटकांपासून संरक्षण होणे आवश्यक असल्याचे मत संशोधकांनी व्यक्त केले आहे.

नियम आणि जबाबदारीचे पर्यटन आवश्यक

निवती राॅक्सचा परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आहे. निवती दीपगृह परिसरात प्रशासनाच्या परवानगीनेच प्रवेश देण्यात यावा. नौकांचे अँकरिंग करताना प्रवाळ तुटणार नाहीत, याची काळजी घ्यावी. परराज्यातून येत येथे स्पिअर फिशिंग करण्यास बंदी असावी. या बेटांवर अनधिकृतपणे वावरताना अपघात झाल्यास जीव वाचविणे कठीण असल्याने अतिउत्साही पर्यटकांना आवर घालणं गरजेचे असल्याचे मत अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.

सागरी अभयारण्याचा प्रश्न लटकलेला..

मालवण सागरी अभयारण्याच्या सीमांच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या प्रारूप आराखड्यात वेंगुर्ला द्वीप समूहातील १३.३३ चौरस किमीचे क्षेत्र समाविष्ट करण्यात आले आहे. मात्र, मालवण सागरी अभयारण्याचा प्रश्न अजूनही लटकता आहे. याठिकाणी अभ्यासकांना १० कोरल प्रजाती, विविध मासे, मालवणमध्ये कुठेही न आढळलेले सॉफ्ट कोरल, सागरी गवत, ब्लॅक टीप आणि हॅमर हेड शार्क आणि स्विफ्ट लेट पक्ष्यांचा अधिवास आढळला आहे.

Web Title: Use of Nivati Rocks Island in Sindhudurga for fun and parties, threats to bio habitat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.