‘वस्त्रहरण’मधील ‘गोप्या’ची एक्झिट, लवराज कांबळी यांनी ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 26, 2024 07:01 PM2024-03-26T19:01:34+5:302024-03-26T19:06:24+5:30

गीतांजली प्रोडक्शन स्वत:ची नाटक कंपनी

Theater actor Loveraj Kambli passed away | ‘वस्त्रहरण’मधील ‘गोप्या’ची एक्झिट, लवराज कांबळी यांनी ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

‘वस्त्रहरण’मधील ‘गोप्या’ची एक्झिट, लवराज कांबळी यांनी ६६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

मालवण : रेवंडी गावचे सुपुत्र आणि मराठी चित्र -नाट्य अभिनेते, निर्माता लवराज गिरिधर कांबळी (६६) यांचे मंगळवारी सकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास मुलुंड येथील निवासस्थानी अल्पशा आजाराने निधन झाले.

मराठी रंगभूमीवर इतिहास निर्माण करणाऱ्या वस्त्रहरण या नाटकात सुरुवातीला प्रॉम्प्टर आणि नंतरच्या काळात गोप्या या दोन्ही भूमिका आपल्या समर्थ अभिनयाने लोकप्रिय करून मालवणी आणि मराठी रसिकांच्या मनात ठसा उमटविणाऱ्या लवराज कांबळी यांच्या निधनामुळे मालवणी नाट्य क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली असून नाट्य क्षेत्रातून त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करण्यात येत आहे.

रेवंडी गावात प्राथमिक शिक्षण तर कांदळगाव ओझरच्या शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण करून लवराज कांबळी यांनी मुंबई गाठली. छोटी-मोठी नोकरी करताना त्यांनी मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या भद्रकाली प्रोडक्शनच्या वस्त्रहरण नाटकातून त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर पर्दापण केले. लवराज कांबळी हे नेपथ्यकार अंकुश कांबळी यांचे सख्खे जुळे भाऊ तर रंगभूषाकार तारक कांबळी यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात एक मुलगा, सून असा परिवार आहे.

गीतांजली प्रोडक्शन स्वत:ची नाटक कंपनी

भद्रकाली प्रोडक्शनच्या पांडगो इलो बा इलो, चाकरमानी, करतलो तो भोगतलो, येवा कोकण आपलाच असा या व इतर नाटकांमध्ये लवराज कांबळी यांनी काम केले. तर मालवणी नटसम्राट मच्छिंद्र कांबळी यांच्या निधनानंतर गीतांजली प्रोडक्शन ही स्वतःची नाटक कंपनी सुरू केली.

‘सेम टू सेम’ या सिनेमातही काम

गीतांजली प्रोडक्शनद्वारे लवराज कांबळे यांनी ‘येवा कोकण आपलाच असा’ हे नाटक पुन्हा रंगभूमीवर आणले. गीतांजली प्रोडक्शन मार्फत त्यांनी ‘वडाची साल पिंपळाक’, ‘तुका नाय माका’, ‘राखणदार’, ‘रात्रीचो राजा’ अशा विविध नाटकांची निर्मिती केली. तसेच लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सोबत ‘सेम टू सेम’ या सिनेमामध्येही त्यांनी काम केले होते.

Web Title: Theater actor Loveraj Kambli passed away

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.