सिंधुदुर्ग : सहकारातून मोदींचे स्वप्न साकार करुया : सुभाष देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2018 12:54 PM2018-10-31T12:54:46+5:302018-10-31T12:56:39+5:30

सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्ड अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कोकणात यशस्वी करुया. कोकणचे हे मॉडेल देशभरात राबवून प्रत्येक शेतकरी उन्नत झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद सहकाराच्या माध्यमातून उभी करुया, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बँकेत बोलताना केले.

Sindhudurg: Let's dream of Modi in Cooperative: Subhash Deshmukh | सिंधुदुर्ग : सहकारातून मोदींचे स्वप्न साकार करुया : सुभाष देशमुख

नैसर्गिक साधन संपती व्यवस्थापन मार्गदर्शन पुस्तिकेचे प्रकाशन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देसिंधुदुर्ग : सहकारातून मोदींचे स्वप्न साकार करुया : सुभाष देशमुखनैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प योजनेचा शुभारंभ

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँक आणि नाबार्ड अंतर्गत नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन प्रकल्प कोकणात यशस्वी करुया. कोकणचे हे मॉडेल देशभरात राबवून प्रत्येक शेतकरी उन्नत झाला पाहिजे हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण करण्याची ताकद सहकाराच्या माध्यमातून उभी करुया, असे प्रतिपादन राज्याचे सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी जिल्हा बँकेत बोलताना केले.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या प्रधान कार्यालयात महाराष्ट्र राज्य सहकारी बँक व भगिरथ ग्रामविकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प योजनेचा शुभारंभ सहकार व पणन मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, उपाध्यक्ष सुरेश दळवी, संचालक अतुल काळसेकर, जिल्हा प्रबंधक अजय थुटे, राज्य बँक प्रादेशिक कोल्हापूरचे व्यवस्थापक अक्षय नगरनाईक, नाबार्डच्या विभागीय सहनिबंधक ज्योती लाटकर, सहकार सहनिबंधक मेधा वाके, भगिरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिरुद्ध देसाई, सर्व संचालक, कर्मचारी, शेतकरी व व्यावसायिक उपस्थित होते.

प्रारंभी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचा शाल, श्रीफळ व गणेशमूर्ती देऊन बँकेच्यावतीने सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर यांनी केले. यावेळी कुक्कुटपालनासाठी महादेव पालव, दुधाळ जनावरे यासाठी भाऊ पालव, अंकुश माजगावकर, बायोगॅससाठी संतोष झारापकर व गणपत सावंत आदींना योजनेचे धनादेश वितरित करण्यात आले.

यावेळी सुभाष देशमुख म्हणाले की, भगिरथ प्रतिष्ठानच्या प्रकल्पाला यापूर्वी मी भेट दिली होती. भगिरथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून ५ कोटींच्या सहकार्यातून नैसर्गिक साधनसंपत्ती व्यवस्थापन प्रकल्प राबविण्यात येत आहे. भविष्यात हा प्रकल्प १०० कोटींपर्यंत करण्याचा यशस्वी प्रयत्न होईल.

महाराष्ट्रातील सहकार समृद्ध झाल्याशिवाय महाराष्ट्र समृद्ध होऊ शकत नाही. यवतमाळ जिल्ह्याला शंभर बायोगॅस असे उद्दिष्ट देण्यात आले आहे. तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात एका गावाला १०० बायोगॅसचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यातून सामाजिक व आर्थिक परिवर्तन करण्यासाठी सहकाराची मदत घेतल्यास सिंधुदुर्ग जिल्हा व कोकण समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही. हा प्रकल्प सहकाराच्या माध्यमातून कोकण विकासासाठी राबविण्याचा मानस आहे.

कोकणातील सहकारी बँका आणि नाबार्ड यांच्या माध्यमातून नैसर्गिक साधन संपत्ती व्यवस्थापन हे कोकणाचे मॉडेल तयार करण्यात येत आहे. हे कोकणचे मॉडेल यशस्वी करून हे मॉडेल देशात उभे करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गरिबातील गरीब उन्नत झाला पाहिजे, हे स्वप्न पूर्ण होईल. यासाठी सहकाराच्या माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न करुया, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.
 

Web Title: Sindhudurg: Let's dream of Modi in Cooperative: Subhash Deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.