Sindhudurg: Contrary to the consequences of cultivation of mango, the cultivator feared | सिंधुदुर्ग :आंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले

ठळक मुद्देआंबा पिकावर होणार विपरीत परिणाम, बागायतदार धास्तावले ढगाळ वातावरण, पाऊस पडल्याने तुडतुडे, कीटकांचे प्रमाण वाढणार

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यासह देवगड तालुक्यात दिवसभर ढगाळ वातावरण व काही ठिकाणी रिमझिम तुरळक प्रमाणात पाऊस पडल्याने तुडतुडे व कीटकांचे प्रमाण वाढून आंबा पिकावर विपरीत परिणाम होणार असल्याचे मत आंबा बागायतदारांमधून व्यक्त केले जात आहे.

बुधवारी सकाळी देवगड तालुक्यातील काही ठिकाणी तुरळक प्रमाणात पाऊस पडला. तर दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. याचा मोठा परिणाम आंबा पिकावरती होणार आहे.

सध्या तालुक्यामधील शेवटच्या टप्प्यातील आंबा कलमांना मोठ्या प्रमाणात मोहोर आला आहे. तर पहिल्या टप्प्यातील आलेल्या मोहोरावरती झालेली फळधारणा त्याच कलमांना पुन्हा आंबा मोहोर आल्याने त्या झाडांवरील फळांची घळ झाली होती.

अशा चिंताजनक परिस्थितीत बुधवारी तालुक्यामधील वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही ठिकाणी तुरळक पाऊस पडल्याने आंबा पीक मोठ्या प्रमाणात धोक्यात आले आहे.

ओखी चक्रीवादळामुळे डिसेंबर महिन्यामध्ये पडलेल्या पावसामुळे आंबा पिकावरती मोठा परिणाम झाला होता. यामुळे पहिल्या टप्प्यातील आंबा कलमांना मोहोर आल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील डिसेंबर महिन्यातील आंबा कलमांना येणारा मोहोर लांबणीवरती जाऊन तो जानेवारी महिन्याच्या शेवटी व फेब्रुवारीमध्ये आला.

आंबा कलमांना मोहोर उशिरा आल्यामुळे यावर्षी देवगड हापूसचा हंगाम एप्रिल व मे महिना अशा दोन महिन्यांमध्ये राहणार आहे. या ढगाळ वातावरणामुळे व तुरळक रिमझिम पडलेल्या पावसामुळे आंबा मोहोरावरती तुडतुड्यांचे, कीटकांचे, बुरशीचे व खारीचे प्रमाण वाढणार असल्याने कृषी सल्ल्यानुसारच फवारणी करण्यात यावी असे कृषीतज्ज्ञांचे मत आहे.

उत्पादनाच्या बाबतीत चिंतेची बाब

गतवर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये काही प्रमाणात तर मार्च, एप्रिल, मे महिन्यांमध्ये असा साडेतीन महिने देवगड हापूसचा हंगाम राहिला होता. गेल्या सात ते आठ वर्षांमधील सातत्याने होत असलेली आंबा पिकाची घट गेल्यावर्षी रोखली होती व उत्कृष्ट नसलेतरी समाधानकारक असे देवगड हापूसचे उत्पादन मिळाले होते.

यामुळे यावर्षीदेखील देवगड हापूसचे पीक समाधानकारक असणार असे दिसून येत असतानाच वातावरणामधील अचानक होत असलेला बदल ही उत्पादनाच्या बाबतीत फार मोठी चिंतेची बाब ठरणार आहे.

 


Web Title:  Sindhudurg: Contrary to the consequences of cultivation of mango, the cultivator feared
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.