सिंधुदुर्ग : कुणकेश्वर यात्रेची तीर्थस्नानाने सांगता, भाविकांची एकच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2018 06:53 PM2018-02-16T18:53:05+5:302018-02-16T18:58:03+5:30

श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची सांगता गुरुवारी पवित्र तीर्थस्नानाने झाली. दिवसभर अमावास्या असल्याने भाविकांनी समुद्रस्नानासाठी एकच गर्दी केली होती. पहाटेपासूनच समुद्रस्नानाला प्रारंभ झाला. यावर्षी जिल्ह्यातील पाच देवस्वाऱ्यांनी कुणकेश्वर क्षेत्राला भेट दिली.

The pilgrimage of the Kukeshwar Yatra, a single crowd of devotees | सिंधुदुर्ग : कुणकेश्वर यात्रेची तीर्थस्नानाने सांगता, भाविकांची एकच गर्दी

तीन दिवस पार पडलेल्या कुणकेश्वर यात्रोत्सवाला भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

Next
ठळक मुद्देकुणकेश्वर यात्रेची तीर्थस्नानाने सांगता, भाविकांची एकच गर्दी जिल्ह्यातील विविध पाच देवस्वाऱ्यांनी कुणकेश्वर क्षेत्राला दिली भेटप्रशासनासह ट्रस्टचे चोख नियोजन

कुणकेश्वर : श्री क्षेत्र कुणकेश्वरच्या तीन दिवस चाललेल्या यात्रोत्सवाची सांगता गुरुवारी पवित्र तीर्थस्नानाने झाली. दिवसभर अमावास्या असल्याने भाविकांनी समुद्रस्नानासाठी एकच गर्दी केली होती. पहाटेपासूनच समुद्रस्नानाला प्रारंभ झाला. यावर्षी जिल्ह्यातील पाच देवस्वाऱ्यांनी कुणकेश्वर क्षेत्राला भेट दिली.

यावर्षी महाराष्ट्रासह देशभराच्या कानाकोपऱ्यांतून सहा लाखांपेक्षा अधिक भाविकांनी यात्रेमध्ये उपस्थिती दर्शविली. दोन दिवस यात्रेमध्ये असणारा शिवभक्तांचा महापूर तिसऱ्या दिवशीही सर्वांना याचि देही याचि डोळा अनुभवायला मिळाला. मोडयात्रेमध्येही भाविकांची खरेदीसाठी झुंबड उडाली होती.

लहान मुलांबरोबर तरूणाई, आबालवृद्ध मंडळी विविध खेळांचा आनंद मनसोक्त लुटत होती. त्यात लहान मुले मोठे झुले, ट्रेन सफर, उंट व घोड्याची सफर, रिंग गेम, जम्पिंग गेम अशा विविध खेळांचा आनंद लुटत होते. तसेच महिलावर्गाचा गृहोपयोगी साहित्य, हत्यारे, शेती अवजारे, कपडे खरेदी आदी आवश्यक वस्तू खरेदीकडे कल होता.

कुणकेश्वर यात्रोत्सवावेळीच कलिंगडाचे पीक येत असल्याने कुणकेश्वर यात्रा आणि कलिंगडाची बाजारपेठ याला भाविकांच्यादृष्टीने खास महत्त्व असते. यावर्षीही कलिंगड बाजारालाही मोठा प्रतिसाद लाभताना दिसत होता.

तिसऱ्या दिवशी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी समुद्र किनाऱ्यावर पोलीस यंत्रणेमार्फत चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आपत्कालीन यंत्रणाही तयार ठेवण्यात आली होती. त्याचप्रमाणे कुणकेश्वर ग्रामस्थांकडून सुरक्षा पथके तैनात ठेवली होती.

प्रशासनासह ट्रस्टचे चोख नियोजन

कुणकेश्वर यात्रोत्सवासाठी प्रशासनाकडून स्पीड बोटीचेसुद्धा नियोजन करण्यात आले होते. पुरूषांसाठी व स्त्रियांसाठी स्वतंत्र चेंजिंगरूमची व्यवस्था करण्यात आली होती. यात्राकाळात विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींनी श्री देव कुणकेश्वराचे दर्शन घेतले. त्याचबरोबर स्थानिक भजन मंडळांबरोबर मुंबईस्थित भजन मंडळांनी आपली सेवा श्री चरणी अर्पण केली.

यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी ट्रस्ट आणि प्रशासनाचा योग्य ताळमेळ दिसून येत होता. यात्रेमध्ये कुणकेश्वर ग्रामपंचायत, देवस्थान ट्रस्ट, पोलीस यंत्रणा, महसूल विभाग, पंचायत समिती विभाग, एसटी महामंडळ, आरोग्य विभाग आदी विभागांनी आपली जबाबदारी चोख पार पाडली होती. देवस्वाऱ्या व भाविक भक्तांच्या सहकार्याबद्दल कुणकेश्वर देवस्थान ट्रस्ट, कुणकेश्वर ग्रामस्थ व प्रशासन यांनी आभार व्यक्त केले.
 

Web Title: The pilgrimage of the Kukeshwar Yatra, a single crowd of devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.