लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

By अनंत खं.जाधव | Published: March 26, 2024 12:29 PM2024-03-26T12:29:09+5:302024-03-26T12:30:33+5:30

राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत

Narayan Rane should not have been appointed to the Rajya Sabha just to give a chance to the Lok Sabha says Deepak Kesarkar | लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

लोकसभेला संधी देण्यासाठीच राणेंना राज्यसभेवर घेतले नसावे - दीपक केसरकर

सावंतवाडी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना राज्यसभेवर घेतले नाही.याचा अर्थ त्यांना लोकसभेवर संधी द्याची असेल जर त्यांना संधी दिली तर राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने केंद्रातून मोठ्याप्रमाणात निधी मिळेल असे म्हणत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सिंधुदुर्ग रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून राणेंच्या उमेदवारीचे स्पष्ट संकेत दिले.

ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी केसरकर यांनी किरण सामंत यांचा लोकसंपर्क दाडगा आहे.त्यामुळे कोणालाही उमेदवारी मिळाली तरी आपण प्रत्येक गावात जाऊन प्रचार करणार असेही स्पष्ट केले.यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजन पोकळे,रूपेश पावसकर उपस्थित होते.

केसरकर म्हणाले, प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षासाठी उमेदवारी मागणं हा त्यांचा हक्क आहे. आम्हीही जागा शिवसेनेसाठी मिळावी यासाठी आग्रही आहोत. पराभव डोळ्यासमोर असल्याने ठाकरे गटाकडे न मागता उमेदवारी जाहीर होते. मात्र निवडून येणाऱ्या जागेसाठी अनेकजण इच्छुक असतात. आमच्याकडेही महायुतीत इच्छुकांची संख्या जास्त असल्याने उमेदवारी जाहीर करण्यात उशीर होत आहे.  

महाविकास आघाडीचे उमेदवार राऊत यांनी गेल्या  १० वर्षात कोणतेही विकास काम केले नाही. त्यामुळे येथील जनतेत त्यांच्याबद्दल तीव्र नाराजी आहे. त्यावेळी आम्ही घेतलेल्या भूमिकेमुळेच व आमच्या मदतीमुळेच ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र, त्यांना उपकाराची जाण नसल्यानेच व पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने ते आता आमच्याविरोधात बेताल बडबड करीत आहेत. भाषणं करून काहीही बोलून टाळ्या घेणं सोपं असतं. लवकरच त्यांच्याकडे एवढा वेळ असेल की त्यांना केवळ भाषण करीतच फिरावं लागेल, असा टोला ही केसरकर यांनी लगावला तसेच राऊत यांचा पराभव निश्चित असल्याचे सांगितले.

 पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने विनायक राऊत यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्यामुळेच ते काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंडळींना एकत्र करून गोळा बेरीज करण्याचा  प्रयत्न करीत आहेत. सध्या शिमगोत्सव सुरू आहे. आरोपांचा हा धुरळा केवळ काही दिवसांपुरता आहे. शिमगोत्सव आठ ते पंधरा दिवस चालतो. धुरळा एकदाचा खाली बसल्यावर राऊत खरे काय आहेत हे येथील जनतेला समजेल, असा टोलाही त्यांनी लगावला.

महिलांवर होणारा अन्याय दूर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाचे नेते असून त्यांची आज देशाला गरज आहे. काश्मीरमधील ३७० कलम हटविण्याचा निर्णयामुळे तेथे लोकशाही प्रस्थापित झाली. तीन तलाख विरोधातील कायदा करून मुस्लिम महिलांवर होणारा अन्याय त्यांनी दूर केला. 

जनतेला मोफत धान्य

आज देशातील ८० कोटी जनतेला मोफत धान्य वितरित केले जात आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रोख रक्कम जमा होत आहे.  त्यांच्या अशा निर्णयांमुळेच पाकव्याप्त काश्मीर मधील लोक भारतात येण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत. लोकशाही नेत्यावर जनतेचा विश्वास असावा लागतो. लोकांची मन जिंकता आली तरच तुम्ही जिंकू शकता. त्यामुळे देशातील जनता मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी भरभरून मतदान करेल असा विश्वासही त्यांनी  व्यक्त केला.

Web Title: Narayan Rane should not have been appointed to the Rajya Sabha just to give a chance to the Lok Sabha says Deepak Kesarkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.