कणकवली नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

By सुधीर राणे | Published: March 27, 2024 01:04 PM2024-03-27T13:04:26+5:302024-03-27T13:05:19+5:30

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल होत ...

Kankavli Nagar Panchayat contract sanitation workers are on strike | कणकवली नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

कणकवली नगरपंचायतच्या कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन सुरू

कणकवली : कणकवली नगरपंचायतच्या ५२ कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे हाल होत आहेत. या अन्याया विरोधात नगरपंचायतचे सर्व कंत्राटी कर्मचारी एकवटले असून त्यांनी बुधवारी सकाळपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

कणकवली नगरपंचायतमध्ये ५२ कंत्राटी सफाई कर्मचारी आहेत. त्यामध्ये कणकवली शहरात सफाई करणारे कामगार आणि ट्रॅक्टर व अन्य वाहनांवरील चालकांचा समावेश आहे. नगरपंचायतच्यावतीने ठेकेदाराकडून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना दरमहा पगार दिला जातो. 
मात्र, फेब्रुवारी महिन्याचा पगार आता मार्च महिना संपत आला तरीसुद्धा देण्यात आलेला नाही. वारंवार मागणी करूनही ठेकेदाराने कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या पगारातून दरमहा भविष्य निर्वाह निधी(पीएफ)चे पैसे वजा करून घेतले जातात. तसेच ठेकेदारानेसुद्धा कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधी खात्यामध्ये आपला वाटा जमा करणे बंधनकारक आहे. 

मात्र, ठेकेदार आपल्याकडील रक्कम जमा करत नाही. या विरोधात सुद्धा हे काम बंद आंदोलन करण्यात येत आहे. जोपर्यंत आपला फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळत नाही आणि  ठेकेदार आपल्याकडील भविष्य निर्वाह निधीची रक्कम कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा करत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार या कर्मचाऱ्यांनी केला आहे. सर्व कर्मचारी नगरपंचायत कार्यालयासमोर जमा झाले होते.त्यांनी जोरदार घोषणाबाजीही यावेळी केली.
दरम्यान, नगरपंचायतचे मुख्याधिकारी विशाल खत्री यांनी कर्मचारी प्रतिनिधी तसेच ठेकेदार यांना चर्चेसाठी बोलाविले आहे.या चर्चेदरम्यान योग्य निर्णय न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशारा कर्मचाऱ्यांनी दिला आहे.

Web Title: Kankavli Nagar Panchayat contract sanitation workers are on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.