कणकवलीतील महामार्गाचे काम बंद पडणार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 11:15 AM2019-06-04T11:15:54+5:302019-06-04T17:28:29+5:30

कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.

Kankavali highway will be closed, city chief Sameer Nalawade said | कणकवलीतील महामार्गाचे काम बंद पडणार, नगराध्यक्ष समीर नलावडे यांचा इशारा

कणकवली शहरातील पावसाळी कामाच्या नियोजनाची बैठक नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी झाली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक व अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देनगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांचा इशाराकामे अपूर्ण असल्याने घेतला पवित्रा

कणकवली : कणकवली शहरातील महामार्ग चौपदरीकरणा अंतर्गत अनेक कामे आश्वासन देऊनही अद्याप पूर्ण झालेली नाहीत . ही कामे येत्या दोन दिवसात पुर्ण न केल्यास गुरुवारपासून शहरातील चौपदरीकरणाचे काम बंद पाडणार असल्याचा इशारा नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरपंचायतीतील सत्ताधारी नगरसेवकांनी दिला आहे.

कणकवली शहरातील पावसाळी कामाच्या नियोजनाची बैठक कणकवली नगरपंचायत कार्यालयातील नगराध्यक्षांच्या दालनात सोमवारी आयोजित करण्यात आली होती.

यावेळी उपनगराध्यक्ष रवींद्र गायकवाड , बांधकाम सभापती संजय कामतेकर , आरोग्य सभापती प्रतिक्षा सावंत, महिला व बालकल्याण सभापती उर्मी जाधव, नगरसेवक अबीद नाईक, ऍड. विराज भोसले, अभिजीत मुसळे , महेंद्र सांब्रेकर , बंडू हर्णे, सुमेधा अंधारी , मेघा सावंत, मानसी मुंज तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

कणकवली शहरात महामार्ग ठेकेदाराने केलेल्या अपूर्ण कामांमुळे पावसाळ्यात अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. याबाबत ठेकेदाराला आणि महामार्ग प्राधिकरणाला कळवून देखील कामे पूर्ण झालेली नाहीत. महामार्गाच्या दुतर्फा असलेली गटारे अपूर्ण आहेत. तसेच पथदीपही बसवण्यात आलेले नाहीत.

चौपदरीकरणात येणाऱ्या नाले तसेच पाइपलाईनची सफाईही अद्याप करण्यात आलेली नाही. त्यापेक्षा मोठा कहर म्हणजे ठेकेदाराच्या प्रतिनिधींनी तर दुरध्वनी उचलणे बंद केले आहे.पावसाळ्यात योग्य प्रकारे पाणी निचरा न झाल्यास अनेक घरे , दुकाने यांच्यामध्ये चिखलयुक्त पाणी जाण्याचा धोका आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरण आणि ठेकेदार कंपनीने येत्या दोन दिवसात शहरातील कामे पूर्ण करावीत.

अन्यथा गुरुवारपासून शहरात सुरू असलेले चौपदरीकरणाचे काम बंद पाडू असा इशारा नगराध्यक्ष आणि उपस्थित सत्ताधारी नगरसेवकांनी यावेळी दिला. तसेच त्याबाबतचे पत्र महामार्ग प्राधिकरण , प्रांताधिकारी, कणकवली पोलीस ठाणे याना देण्याचेही यावेळी ठरविण्यात आले.

शहरातील नाले व गटार सफाई तसेच नवीन गटार मारणे आदी कामांचा यावेळी ठेकेदाराकडून आढावा घेण्यात आला. तसेच नगरसेवकांनी काही नवीन कामेही यावेळी सुचविली. नगरसेवक अबीद नाईक, संजय कामतेकर, बंडू हर्णे यांनी आपल्या प्रभागातील कामे यावेळी ठेकेदाराला सांगितली .

नगरपंचायत रोड, पटकीदेवी ते हॉर्नबिल हॉटेल, तेलीआळी डीपी रोड ते पंचायत समिती येथील गटारे, विद्यानगर मधील कॉलेजमागील मोठा नाला, कॉलेज रोडची गटारे, शिवाजीनगर ते परबवाडी दरम्यानचा मोठा नाला साफ केल्याची माहिती यावेळी ठेकेदार मिथुन ठाणेकर यांनी दिली. तर ढालकाठी दरम्यानची चार चेंबर तत्काळ साफ करण्यात यावीत अशी मागणी नगरसेवक अबीद नाईक यांनी केली.

शिवाजीनगर परिसरात ११ केव्हीचा वीज पुरवठा गटारातून विजवीतरणकडून निवासी इमारतींना अंडरग्राउंड करण्यात आला आहे. त्यामुळे गटार सफाई करताना अडचण निर्माण होत असून कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात येऊ शकतो.याकडे नगरसेवकांनी लक्ष वेधले.

यावेळी विजवीतरण कंपनीशी याबाबत तत्काळ पत्रव्यवहार करण्यात यावा. तसेच वीज वाहिनी मुळे काही दुर्घटना घडल्यास त्याला वीज विरणच जबाबदार राहील असेही त्यांना कळविण्यात यावे.असे आदेश नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत प्रशासनास दिले.

पांगम बिल्डरने जळकेवाडीत नैसर्गिक ओहोळ अरुंद केला आहे. त्यामुळे पावसाळ्यात त्याचा फटका नागरिकांना बसणार आहे. त्याबाबत संबधित बिल्डरला नोटीस देण्यात यावी असेही नलावडे यांनी यावेळी सांगितले.

नरडवे रोड ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या पदपथावर खड्डे पडले असून तिथे दुर्घटना घडू शकते.असे मानसी मुंज यांनी सांगितले. त्याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी पत्रव्यवहार करा.असे नलावडे यांनी प्रशासनास सांगितले.

टेंबवाडीतील सार्वजनिक विहिरीचा गाळ काढण्याची सूचना नगरसेविका मेघा सावंत तसेच नगरसेवक अभिजित मुसळे यांनी केली. त्याला नगराध्यक्षानी सहमती दर्शविली. तसेच शहरातील सर्व नाले व गटारे लवकरात लवकर स्वच्छ करा असे आदेश नगराध्यक्ष नलावडे यांनी यावेळी ठेकेदाराला दिले.

शहरातील नाले, गटारांची साफसफाई !

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील अनेक नाले व गटारे साफ करण्यात आले आहेत. अजूनही काम सुरू असून पाणी साचण्याची संभाव्य ठिकाणे लक्षात घेऊन नागरिक तसेच नगरसेवकांनी अजूनही काही ठिकाणची नाले सफाई करायची असल्यास ती ठिकाणे सुचवावीत असे आवाहन यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले.


आपत्कालीन समिती नेमणार !

पावसाळ्यात शहरात पाणी साचून आपत्कालीन स्थिती निर्माण झाल्यास तत्काळ कार्यवाही करण्यासाठी नगरसेवक तसेच नगरपंचायत कर्मचारी यांची आपत्कालीन समिती नेमण्याचे या बैठकीत निश्चित करण्यात आले. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी ही समिती जेसीबी तसेच इतर सामुग्रीच्या सहाय्याने काम करेल असेही यावेळी ठरविण्यात आले. पावसाळ्यात नगरपंचायतची आपत्कालीन व्यवस्था असावी अशी सूचना नगरसेवक अभि मुसळे यांनी या बैठकीत केली होती.

 

Web Title: Kankavali highway will be closed, city chief Sameer Nalawade said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.