कणकवली नगरपंचायत सभा : कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या करारावरून खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2019 06:04 PM2019-01-19T18:04:58+5:302019-01-19T18:07:09+5:30

कणकवलीत ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य कचरा व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प होत आहे. संबधित कंपनी व नगरपंचायतीतील करारावरुन सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे शांततेत सुरु असलेल्या नगरपंचायत सभेतील वातावरणात काहिकाळ तणाव निर्माण झाला होता.

Kanakwali Nagar Panchayat Sabha: Due to the contract for the garbage process project | कणकवली नगरपंचायत सभा : कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या करारावरून खडाजंगी

कणकवली नगरपंचायत सभेत शुक्रवारी सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकात जोरदार वादंग झाला.

Next
ठळक मुद्देकणकवली नगरपंचायत सभा : कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या करारावरून खडाजंगीसत्ताधारी विरोधकात वादंग, एकमेकांवर आरोप प्रत्यारोप

कणकवली : कणकवलीत ए.जी.डॉटर्स कंपनीच्या माध्यमातून शुन्य कचरा व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्प होत आहे. संबधित कंपनी व नगरपंचायतीतील करारावरुन सत्ताधारी व विरोधी गटाच्या नगरसेवकांमध्ये खडाजंगी उडाली. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडल्या. त्यामुळे शांततेत सुरु असलेल्या नगरपंचायत सभेतील वातावरणात काहिकाळ तणाव निर्माण झाला होता.

शेवटी मुख्याधिकाऱ्यांनी विरोधी नगरसेवकांच्या मुद्यांबाबत सविस्तर स्पष्टीकरण दिले. तसेच प्रकल्पाचे फायदेहि सांगितले. त्यानंतर कायदेशीर दृष्टया संबधित करारनामा तज्ज्ञ व्यक्तींकडून तपासून घ्या असा सल्ला विरोधी नगरसेवकांनी मुख्याधिकारी व नगराध्यक्षाना दिला.

कणकवली नगरपंचायतची सर्वसाधारण सभा परमहंस भालचंद्र महाराज सभागृहात नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या उपस्थितीत शुक्रवारी झाली. यावेळी उपनगराध्यक्ष रविंद्र गायकवाड़ , मुख्याधिकारी मनोज उकीर्डे तसेच नगरसेवक उपस्थित होते. या सभेत नगरसेवक सुशांत नाईक यानी शुन्य कचरा व्यवस्थापन प्रक्रीया प्रकल्पाबाबतच्या कराराचा प्रश्न उपस्थित केला. त्यातील काही मुद्दे नगरपंचायतला जाचक असल्याचे त्यांनी सांगितले व आक्षेप घेतला. याला कन्हैया पारकर व रूपेश नार्वेकर यानी पाठिंबा दर्शविला. तर तुमचे सर्व आक्षेप प्रथम मांडा त्याला पूर्ण जबाबदारीने आम्ही उत्तरे देवू असे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सांगितले.

यावेळी सुशांत नाईक यांनी प्रकल्प सुरु होऊन बंद पडला तर संबधित कंपनीला नगरपंचायतीने नुकसान भरपाई द्यावी. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सर्व कचरा नगरपंचायतने पुरवावा . या प्रकल्पातून
निर्माण होणारी विज तसेच अन्य उत्पादने विक्रिची जबाबदारी नगरपंचायतची राहील असे अनेक जाचक मुद्दे नमूद केले असल्याचे सांगितले. तसेच विनाकारण जाचक अटी नगरपंचायतवर या कराराच्या माध्यमातून लादून घेऊ नका असेही ते म्हणाले.

यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, अभिजीत मुसळे, बंडू हर्णे यानी सुशांत नाईक यांना तुम्ही इंग्रजीतील करारनाम्याचा चुकीचा अर्थ लावत आहात असे सांगितले. तसेच आम्ही याचा पूर्ण अभ्यास केला असून दोन वकिलांचा सल्ला करार करताना घेतला आहे.असेही सांगितले.

या मुद्यावरून सभेत जोरदार खडाजंगी झाली . कन्हैया पारकर , रूपेश नार्वेकर, अभिजीत मुसळे, बंडू हर्णे आदी सत्ताधारी तसेच विरोधी नगरसेवकांनी एकमेकांवर जोरदार आरोप केले. त्यानंतर मुख्याधिकाऱ्यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी विरोधी नगरसेवकांनी केली. त्याला नगराध्यक्ष व सत्ताधारी नगरसेवकांनी अनुमती दर्शविली.

त्यानंतर मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांनी सर्व मुद्यांवर सपष्टीकरण दिले . कणकवली नगरपंचयतीने या प्रकल्पासाठी फक्त 5 टन कचरा द्यायचा आहे. सिंधुदुर्गातील कचरा निर्मुलन करुन स्वच्छ जिल्हा निर्मितीसाठी कणकवली नगरपंचायतच्या माध्यमातुन एक महत्वकांक्षी प्रकल्प राबविण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी ३ एकर जमिन ए.जी.डॉटर्स या कंपनीला देण्यात येणार आहे.

शुन्य कचरा व्यवस्थापन प्रक्रीया करणारा हा प्रकल्प होण्यासाठी ९०० कोटीची गुंतवणुक या कंपनीकडुन करण्यात येणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे शुन्य टक्के प्रदुषण असलेल्या या प्रकल्पात डिझेल, पाणी, गॅस, वीज निर्मिती करण्यात येईल. देशातील तिसरा अन महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प या निमित्ताने कणकवलीत होत आहे. प्रकल्पासाठी दिलेल्या जमीनीचे भाड़े दरवर्षी 3 लाख 57 हजार रूपये तसेच डिपॉझिट 6 लाख रूपये नगरपंचायत कंपनीकडून घेणार आहे. असेही त्यांनी यावेळी सांगितले. मुख्याधिकाऱ्यानी दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या मुद्यावर तुर्तास पडदा पडला.

आरक्षण क्रमांक 48 मधील 159 सर्व्हे मधील जागा बस स्थानकासाठी आरक्षित आहे. ते आरक्षण बदलून तिथे नगरपंचायतीच्या विश्रामगृहासाठी आरक्षण टाकण्याचा ठराव घेऊन तो प्रस्ताव शासनाकडे पाठविण्याचा मुद्दा या सभेत उपस्थित झाला होता. याबाबतही जोरदार चर्चा झाली. 14 व्या वित्त आयोगांतर्गत तसेच नगरपंचायत फंडातून घ्यायची कामे, अपंग कल्याण निधीतून लाभार्थ्याना पेन्शन देणे अशा विविध विषयांवरही या सभेत चर्चा झाली.


राडयाच्या मुद्यावरून वादंग !

सभेतील आयत्या वेळच्या विषया दरम्यान रूपेश नार्वेकर यांनी काही दिवसांपूर्वी कणकवलीत झालेल्या राडयाचा मुद्दा उपस्थित केला. तसेच नगराध्यक्षानी कणकवलीत शांतता प्रस्थापित करणे आवश्यक असताना स्वतः दांडे घेऊन शहरातून फिरणे किती योग्य आहे ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावरून नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नार्वेकर यांना तुम्ही नैतिकतेच्या गोष्टी आम्हाला शिकवू नका.

तुमच्या सोबत असलेले तरुण गुन्हेगारी प्रवृत्तीचे असताना ते तुम्हाला कसे चालतात? तुमच्यावर किती गुन्हे दाखल आहेत ? असे प्रश्न उपस्थित केले. त्यावरून दोन्ही बाजूने एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्यात आले. यामुळे जोरदार वादंग झाला. नगरसेवकांमध्ये हाणामारी होण्यासारखे वातावरण निर्माण झाले. यावेळी बंडू हर्णे, मेघा गांगण तसेच अन्य नगरसेवकानी नलावडे व नार्वेकर यांना शांत केले.

Web Title: Kanakwali Nagar Panchayat Sabha: Due to the contract for the garbage process project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.