सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होणार होलिकोत्सव साजरा, काही गावात पोलिस प्रशासनाने घातले निर्बंध 

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: March 22, 2024 05:08 PM2024-03-22T17:08:06+5:302024-03-22T17:08:37+5:30

जिल्ह्यात होळी उत्सवाची धूम सुरू होणार असून बंदी घातलेल्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात

Holikotsav will be celebrated at 1136 places in Sindhudurg district, restrictions imposed by police administration in some villages | सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होणार होलिकोत्सव साजरा, काही गावात पोलिस प्रशासनाने घातले निर्बंध 

सिंधुदुर्ग जिल्ह्यात ११३६ ठिकाणी होणार होलिकोत्सव साजरा, काही गावात पोलिस प्रशासनाने घातले निर्बंध 

सिंधुदुर्ग : जिल्ह्यात होळी उत्सवाला रविवार २४ मार्चपासून सुरुवात होत असून जिल्ह्यात ५३८ सार्वजनिक तर ५९८ खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे पूजन होणार आहे. काही गावात मानपानावरून वाद असल्याने अशा गावात पोलिस प्रशासनाने निर्बंध घातले आहेत. येथील कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, होलिकोत्सव शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज झाले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात दरवर्षी होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या वर्षीचा होळी उत्सव २४ मार्चपासून सुरू होत असून काही गावात पाच दिवस, सात दिवस, तर त्यापेक्षाही अधिक दिवस हा होळी उत्सव साजरा केला जातो. यावर्षी जिल्ह्यात ५३८ ठिकाणी सार्वजनिक तर ५९८ ठिकाणी खासगी अशा एकूण ११३६ ठिकाणी होळीचे सालाबाद प्रमाणे पूजन केले जाणार आहे.

काही गावात मानपानावरून वाद होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणी प्रशासनाने (निर्बंध) बंदी घातली आहे. तसेच ज्या गावात वाद आहेत अशा गावांत वाद मिटविण्याच्या दृष्टीने पोलिस आणि महसूल प्रशासनामार्फत प्रयत्न सुरू आहेत. २४ मार्चपासून सुरू होणारा हा उत्सव चांगल्या उत्साही वातावरणात साजरा व्हावा. कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलिस प्रशासन सज्ज ठेवण्यात आले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये मानपानावरून वाद आहेत. त्यामुळे येथील कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये म्हणून त्या गावात होळी उत्सवास तूर्तास निर्बंध घालण्यात आले आहेत. तहसीलदार स्तरावर हे वाद मिटविण्याचा प्रयत्न सुरू असून त्यातील काही गावांमध्ये वाद मिटण्याची शक्यता आहे. असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले.

यावर्षी सिंधुदुर्गात होळी उत्सवासाठी मोठ्या प्रमाणात चाकरमानी दाखल होऊ लागले असून यावर्षीचा होळी उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा होणार आहे. सिंधुदुर्गात गावागावांतील रोंबाट, रंगपंचमी आणि वेगवेगळ्या वेशभूषेतील नाच गाणी (खेळ) येथील वेगळेच आकर्षण असते. त्यामुळे पोलिस प्रशासनाने होळी उत्सव शांततेत व आनंदी वातावरणात पार पाडण्याचे आवाहन केले आहे.

५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन

जिल्ह्यात सार्वजनिक होळ्यांमध्ये दोडामार्ग ५२, बांदा २६, सावंतवाडी ४०, वेंगुर्ला २७, निवती १२, कुडाळ ९१, सिंधुदुर्गनगरी ९, मालवण ५९, आचरा २१, कणकवली ६७, देवगड ६७, विजयदुर्ग २५, वैभववाडी ३८, अशा ५३८ ठिकाणी सार्वजनिक होळीचे पूजन होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होळी उत्सवाची धूम सुरू होणार असून बंदी घातलेल्या गावात पोलिस बंदोबस्त तैनात ठेवून उत्सव शांततेत पार पडण्याचे पोलिस प्रशासन प्रयत्न करीत आहे.

Web Title: Holikotsav will be celebrated at 1136 places in Sindhudurg district, restrictions imposed by police administration in some villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.