हरकुळ बुद्रुक येथे किरकोळ वादातुन तरुणाचा खुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2019 04:11 PM2019-06-11T16:11:49+5:302019-06-11T16:16:36+5:30

कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख ( २७, रा. शेखवाडी) याचा धारदार फरशीने चार वार करत खुन करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयीत आरोपी मुजफ्फर आदमशा पटेल (३२, कुंभारवाडी) याने किरकोळ वादातुन झालेल्या शिवीगाळीनंतर अफजल शेखचा खुन केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Harukul Budruk murdered youth by a minor | हरकुळ बुद्रुक येथे किरकोळ वादातुन तरुणाचा खुन

हरकुळ बुद्रुक येथे खून झालेल्या ठिकाणाचा पंचनामा पोलिसांनी केला. यावेळी पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी उपस्थित होते.

googlenewsNext
ठळक मुद्देहरकुळ बुद्रुक येथे किरकोळ वादातुन तरुणाचा खुनधारदार फरशीने चार वार ; आरोपीला पोलीसांनी केले अटक

कणकवली : कणकवली तालुक्यातील हरकुळ बुद्रुक येथील अफजल सुलतान शेख ( २७, रा. शेखवाडी) याचा धारदार फरशीने चार वार करत खुन करण्यात आला आहे.ही घटना सोमवारी रात्री १०.१५ वाजण्याच्या सुमारास घडली. संशयीत आरोपी मुजफ्फर आदमशा पटेल (३२, कुंभारवाडी) याने किरकोळ वादातुन झालेल्या शिवीगाळीनंतर अफजल शेखचा खुन केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे. या घटनेमुळे कणकवलीसह सिंधुदुर्ग जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या घटने नंतर पसार झालेल्या संशयीताला कणकवली पोलीसांनी मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता राहत्या घरातुन अटक केली.

संशयित आरोपी मुजफ्फर पटेल


मृत अफजल शेख

याबाबत घटनास्थळ तसेच पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल आणि अफजल शेख हे जीवलग मित्र होते. ते खाण्या पिण्याच्या निमित्ताने अनेकवेळा एकत्र असायचे. काही दिवसापुर्वी संशयीत आरोपीने अफजल शेख याला तुझ्या भाऊजीचा मृत्यु होणार, असे म्हटले होते. गेल्या दोन महिन्यापुर्वी अफजल शेखच्या भाऊजींचे निधन झाले होते. त्या कारणावरुन दोन्ही मित्रांमध्ये काही दिवसांपासुन वाद सुरु होते.

पुन्हा सोमवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास हरकुळ बुद्रुक येथील भाट दुकान परिसरात या दोघांमध्ये वाद झाला. त्यानी एकमेकास शिवीगाळ केली. त्यानंतर दोघेही आपापल्या घरी गेले होते. काही वेळाने अफजल शेख हा मासे मारण्यासाठी खास बनविलेली शिग घेवुन आपल्या मोटरसायकलवरुन संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल याच्या घराकडे गेला. घराबाहेर राहुन आई तसेच संपुर्ण पटेल कुुटुंबियाला त्याने शिवीगाळ केली. यावेळी वाद होतील आणि हाणामारी होईल या भितीतुन संशयीताच्या भावाने आरोपीला घरातच बंद करुन ठेवले होते. हा शिवीगाळीचा प्रकार रात्री १० वाजण्याच्या सुमारास सुरु होता.

त्यानंतर अफजल शेख हा तेथीलच दुसरा मित्र रिझवान पटेल याच्या घरासमोर जावुन पुन्हा शिवीगाळी करायला लागला . रिझवान पटेल याने अफजलला ' तू घरी जा, उद्या तुझ्या भावाला घेवुन हा विषय मिटवूयात' , असे सांगितले. त्यानंतर अफजल शेख मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी जात होता. तेवढयात संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल हा आपल्या घरातुन सुतार कामासाठी वापरण्यात येत असलेली फरशी हातात घेवुन बाहेर आला.

त्यांनतर दोघांची बाचाबाची जोरदार सुरु झाली. शिवीगाळ आणि शाब्दीक बाचाबाची झाल्यानंतर काही क्षणातच दोघांचाही आवाज बंद झाला. अचानक काय झाले ? म्हणुन रिझवान पटेल याने घराबाहेर येवुन मोबाईलच्या बॅटरीवर पाहले असता धापा टाकत गंभीर जखमी अवस्थेत अफजल शेख जमिनीवर कोसळलेला त्याला दिसला.

रिझवान पटेल याने ताबडतोब अफजल शेखच्या भावाला झालेली घटना कळविली.त्याचा भाऊ घटनास्थळी येताच जखमी अफजलला मारुती व्हॅनमधुन कणकवली येथील खाजगी दवाखान्यात हलविण्यात आले. अफजल गंभीर असल्याने डॉक्टरांनी अधिक उपचारासाठी पुढे नेण्याची सुचना केली. त्याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत अफजल शेखचा मृत्यु झाला होता.

फरशीच्या सहाय्याने अफजल शेखच्या छातीत, पोटात, डाव्या कुशीत, डाव्या बाजूला पाठीत अशा चार ठिकाणी खोलवर वार संशयीत आरोपी मुजफ्फर पटेल याने केले असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर येत आहे. तो गंभीर जखमी झाल्याचे लक्षात येताच आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला. तसेच घराशेजारील जंगलमय भागात सोमवारची रात्र काढली. या घटनेची माहिती समजताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले.

आरोपीच्या शोधासाठी कणकवली बसस्थानक, रेल्वेस्टेशन, महामार्ग, हरकुळ बुद्रुक संपुर्ण गाव व खुन झालेल्या जंगलात शोध मोहीम राबविण्यात आली. पहाटेपर्यंत पोलीसांच्या विविध पथकानी नागरिकांच्या मदतीने शोधमोहीम राबविली. मात्र आरोपी हाती लागला नव्हता.

पोलीसांनी आरोपीचे लोकेशन मोबाईल फोनद्वारे काढले असता, गावातीलच टॉवरच्या परिसरात आरोपी असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार पोलीसांनी सकाळपासुनच गावात ठाण मांडले होते. त्याचबरोबर घरातील नातेवाईकांना विश्वासात घेतले होते. अखेर मंगळवारी सकाळी ११.१५ वाजता संशयित आरोपी मुजफ्फर पटेल घरी आला असल्याची माहिती पोलीसांना मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेनण्यात आले.

खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस यंत्रणा सतर्क झाली होती. रात्री प्राथमिक तपास करत हा खुन कोणत्या कारणातुन झाला? याची माहीती त्यांनी काढली. आरोपी व मृत या दोघांनीही सायंकाळी मद्यप्राशन केल्याची चर्चा गावात होती. दोघांमध्ये सायंकाळपासुन वाद सुुरु होते. या वादाबाबतची कल्पना अफझल याने आरोपीचे शेजारी रिझवान पटेल याना फोनवरुन दिली होती. अफजल शेख याने आरोपीच्या घरी जाण्यापुर्वी रात्री १० वाजण्याच्या सुमारास फोनवरुन ' मी मुजफ्फर पटेल याला मारणार आहे. तु मध्ये पडु नकोस', असेही रिजवान याला सांगितले होते. त्यानंतर तो आरोपीच्या घरी गेला, शिवीगाळ केली .

रिजवान पटेल याने त्याची समजुत काढली. तो परत जात असताना आरोपी व अफजल शेख याच्यात वाद झाला. रिझवान पटेल याच्या घरासमोर काही अंतरावर काळोखात कुंभारवाडी ते नाईकवाडी जाणाऱ्या रस्त्यावर दोघांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन खुनात झाले. घटनास्थळी अफजल याची मोटरसायकल, आरोपीला मारण्यासाठी आणलेली लोखंडी शिग, चप्पल पडलेली होती. या घटनास्थळाचा पंचनामा कणकवली पोलीसांनी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास केला.

खुनाची घटना घडल्यानंतर पोलीस निरिक्षक शिवाजी कोळी, सहाययक पोलीस निरीक्षक जँबाजी भोसले, पोलीस उपनिरिक्षक राजवर्धन खेबुडे, प्रकाश कदम, बापु खरात, उत्तम पवार, पोलीस हवालदार भुषण सुतार, चालक राजु उबाळे, झुजे फर्नांडिस आदींसह पोलीसांचे पथक ठाण मांडुन होते. शोधमोहीमेसाठी पोलीस पाटील संतोष तांबे, माजी पंचायत समिती उपसभापती बुलंद पटेल, राजु पेडणेकर, आनंद ठाकुर यांच्यासह गावातील ग्रामस्थांनी मदत केली.

रात्री १२ वाजल्यापासुन पहाटेपर्यंत शोधमोहीम संपुर्ण जंगलमय भागात राबविण्यात आली. या खुन प्रकरणातील आरोपी मुजफ्फर पटेल हा कणकवली-वागदे येथील महिंद्रा शोरुममध्ये सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. तर मयत अफजल शेख हा जानवली येथे टिव्हीएस शोरुममध्ये मॅकॅनिकचे काम करत होता.

अफजल शेख याच्या पश्चात्त आई, भाऊ, पत्नी, दोन वर्षाची एक मुलगी व दोन महिन्याची एक मुलगी असा परिवार आहे. या घटनेनंतर शोकाकुल वातावरणात अफजल शेखवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेबाबत अफजल याचा भाऊ सरफाज सुलतान शेख याने कणकवली पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवीली आहे.

१२ तासात आरोपी गजाआड!

खुनाची घटना घडल्यानंतर अफजल शेख याच्या नातेवाईकांनी आरोपीला अटक करत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही. अशी भुमिका घेतली. अफजल शेख याचा मृतदेह कणकवली उपजिल्हा रुग्णालयात शवागृहात ठेवण्यात आला होता. त्यामुळे पोलीसांनी पुन्हा शोधमोहीम सकाळपासुनच सुरु केली होती. अखेर आरोपी घरात आला आणि पोलीसांच्या हाती लागला. या घडलेल्या घटनेनंतर अवघ्या १२-१३ तासातच आरोपी मुजफ्फर पटेल याला बेडया ठोकण्यात पोलीसांना यश आले.
 

Web Title: Harukul Budruk murdered youth by a minor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.