कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर कशी जिरली कळले असेल, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2022 01:46 PM2022-02-03T13:46:44+5:302022-02-03T13:47:29+5:30

केंद्रीयमंत्री नारायण राणे हे पुत्रप्रेमापोटीच संसद आणि मंत्रीपदाचे काम सोडून कणकवलीत तळ ठोकून बसले

Former District Bank Chairman Satish Sawant criticizes MLA Nitesh Rane | कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर कशी जिरली कळले असेल, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर कशी जिरली कळले असेल, सतीश सावंतांचा नितेश राणेंना टोला 

Next

कणकवली:  सिंधुदुर्ग जिल्‍हा बँकेच्या निकालानंतर सोशल मीडियातून माझी बदनामी करण्यात आली. माझी कशी जिरवली याची व्यंगचित्रे काढण्यात आली. पण माझी जिरवताना आमदार नीतेश राणेंचीच कशी जिरली हे त्‍यांना कालची रात्र जेलमध्ये घालवल्‍यानंतर निश्‍चित कळले असेल अशी टीका जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष सतीश सावंत यांनी केली आहे. 

तसेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंवर आरोप करणाऱ्या केंद्रीयमंत्री नारायण राणे हे पुत्रप्रेमापोटीच संसद आणि मंत्रीपदाचे काम सोडून कणकवलीत तळ ठोकून बसले होते असेही ते म्‍हणाले. कणकवली येथील शिवसेना कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत  सावंत बोलत होते. 

ते म्‍हणाले, कणकवली विधानसभा मतदारसंघातून यापूर्वी निवडून गेलेले आमदार केशवराव राणे, अप्पासाहेब गोगटे यांनी कार्यकर्त्यांना प्रेम दिले. कार्यकर्त्यांना भीती दाखविण्यासाठी त्‍यांना कधी दहशतवाद करण्याची आवश्‍यकता भासली नाही. मात्र, आताचे आमदार कार्यकर्त्यांच्या अंगावर जाणे, कार्यकर्त्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण करणे अशा प्रकारची कृत्य करत आहेत.

मात्र, त्‍यांची ही कृत्‍ये कणकवलीतील मतदारांना कधीही मान्य होणार नाहीत. लोकहितासाठी हे आमदार कधी जेलमध्ये गेले नाहीत. तर अधिकाऱ्यांवर चिखलफेक, दुसऱ्या पक्षातील कार्यकर्त्यावर हल्‍ला अशा दहशतवाद प्रकरणात त्‍यांना जेलमध्ये जावे लागले आहे.

जे नारायण राणे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर पुत्रप्रेमाचे आरोप करत होते. तेच नारायण राणे स्वत:च्या मुलाला वाचविण्यासाठी केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी टाळून कणकवलीत ठाण मांडून होते. राणे यांनी कितीही दहशतवाद निर्माण केला तर त्‍याला शिवसैनिक घाबरणार नाहीत. शिवसैनिक यापूर्वी कधी राणेंचा दहशतवादाला घाबरले नाहीत आणि यापुढेही दहशतवाद सहन करणार नाहीत. 

दरम्‍यान, आम्‍ही काहीही केले तरी आमचे कुणी काही वाकडे करू शकत नाही अशी घमेंड आमदार नीतेश राणे यांना होती. पैशाच्या जोरावर काहीही करता येईल अशा भ्रमात ते वावरत होते. मात्र, संतोष परब यांच्यावरील हल्‍ला प्रकरणानंतर त्‍यांची घमेंड निश्‍चितपणे उतरली असेल.

न्यायदेवतेपुढे पैसा, दबाव काहीही चालत नाही हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल. पूर्वी मूर्ती लहान पण किर्ती महान असा वाक्‍यप्रयोग वापरात होता. पण आता 'मूर्ती लहान पण अपकिर्ती महान 'असा शब्‍दप्रयोग रूढ होईल असा टोलाही सतीश सावंत यांनी यावेळी लगावला. 

Web Title: Former District Bank Chairman Satish Sawant criticizes MLA Nitesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.