Sindhudurg: आंबोली-हिरण्यकेशी परिसरातील १४ अनधिकृत बंगले जमीनदोस्त; वन व महसूलची संयुक्त कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 6, 2024 12:37 PM2024-03-06T12:37:04+5:302024-03-06T12:43:46+5:30

कमालीची गुप्तता; उपोषणकर्त्यांकडून जल्लोष

Forest and Revenue Department action on 14 unauthorized bungalows in Amboli-Hiranyakeshi area | Sindhudurg: आंबोली-हिरण्यकेशी परिसरातील १४ अनधिकृत बंगले जमीनदोस्त; वन व महसूलची संयुक्त कारवाई 

Sindhudurg: आंबोली-हिरण्यकेशी परिसरातील १४ अनधिकृत बंगले जमीनदोस्त; वन व महसूलची संयुक्त कारवाई 

आंबोली : आंबोली हिरण्यकेशी परिसरात अनधिकृतपणे उभारण्यात आलेले २७ बंगले हटविण्यात यावेत, अशी नोटीस बंगले मालकांना देऊनही त्यांनी ते बंगले पाडले नसल्याने अखेर मंगळवारी वन व महसूल विभाग यांनी संयुक्त कारवाई करीत हे बंगले अवघ्या ७ तासांत जमीनदोस्त केले.

भल्या पहाटे कमालीची गुप्तता पाळत ६ जेसीबींच्या साहाय्याने हे बंगले पाडण्यात आले. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून एवढी गुप्तता पाळण्यात आली होती की, त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे मोबाइलही जप्त करण्यात आले होते. आता परिसरात असलेल्या अन्य बांधकामांना नोटीस बजावण्यात येणार असून, त्यांच्यावरही कारवाई करण्यात येणार असल्याचे वनाधिकारी विद्या घोडके यांनी सांगितले, तर दुसरीकडे बांधकामे जमीनदोस्त केल्यानंतर उपोषणकर्त्यांनी जल्लोष केला.

आंबोली हिरण्यकेशी परिसरात सर्व्हे नंबर २३ मध्ये उभारण्यात आलेल्या २७ बंगल्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. गेले २० दिवस ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उपोषण, आंदोलन केले होते. त्यानंतर स्थानिकांचा वाढता दबाव लक्षात घेता या ठिकाणी प्रशासनाकडून ते बंगले पाडण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

पण तत्पूर्वी तहसीलदार श्रीधर पाटील यांच्यासह वन विभागाकडून बंगले मालक यांना या वन हद्दीत येत असल्याने आपले बांधकाम पाडा, अशी नोटीस दिली होती. त्यासाठी ४८ तासांची मुदतही देण्यात आली होती. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही हे बांधकाम पाडण्यात आले नसल्याने अखेर मंगळवारी सकाळी ७ वाजल्यापासून या कारवाईला सुरुवात करण्यात आली.

यावेळी सहा जेसीबींसह अन्य वाहने परिसरात आणून हे बंगले दुपारी दीड वाजेपर्यंत जमीनदोस्त करण्यात आले, तसेच त्या ठिकाणी बंगल्यासाठी वापरण्यात आलेले पत्रे, लोखंडी साहित्य जप्त करण्यात आले आहेत.

ही कारवाई करण्यासाठी सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील, वन विभागाचे सहायक उपवनसंरक्षक सुनील लाड यांच्यासह वनाधिकारी मदन क्षीरसागर, विद्या घोडके यांची टीम त्या ठिकाणी ठाण मांडून बसली होती. कारवाई करताना कोणताही दबाव येऊ नये, यासाठी परिसरात सर्वांना अटकाव करण्यात आला होता. विशेषतः हिरण्यकेशी परिसरात जाणारा रस्ता बंद करण्यात आला होता.

त्या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या ग्रामस्थांना हिरण्यकेशी फाटा परिसरात आणून बसविण्यात आले होते. दुपारी दीड वाजेपर्यंत ही कारवाई पूर्ण करण्यात आली. त्या ठिकाणी असलेले सर्व बंगले जमीनदोस्त करण्यात आले, असा दावा तहसीलदार पाटील यांनी केला. ही कारवाई पूर्ण झाल्याची माहिती मिळाल्यानंतर आंबोली ग्रामस्थांनी जल्लोष केला. हा सर्व ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय आहे, असे सांगून त्यांनी कारवाई करणाऱ्या प्रशासनाचे आभार मानले.

वन व महसूलकडून कारवाई; पोलिस अंधारात

आंबोली हिरण्यकेशी परिसरातील बंगले पाडण्याची कारवाई ही वन विभाग व महसूल विभाग यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आली. यासाठी वन विभागाचे मोठ्या प्रमाणात अधिकारी, कर्मचारी घटनास्थळावर हजर होते. मात्र, पोलिस तुरळक एकही वरिष्ठ पोलिस अधिकारी घटनास्थळावर आला नाही. वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळावर ठाण मांडून बसले होते.

Web Title: Forest and Revenue Department action on 14 unauthorized bungalows in Amboli-Hiranyakeshi area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.