आचरा समुद्रात पात उलटली

By Admin | Published: November 9, 2016 12:35 AM2016-11-09T00:35:15+5:302016-11-09T00:43:40+5:30

दोन मच्छिमार बचावले : स्थानिक मच्छिमारांनी केली मदत

Dump in the sea | आचरा समुद्रात पात उलटली

आचरा समुद्रात पात उलटली

googlenewsNext

आचरा : आचरा बंदरातून समुद्रात गेलेली पात (मच्छिमार नौका) सलग आलेल्या लाटांच्या माऱ्यामुळे केउंडला पॉर्इंटजवळ उलटली. यामुळे नौकेतील दोन मच्छिमार समुद्रात फेकले गेले. मात्र, आचऱ्यातील मच्छिमार बांधवांनी प्रसंगावधान राखून या दोन्ही मच्छिमारांना वाचविले आहे. ही घटना सोमवारी घडली.
आचरा येथील समुद्रात मच्छिमार नौकेतील मुज्जफर बशीर मुजावर (वय २५) व हेमंत तळवडकर (४५) हे दोघे मच्छिमार सतत आलेल्या लाटांमुळे समुद्रात फेकले गेले. दोघेही उलटलेल्या नौकेचा आधार घेत जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते. यातील एकाने पोहत किनारा गाठला. किनाऱ्यावर आल्यानंतर त्याने पात बुडाल्याची माहिती आचरा बंदरातील मच्छिमारांना दिली. आचरा बंदरातील मच्छिमारांनी धाव घेत दुसऱ्याही मच्छिमाराचे प्राण वाचविले. या दुर्घटनेत नौकेचे तसेच इंजिन व जाळ्यांचे नुकसान झाले. मुज्जफर मुजावर व हेमंत तळवडकर हे आचरा बंदरातून महामुद मुजावर यांच्या मालकीची पात घेऊन मासेमारीसाठी निघाले होते. केउंडला पॉर्इंटदरम्यान पात आली असता अचानक लागोपाठ आलेल्या लाटांमुळे पात उलटली. अचानक उद्भवलेल्या प्रसंगाने घाबरून न जाता दोन्ही मच्छिमारांनी धीर सोडला नाही. उलट या दोघांनी पातीचा आधार घेत यातून मार्ग काढण्याचा निर्णय घेतला. शेवटी मुज्जफर मुजावर याने धाडस करत किनारा गाठला, तर हेमंत तळवडकर हे उलटलेल्या पातीचा आधार घेत समुद्रात होते. घटनेची माहिती आचरा मच्छिमार बांधवांना समजल्यानंतर हेमंत तळवडकर यांनाहीयातून सुखरूप बाहेर काढण्यात आले. (वार्ताहर)


मच्छिमारांची धावाधाव
आचरा समुद्रात पात उलटल्याचे वृत्त कळताच मच्छिमार कुटुंबीयांमध्ये घबराट पसरली. आचरा बंदरातील मच्छिमार आसिफ मुजावर, फिरोज मुजावर, भालचंद्र कुबल, रसिक जोशी, आबू मुजावर यांनी तत्काळ नौका काढत समुद्रात धाव घेतली. यावेळी समुद्रात पातीला धरून मदतीची वाट पाहणाऱ्या हेमंत तळवडकर यांचे प्राण वाचविले. उलटलेली पात दोरीच्या सहाय्याने बांधून अथक प्रयत्नांनंतर आचरा बंदरात आणली. यात पातीचे व इंजिनाचे नुकसान झाले. पातीतील जाळी मात्र समुद्रात वाहून गेली. समुद्रात एकामागोमाग सात लाटा येण्याचा प्रकार हा दुर्मीळ असतो. याचा फटका मात्र या मच्छिमारांना सहन करावा लागला.

Web Title: Dump in the sea

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.