शासकीय इमारतीवर देवबागचे नाव देऊ नये

By admin | Published: December 16, 2014 09:57 PM2014-12-16T21:57:45+5:302014-12-16T23:42:19+5:30

मोहन केळुसकर : तारकर्ली-देवबाग लोकप्रतिनिधी एमटीडीसी अधिकारी बैठक

Deobag should not be named on the government building | शासकीय इमारतीवर देवबागचे नाव देऊ नये

शासकीय इमारतीवर देवबागचे नाव देऊ नये

Next

मालवण : येथील आंतरराष्ट्रीय स्कुबा डायव्हिंग सेंटर हे तारकर्ली गावच्या हद्दीत येते. या सेंटरच्या नामफलकावर देवबाग गावचे नाव संयुक्तपणे लावण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. नामफलकाच्या वादावर तारकर्लीचे लोकप्रतिनिधी उपस्थित नसतानाही तहसीलदारांनी बैठक घेतली. या बैठकीत घेण्यात आलेल्या संयुक्त नावाच्या निर्णयाचा आम्ही निषेध करतो. तारकर्ली गावच्या हद्दीत असणाऱ्या कोणत्याही शासकीय इमारतीवर देवबाग गावचे नाव नकोच असे मत तारकर्ली सरपंच मोहन केळुस्कर यांनी व्यक्त केले.
मंगळवारी स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलक वादाबाबत तारकर्ली गावच्या शिष्टमंडळाने तहसीलदार वनिता पाटील यांची भेट घेतली. यावेळी माजी सरपंच किशोर कुबल, नगराध्यक्ष अशोक तोडणकर, रामचंद्र कुबल, गजानन कुबल, सागर चव्हाण, दिगंबर मालंडकर, राजू मेस्त्री, डॉ. जितेंद्र केरकर आदी उपस्थित होते. तहसीलदार वनिता पाटील यांना स्कुबा डायव्हिंग सेंटरवर तारकर्ली गावाचाच उल्लेख असावा या संदर्भात निवेदन देण्यात आले.
स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामांतर वादावर तहसीलदार वनिता पाटील यांनी तारकर्ली-देवबाग गावचे लोकप्रतिनिधी एमटीडीसी अधिकारी आदींची संयुक्त बैठक घेतली होती. बैठकीला तारकर्ली गावचे प्रतिनिधी उपस्थित नव्हते.
तारकर्ली येथील सर्व्हे नं. ५९, ६० या जमिनीमध्ये स्कुबा डायव्हिंग सेंटरची इमारत उभारली. या ठिकाणी तारकर्ली ग्रामपंचायत घर नं. ४५२ आणि ४५३ या नावाने नोंद असलेली बांधकामे शासकीय मासळी आवार म्हणून तारकर्ली ग्रामपंचायतीच्या दप्तरी नोंद आहेत. ही मालमत्ता महाराष्ट्र पर्यटन महामंडळाकडे हस्तांतरीत केल्यानंतर त्याची दुरुस्ती करण्यासाठी तारकर्ली ग्रामपंचायतीने ठरावाने परवानगी दिली आहे. तसेच या इमारतीसाठी लागणारे सर्वप्रकारचे ना हरकत दाखले तारकर्ली ग्रामपंचायतीने दिले आहेत. असे असतानाही स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या इमारतीवर तारकर्लीबरोबर देवबाग नाव लावणे चुकीचे आहे. या नामफलकाबाबत आमची मागणी एमटीडीसीच्या अधिकाऱ्यांजवळ मांडली असताना या सेंटरच्या नामफलकावरील तारकर्ली नाव देवबागच्या काही ग्रामस्थांनी अनधिकृतपणे काढून वाद निर्माण केला आहे. त्यामुळे यापुढे स्कुबा डायव्हिंग सेंटरवर देवबागचा उल्लेख करण्यात येवू नये असे सरपंच मोहन केळुस्कर यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
संयुक्त नावाचा
निर्णय चुकीचा
आमची बाजू जाणून घेतल्याशिवाय स्कुबा डायव्हिंग सेंटरच्या नामफलकावर तारकर्ली-देवबाग या दोन्ही गावांचा संयुक्तपणे उल्लेख करण्याचा निर्णय घेण्यात आला. परस्पर घेण्यात आलेला हा निर्णय चुकीचा आहे. तारकर्ली देवबाग असे संयुक्त नाव न लावता केवळ तारकर्ली गावाच्या नावासाठी आम्ही ठाम आहोत. अन्यथा वेगळ्या पर्यायाचा विचार झाल्यास आम्ही टोकाची भूमिका घेऊ असा इशारा सरपंच केळुस्कर यांनी दिला.

Web Title: Deobag should not be named on the government building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.